Friday, December 27, 2024

पुण्यात उद्योगांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उदय सामंत यांचे निर्देश

Share

पुणे : उद्योगांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले. त्यांनी आश्वासन दिले की, रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंग समस्यांसह आवश्यक तेथे उद्योगांना जागा व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीत हिंजवडी, पिंपरी-चिंचवड, तळवडे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीतील उद्योगांच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. मंत्री सामंत यांनी नमूद केले की, पीएमआरडीएच्या माण-म्हाळुंगे टी.पी. स्कीमला लवकरच मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळेल, ज्यामुळे हिंजवडीसाठी पर्यायी रस्त्याचे काम जलद गतीने होईल.

वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकांतील टपऱ्या पोलीस विभागाच्या मदतीने हटवाव्यात, असेही मंत्री सामंत यांनी सुचवले. उद्योगांनी त्यांच्या वाहनांची रस्त्यावर पार्किंग होणार नाही याची खबरदारी घ्यावी. एमआयडीसीने महानगरपालिका व पीएमआरडीएच्या हद्दीतील मोकळ्या जागा शोधून ट्रक व इतर वाहनांसाठी पार्किंगसाठी प्रयत्न करावेत.

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील रस्त्यातील खड्डे, दुभाजक, पदपथ आदींची देखभाल दुरुस्ती तातडीने करण्याच्या दृष्टीने प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. सुविधांसाठी उद्योगांकडून घेतले जाणारे सेवा शुल्क परवडणारे ठेवण्यासाठी उद्योगांशी समन्वय साधून निर्णय घ्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.

तळेगाव येथील फ्लोरीकल्चर पार्कमधील उद्योगांना वाटप केलेल्या भूखंडांबाबत वस्तुस्थिती तपासून घ्यावी. तसेच वाटप केलेले विनावापर भूखंड अन्य उद्योगांना देण्याबाबत विचार करण्यात येईल. तळवडे माहिती तंत्रज्ञान पार्क येथील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी संरक्षण विभागाशी संपर्क साधण्याचे निर्देशही त्यांनी विभागाला दिले.

उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, पोलीस विभाग, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, एनएचएआय, व जिल्हा परिषद यांनी उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्रितपणे कार्य करावे.

बैठकीत सीसीटीव्ही प्रकल्प, लक्ष्मी चौक येथे उड्डाणपूल, घनकचरा व्यवस्थापन, पावसाच्या पाण्यासाठी वाहिन्यांचे बांधकाम, आणि बॉक्स कल्व्हर्ट यांसारख्या कामांबाबतही चर्चा झाली. राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील टप्पा क्र. 3 मध्ये पोलीस चौकीसाठी आवश्यक जागा पोलीस विभागाला देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

अन्य लेख

संबंधित लेख