गुरुदेव त्या वादपटू शिष्याला निक्षुन सांगत होते, “प्रत्येक प्रश्नाला उत्तर नसते. कारण कधी कधी प्रश्नच नसतो. म्हणजे खरा नसतो. असते ती भ्रांती, ग्लानी. ती दूर झाली की प्रश्नाची सावलीही उरत नाही.”
शिष्य पराभूत न होत प्रमाण मागत होता..
गुरुदेव म्हणाले, ” भ्रांती तुझी.. दूर तूच करशील.. “
शिष्य पूर्ण बुचकळ्यात पडला.
गुरुदेव म्हणाले, ” अरे, तुझ्या सावलीसमोर दिवा लाव.. सावली उरणार नाही…. “
शिष्य वरमत विचारता झाला, “गुरुदेव, मी हट्टी, वाचाळ म्हणून सांगताय ना? हे केवळ माझ्यासाठी ना?
गुरुदेव म्हणाले,” हे साऱ्यांसाठी. अगदी माझ्यासहित. आपली सावली पुसणारा दिवा हवा.. तो असतोच. प्रत्येकाने शोधायला हवा.. आणि तो अनुभवायलाही हवा.. “
बोधकथा त्याच्या कानात गुंजत होती. खरं तर मनात.. तो आत्ताच ऐकत असल्यासारखा रमून गेला होता. अभावितपणे थोडं पुढे झुकत त्याने डोकं नमवलं. पण… पद्मासनात बसून डोकं समोर भूमीवर टेकवणं ?… आता ? कल्पनेतही जिकिरीचं. अशक्यच.
पण त्यामुळे तो भानावर आला. किती वेळ झाला असेल..? तो आला तेव्हा जवळपास कुणीच नव्हतं. इथे आणि आला त्या मार्गावरही. निसटता अंधार.. झाडाच्या डहाळीवर उमललेली फुलं दिसावीत एवढाच जेमतेम उजेड.. त्या तेवढ्या उजेडात हातातल्या काठीच्या वाकड्या मुठीने डहाळी वाकवून फुलांची मिळकत मिळविणारा कुणी वयस्कर इसम. त्याला पाहताना वयस्कर आणि इसम असे दोन्ही शब्द ह्याच्या मनी आले नाहीत. पण ते तसे शब्द आहेत हे जाणवताच त्याला नवल वाटलं. आपण कधीच असं म्हणत नाही.. म्हटलं नाही. आपल्या लेखी ते गृहस्थ तरुणच.. फार तर प्रौढ, पण वयस्कर नाहीच नाही. आणि इसम ? तो शब्द तर नेहेमीच अपराध वार्तेमध्येच वाचला होता. आपल्या लेखी सारेच वयम्.. वयम् हिंदुराष्ट्रांगभुता! म्हणजेच नइसम वा अइसम..
रेशीमबागेच्या मुख्य रस्त्यावरून कमानीखालून तो वळला होता. त्या डहाळीवरचं एखादं फूल मागून घ्यावं का असं वाटेपर्यंत तो पुढे सरकला होता. विचार करू लागला ह्या आधी आपण इथे कितीदा आलो.. पण फूल घेऊन ? कधीच नाही.
पण मग काय वाहिलं आपण ? इतक्या वेळी आलो पण तसं रिक्तहस्तेच आलो ना ? तसंच आज.
तिथे बसल्या बसल्या त्याने ओंजळ उघडून तळवे पाहिले. आत्ताही रिक्तच. खरंच आपण काही द्यायला.. वाहायला आलो का इथे? तसं द्यायला, वाहयला आपल्याकडे आहे काय? तो अनिमिषपणे समोर समाधीच्या चौथऱ्याकडे पहात मनाशी म्हणाला आपण इथे येतो ते वाहायला नाही.. व्हायला येतो. असं व्हायला, ह्यांच्यासारखं जीवन करून ते वाहायला येतो. मग वेगळं आणिक काही द्यायला उरतं का ? नाहीच.. स्वतःचं, स्वतःचंच असं काहीही न उरवायला इथे येतो.
पण जमलं का ? किती ?
आपल्याला किती जमलं ते आपणंच कसं पहावं.. म्हणावं?
‘पहावे आपणासी आपण..’ अशी संतोक्ती आहे. पण इथं आलं की वेगळं असं कुणी दिसतंच नाही. येतेजाते सारेच आपल्यासारखे.. ‘आपण’ म्हणावे असेच दिसतात. का होतं असं? कसं? आज जेमतेम उजेडात दिंडीदरवाज्यातल्या हनुमंताला नमस्कार करून तो रेशीमबाग परिसरात शिरला होता तेव्हाची त्याला आठवण झाली. दिंडीवरचे सुरक्षारक्षक निवांत होते. बहुधा चेहऱ्यामोहऱ्यावरून पारख करण्यात ते आता सराईत झाले असावेत. असं होतं.. केवळ तेवढं पाहून परिचय नसताना हा स्वयंसेवक म्हणून ओळखणं शक्य असतं. असे कितीतरी प्रसंग त्याने बौद्धिक वर्गात, चर्चासत्रात ऐकले होते. त्याचा लहानसा स्वानुभवही होता. गाडीतून उतरताना खाली सामान देणाऱ्या व्यक्तीला त्याने तुम्ही… तुम स्वयंसेवक हो क्या? असं विचारलं होतं आणि तोही प्रसन्न हसत “जी हाँ..!” असं म्हणाला होता. गाडी हलली, पुढे निघून गेली. ह्याला वाटलं आपण ‘त्या’चं नाव, पत्ता विचारलाच नाही. काय असेल बरं? कुठला रहिवासी असेल? काय करीत असेल? कोण.. कोण असेल तो? पण क्षणभरात त्यानेच समोर पसरलेली प्रश्नांची भेंडोळी दूर केली. तो कोण ह्याचं समाधाकारक उत्तर त्याला मिळालं होतंच.. स्वयंसेवक !
त्याच्या अवतीभवती आता तेच दिसत होते. तो आला तेव्हा स्मृतिमंदिराच्या कुंपणाचं दार नुकतंच उघडलं होतं. एक दोघं त्याच्याबरोबरच आत आले. त्यांच्याच मागोमाग तो समाधीस्थानी शिरला. स्मृतिमंदिराचा गाभाराच.. तिथे दिव्याची वात तेवत होती. उदबत्तीही संथपणे जळत होती. समाधीचा पांढुरका संगमरवरी चौथरा, त्यावर सोनपिवळी वेलबुट्टी.. त्यावर रूळणारी रुद्राक्षमाळ.. समाधीवर वाहिलेली चार ताजी मोगऱ्याची फुलं… त्या चौथऱ्याभोवती संगमरवरी कठडा… बस्स.. इतकंच.
कितीतरी जीवनं घडविणाऱ्या परम पूजनीय डॉक्टर हेडगेवारांचं हे समाधीस्थान. देहरूपातील डॉक्टरजींचं अस्तिव इथे विसावलं.. आणि ज्याची सावली पडावी..दिसावी असा देह सावलीवेगळा झाला. गुणरूप झाला. जणू आता सावली न उरता ‘उजेडी राहिले, उजेड होऊन..!’ असं निष्कंप उजळत्या ज्योतीसारखं.. आकाशमोगऱ्याच्या परिमळासारखं.. चैतन्यरूप.. स्वसंवेद्य.. अपार्थिव… अविनाशी चैतन्यच.
एकावेळी जेमतेम सातआठ माणसं उभी राहू शकतील इतुकंच ते जणू गर्भगृह. अशा असीमाचं मंदिर.. स्मृतिमंदिर..तेही असं… भव्य नव्हे भाव्य.. भावतीर्थ झालेलं. आपापल्या प्राणज्योतीतून त्या चैतन्याचा प्रकाश उजळत रहावा ह्यासाठी इथे येत असलेले अगणित.. इथे थोडं भिंतीशी सरकून बसायची सोय. येणारा प्रत्येक समाधीसमोर उभा राहतो आणि मागे सरून डोळे मिटून थोडा वेळ भिंतीशी बसतोच. तोही तसाच.
तो बसला तेव्हा तिथे मंद उजेड होता. पण बाहेरच्या झुंजमुंजू प्रकाशाहून अधिक ऊबदार होता. आत आत पाझरत जात होता.
त्या उजेडाच्या वाटेवरून तो मागे मागे पहात होता.
किती वेळा इथे आलो… कधी कधी…असा मागोवा घेऊ लागला.
संघ शिक्षा वर्गाच्याही आधी कोणत्या तरी बैठकीसाठी तो प्रथम इथे आल्याचं त्याला स्मरत होतं. बैठक, बैठकीचे विषय, तिथे भेटणारे अधिकारी, कार्यकर्ते ह्या सर्वाविषयी ओढ स्वाभाविकच होती, पण त्याहून अधिक त्या भूमीची, तीर्थवत स्थानाची ओढ अधिक होती. वारी चालून आल्यावर इंद्रायणीच्या पात्रात स्नानाला उतरावं पण मन, नेत्र मात्र पंढरीरायाच्या राऊळाकडे लागलेलं असावं तसंच त्याचं झालं होत. रात्रीच पोहोचला होता, पण दार बंद झालं होतं. तो अधाशीपणे कळसाकडे, घुमटखाली असलेल्या डॉक्टरांच्या प्रेरणामूर्तीकडे आणि समोरच्या श्री गुरुजींच्या स्मृत्यर्थ उभ्या केलेल्या यज्ञकुंडाकडे आळीपाळीने रात्री उशिरापर्यंत पहात उभा होता. कलत्या चंद्राकडे पाहिल्यावर एकदम खूप रात्र झाल्याचं त्याच्या ध्यानात येऊन तो झोपायला जाण्यापूर्वी आकाशात ध्रुव दिसतोय का पाहू लागला. त्या मंद चांदण्यांच्या थव्यात त्याला ध्रुव ओळखता आला नाही. काहीसा खट्टू होतंच तो झोपी गेला. आणि पहाटे सर्वांच्या आधी आवरूनस्मृतिमंदिरात आल्यावर त्याला जाणवलं की ध्रुव दूर गगनात असतोच, पण इथे भूमीवरही असतो. तेव्हाच तो प्रथमच त्याच्या ध्रुवासमोर बसला होता.
त्यानंतर तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्गात आला तेव्हा तर तो आणि त्या वर्गात सहभागी झालेले त्याचे संघसहचर सगळ्या रात्री स्मृतिमंदिरासमोरच जमत. मोकळ्या गप्पा करत, गीतं गुणगुणत खूप उशिरापर्यंत जागरणं करून जणू निरूपायाने निजायला जात. व्यवस्थेच्या पोटात शिरून रात्रीच्या दुधाचीही सोय एकाने केली होती. त्यामुळे वर चांदण्याचं दूध पसरलेलं आकाश आणि स्मृतिमंदिराच्या साक्षीने दुग्धपान करीत रमलेला स्वयंसेवक वृंद असं चित्रं पंचवीस रात्रींनी पाहिलं. तिथे खरंच काय मिळत होतं.. केवळ पेलाभर दुधासाठी ती जाग्रणं खासच नव्हती. त्या चैतन्याच्या सांन्निध्यात मनं उजळत होती, अंतरं समृद्ध होत होती, चित्तं एकाकार होत होती.. “समानो मंत्र: समिति: समानी l
समानं मन: सहचित्तमेषाम् ।l” चा तो पंचवीस रात्रींचा अनुभव नुकत्याच लावलेल्या निरांजनासारखा सगळ्यांच्याच मनात तेवत होता.
असा कितीदा आला.. तसाच आजही..
आज काय होतं? बैठक, वर्ग… काही काही नव्हतं. पण इथेच मन धाव घेत होतं. त्याचं त्याला आश्चर्य वाटत होतं की खरंच तो आलाय की…
कारण अन्यथाही स्मृतिमंदिरात घालवलेले क्षणच जपमाळेच्या मण्यासारखे पुनःपुन्हा चक्रगतीने येत होते आणि तो ते जपत होता.. जगत होता.
अजून वर सगुण साकार डॉक्टरांना पहायला पायऱ्या चढून जायचं होतं. समोर यज्ञकुंडावरची शेवटची विनवणी वाचून श्री गुरुजींचं स्मरण करायचं होतं.
त्याने डोळे मिटले. तो आता अधिक श्रद्धेने समाधीकडे पाहू लागला. श्रद्धेला प्रश्न पडत नाहीत. खरं तर श्रद्धेत प्रश्न उरत नाहीत. ह्याच्याही मनात प्रश्न उरले नव्हतेच…