हुतात्मा श्रीकांत लिंगायत जयंती (५ ऑक्टोबर) निमित्त…
कोण होता श्रीकांत लिंगायत?
- संविधान रक्षणासाठी आणिबाणी विरोधात सत्याग्रह केल्याने १९ महिने तुरुंगवास भोगणारा देशभक्त
- पुण्यातील लष्कर भागातील शिवजयंती उत्सवात पुढाकार घेणारा प्रखर शिवभक्त
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक, देव, देश, धर्मासाठी सक्रिय स्वाभिमानी हिंदू
- आणि..ऐन तारुण्यात “मॉब लिंचिंग” चा बळी
हुतात्मा श्रीकांत लिंगायत यांचा अल्प परिचय…
५ ऑक्टोबर १९५६ रोजी श्रीकांत शिवलिंगस्वामी लिंगायत यांचा जन्म पुणे शहराच्या पूर्व भागात लष्कर (कॅम्प) परिसरात मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. श्रीकांतच्या बालपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आईने अत्यंत कष्टाने श्रीकांत आणि त्यांच्या भावाबहिणींची देखभाल करताना देशभक्तीचे संस्कार दिले.
श्रीकांत आपल्या भावंडांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात असे. मोठा भाऊ भारतीय सैन्यात अधिकारी झाल्यानंतर श्रीकांतने कुटुंबाची जबाबदारी घेतली. सोबत संघकार्य जोमाने सुरु ठेवले. श्रीकांत एक सच्चा देशभक्त, प्रखर हिंदू होता. विविध सामाजिक कामात त्याचा सक्रिय सहभाग असे.
२६ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. संविधानिक मूल्यांची हत्या करणाऱ्या आणीबाणीच्या विरोधात देशभरातील तरुणाईने संघर्ष केला. यामध्ये श्रीकांतने स्वतःला झोकून दिले. लष्कर भागात भोपळे चौकात त्याने लोकांना संघटित करून आणीबाणीच्या विरोधात सत्याग्रह केला. भूमिगत चळवळीतही सहभाग घेतला. श्रीकांतला ‘मिसा’ कायद्याखाली अटक झाली. तुरुंगातही त्याने स्वतःचा अभ्यास सुरु ठेवला.
१९ महिन्यांनी तुरुंगातून सुटल्यावर त्याने बी.कॉम पूर्ण केले आणि चार्टर्ड अकाऊंटंट (सी.ए.) होण्यासाठी अभ्यास सुरु केला. अभ्यासाचे नियोजन, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडताना त्याने देशकार्यात कधीही अडथळा पडू दिला नाही. आणीबाणीमुळे बंद पडलेली लष्कर भागातील शिवजयंती मिरवणूक १९७९ साली त्याने पुढाकार घेऊन पुन्हा सुरू केली. संघ शाखेतील प्रेमळ उत्साही शिक्षक, उत्तम नेतृत्वगुण, कुशल संघटक असे त्याचे व्यक्तिमत्व बहरू लागले.
… आणि तो दिवस उजाडला.
२६ जानेवारी १९८२. संध्याकाळची वेळ. भवानी पेठेत पतित पावन संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्रीकांत आपल्या मित्रांसह गेला. यावेळी भारतमातेचा जयघोष आणि पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रम संपल्यावर परत जाताना काही धर्मांध मुसलमानांनी श्रीकांत आणि त्याच्या मित्रांवर धारदार शास्त्राने हल्ला चढवला. श्रीकांतने प्रतिकार केला. परंतु भ्याड हल्लेखोरांनी झुंडीने येऊन त्याच्यावर १४ वार केले. जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. तब्बल दीड महिना त्याने मृत्यूशी झुंज दिली. अखेर १५ मार्च १९८२ रोजी त्याची प्राणज्योत मालवली. यावेळी त्याचे वय होते फक्त 26 वर्ष.
तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी श्रीकांतच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्याचे मारेकरी अटक झाले. मात्र पोलीस तपासातील त्रुटी, कायद्याच्या पळवाटा यामुळे न्यायालयीन लढाईत अपयश आले. त्याचे मारेकरी सुटले….
श्रीकांतची हत्या अशाप्रकारची पहिली अथवा शेवटची घटना नाही. श्रीकांतच्या हत्येमागील वृत्ती आजही आपल्याला दिसते. नुपूर शर्मा प्रकरणात कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांचा निर्घृण खून असो किंवा आता रामगिरी महाराजांच्या विरोधात ‘सर तन से जुदा’ घोषणा असो. श्रीकांत लिंगायतचे बलिदान आजही आपला देश, आपल्या लोकशाही आणि संविधानासमोरील गंभीर आव्हानांची आठवण करून देते. म्हणून श्रीकांत लिंगायतचे स्मरण केले पाहिजे.