Saturday, July 27, 2024

भगव्याचा अपमान करणाऱ्या उधोजीरावांचा शंभरावा अपराध: आता चुकीला माफी नाहीच

Share

भगव्या ध्वजाचा उल्लेख फडके’ असा करून भगव्याचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आपला हिंदूद्वेष अखेर दाखविलाच. हिंदुद्रोही ठाकरे म्हणजे अस्तिनीतील निखारे. हे निखारे वेळेवर झटकून टाकणे आवश्यक. ठाकऱ्यांसाठी भगवा ध्वज म्हणजे फडके’ असेल परंतु महाराष्ट्रासाठी, भारतासाठी भगवा म्हणजे प्राणाहून प्रिय. याच भगव्यासाठी पिढ्यानपिढ्या आहुती देणारा हा महाराष्ट्र आहे. उधोजीराव, तुमचा पापाचा घडा भरला आहे.

श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांस
भगवा नमस्कार,

आपण एका मुलाखातीमधे भगव्या ध्वजाचा उल्लेख ‘फडके’ असा करून भगव्या ध्वजाचा घोर अपमान केला आहे. हिंदूद्वेषी पक्षांशी तह करून या आधीच आपण आपले हिंदुत्व पोकळ असल्याचे दाखवून दिले होते. आम्ही त्याकडे राजकीय भूमिका म्हणून दुर्लक्ष केले. परंतु भगव्या ध्वजाचा ‘फडके’ असा उल्लेख करून आपण अखिल महाराष्ट्र धर्माचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, वारकरी संप्रदायाचा एवढेच नाही तर त्याग आणि बलिदानाची प्रेरणा देणाऱ्या परंपरेचा अवमान केला आहे.

गेली काही दिवस आपली वक्तव्ये हिंदू समाजाला अस्वस्थ करणारी होती. हिंदुत्वासाठी कायम उभ्या राहणाऱ्या संघटना आणि नेते यांचा आपण कायम असंस्कृत भाषेत उल्लेख करीत आहात. नवीन मित्रांच्या नादी लागून आपण केवळ वैचारिक भ्रष्टाचारच केला नाही तर हिंदुत्वाशीसुद्धा द्रोह केला आहे.

भगव्या ध्वजाची महती आपणास माहिती नाही, हे कोणीही मान्य करणार नाही. इतके दिवस आपण याच भगव्या ध्वजाच्या जिवावर राजकीय दुकानदारी करीत होता. मात्र, हिंदुत्वाचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाची संभावना फडके या शब्दात करून एखादी व्यक्ती सत्तेसाठी किती लाचार होऊ शकते याचा नवा धडा महाराष्ट्रासमोर आपण घालून दिला आहे. राजकारणापोटी अन्य पक्षांचा द्वेष करणे आम्ही समजू शकतो. परंतु, या द्वेषापोटी आपण भगव्या ध्वजाचा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन उल्लेख करणे आम्हाला बिलकुल मान्य नाही. भगवा ध्वज कुठेही असो, तो आम्हाला अत्यंत वंदनीय आहे. भगवा ध्वज खांद्यावर घेऊन जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भक्तिभावाने नमस्कार करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. याच भगव्या ध्वजाने छत्रपती शिवाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांना स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. याच भगव्या ध्वजाने आमची असंख्य देवळे आणि देव जीवंत ठेवले. याच भगव्या ध्वजामुळे हिंदू धर्म अत्यंत प्रतिकूल परिस्थितित टिकून राहिला. याच भगव्या ध्वजाच्या प्रेरणेमुळे आजही अनेक तरुण सीमेवर देशाचे रक्षण करीत आहेत. भगव्या ध्वजाच्या केवळ दर्शनामुळे मनामध्ये पवित्र भाव निर्माण होतात. भगव्या ध्वजामुळेच आम्हाला हिंदू धर्म आणि संस्कृतीचे स्मरण होते. भगव्या ध्वजामुळेच अयोध्येत भगवान श्रीरामांचे मंदिर अस्तित्वात आले. हाच भगवा ध्वज अखिल भारताचा रंग असल्याचे इतिहास सांगतो.

मात्र या सर्व वास्तवाचा आपणास सत्तेसाठी विसर पडला आहे. अलीकडे आपली दृष्टी हिरवी झाल्याचे दिसून येते कारण आपल्या सभेत हिरवे झेंडे दिसून येत आहेत. मतांसाठी आपण हिंदुत्वाला विसरला आहात. आपल्या पक्षातील फुटीमुळे झालेले राजकीय नुकसान भरून काढण्यासाठी आपण भगव्याचा अपमान करण्यास धजावला आहात. भगव्या ध्वजाला गुरुस्थानी समजणारा हिंदू समाज हे कधीही सहन करू शकत नाही. हाच भगवा ध्वज अखिल हिंदू समाजाच्या ऐक्याचे प्रतीक आहे. हिंदू समाजासाठी सर्वोच्च स्थानी असणाऱ्या भगव्या ध्वजाचा आपण केलेला अपमान हिंदू समाज कधीही सहन करणार नाही.

२०१९ पासून आपण सत्तेसाठी हिंदुविरोधी भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. भगव्याचा हा अपमान म्हणजे आपला शेवटचा अपराध आहे. शिशुपालाचा शंभरावा अपराध होईपर्यंत भगवान श्रीकृष्णाने संयम पाळला होता. हिंदू समाजसुद्धा आपल्या हिंदुविरोधी भूमिकडे याच भावनेतून बघत होता. हिंदू समाजाला प्राणप्रिय असणाऱ्या भगव्याचा अत्यंत क्षुद्र आणि निंद्य शब्दांत उल्लेख करून आपण शंभरावा अपराध केला आहे. याची शिक्षा आपल्याला २० मे रोजी होणाऱ्या मतदानात मिळेल याची आता खात्री बाळगा.

कळावे,
एक हिंदुत्वनिष्ठ मतदार

अन्य लेख

संबंधित लेख