Monday, October 7, 2024

उद्धव ठाकरेंचा मोदी द्वेष: चुकलेल्या राजकारणाची दिशा आणि दशा

Share

उद्धव ठाकरे सध्या भाषणांमधून व मुलाखतींमधून पंतप्रधान मोदींवर अतिशय खालच्या दर्जाची टीका करत सुटले आहेत. सत्ता व पक्ष हातातून निसटल्यामुळे कदाचित ते सैरभैर झाले आहेत. त्यांची मोदींवरील टीका ही राजकीय नसून वैयक्तिक वैफल्यातून आलेली आहे.

उद्धव ठाकरे आपल्या भाषणांतून वारंवार मणिपूर, तेथील महिलांवरील अत्याचार या गोष्टींचा उल्लेख करतात. सामाजिक अस्वस्थतेतून घडलेल्या मणिपूरमधील घटना कोणत्याही संवेदनशील मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेतच. पण त्यानंतर अमित शाह आणि अनेक भाजपचे मंत्री मणिपूरला नियमित भेटी देत आहेत. शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून झटत आहेत. उद्धव मुख्यमंत्री असताना पालघर जिल्ह्यात हिंदू साधूंचे पोलिसांच्या देखत हत्याकांड झाले. तेंव्हा मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे घटनास्थळी गेले होते काय? उलट हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. याच ठाकरे सरकारच्या काळात दिशा सालियन आणि पूजा चव्हाण या दोन महिलांचा वरच्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. या दोन तरुण मुली आणि सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केल्याचे भासविले गेले असले तरी पोलीस या घटनांचा खुनाच्या अंगाने सुद्धा तपास करत आहेत. त्यात संजय राठोड, आदित्य ठाकरे यांसारखी मातब्बर उद्धवसेनेच्या घरातली मंडळी संशयित यादीत आहेत. यावर ठाकरेंना कधीच बोलावेसे वाटले नाही? शिवाजी राजांचा आदर्श सांगता ना? छत्रपती शिवाजीराजांनी निव्वळ संशयावरून संभाजीराजांना न्यायालयात उभे केले होते. जनतेच्या समोर वाद प्रतिवाद झाले होते. शिवसेना नावाची हौस असणाऱ्या ठाकरेंना या इतिहासाचा विसर पडला आहे काय?

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात स्पष्ट म्हणतात कि आम्ही आमच्या मुलांसाठी लढतोय. परिवारवादाचा पुरस्कार करणारे हे वाक्य ऐकल्यावर कोणता मराठी मुलगा, उद्धवसैनिक मिंधेपणाने आपल्या मागे उभा राहील ठाकरे साहेब? राज्य हे समाजासाठी चालवायचं असतं. स्वतःलाच आणि मुलांना पदे, सत्ता, प्रतिष्ठा मिळावी म्हणून नाही. स्वतःला अत्यंत नम्रतेने प्रधानसेवक म्हणणाऱ्या आणि तद्नुसार वर्तन करणाऱ्या मोदींकडे समाज स्वाभाविकपणे वळेल नाही तर काय होईल? मग EVM हॅक झाले अशी ओरड करायला विरोधक आणि ठाकरे मोकळे. 

कलम ३७० विषयी कसलीही कायदेशीर आणि वास्तविक माहिती नसताना ठाकरे काँग्रेस आणि काश्मिरी विरोधी नेत्यांची री आपल्या भाषणातून ओढत आहेत. वर अदानी उद्योगसमूहाने तिथे जमिनी विकत घेतल्या म्हणत आहेत. त्यांच्या म्हणण्यात सत्यता असेल आणि तिथे खरंच युरेनियमचे साठे मिळाले असतील तर अशी खाण जमीन विकत घेण्यासाठी किती प्रचंड पॆसा लागतो याची कल्पना तरी ठाकरे यांना आहे का? इतका पैसा भारतीय गुंतवणूकदाराकडे आहे हि अभिमानाची बाब नाही का? आणि युरेनियमसारख्या महत्वाच्या खाणीची मालकी भारतीय समाजातच राहणे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नाही का? अदानी केवळ गुजराती व्यावसायिक आहेत, कोणी परदेशी गुंतवणूकदार नाही. एक भारतीय गुंतवणूकदार काँग्रेस आणि आता ठाकरे यांच्या डोळ्यात का खुपतो असा सवाल कोणी पत्रकार त्यांना का विचारत नाही? 

उद्धव ठाकरे यांची अजून एक पोटदुखी म्हणजे नोटबंदी. सुप्रीम कोर्टानेही या निर्णयाची तारीफ केली आहे. बँकांची वाढलेली खाती, सरकारी तिजोरीत जमा होणारा कितीतरी जास्त कर, काश्मीरमधली बंद झालेली दगडफेक काळ्या पैशाच्या जोरावर चालू असणारे धंदे बंद होणे असे कित्येक नोटबंदीचे फायदे सामान्य जनतेला दिसत आले आहेत. त्यामुळे जो नोटबंदीच्या विरोधात ओरडतो त्याने प्रचंड काळा पैसा दाबला होता तो मातीमोल झाला हे आता लोकांना नीट माहित आहे. अश्याने उद्धवजी स्वतःच उघडे पडतात नाही का?

मोदीद्वेषाने आंधळे झालेले उद्धव मोदींनी ७५व्या वर्षी निवृत्त व्हावे असे सुचवतात. कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराशी अतिशय मेहनतीने झुंजणाऱ्या माननीय शरद पवार यांना ठाकरे हे सुचवायची हिम्मत करणार का?  शरद पवार यांचा इतिहास पाहता ते नेहमीच अडचणीत आल्यावर काँग्रेसच्या वळचणीला गेलेले आहेत हे उघड आहे. ठाकरेंचे सध्याचे मार्गदर्शक, गुरु, पालक शरदराव आहेत. पवारांनी स्वतःच एका मुलाखतीदरम्यान सगळे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे मत व्यक्त केलेले आहे. त्यामुळे जाब विचारायचा असेल तर तो शरद पवार यांना उद्धवरावांनी विचारला पाहिजे.  

आज सगळ्या गुजराती समाजाला आणि गुजरात राज्याला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राने शत्रुपक्षात टाकले आहे. का? तर सगळ्या जगात ज्याचा डंका पिटला जातो असे सर्वार्थाने खऱ्या सेक्युलर पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचे मूळ राज्य गुजरात आहे म्हणून. आज उध्दव स्वतः आणि त्यांची सेना गुजरातला नाही नाही ते बोलत आहेत, औरंग्याचे जन्मस्थान म्हणत आहेत. उद्या निव्वळ स्वार्थासाठी ‘महाराष्ट्र हे वेगळे राष्ट्र आहे, त्याचा आणि भारताचा काहीही संबंध नाही’ असे म्हणायलाही ते यत्किंचित कचरणार नाहीत. भारतीय जनतेला भाषा, प्रांत, जातीधर्माच्या नावाखाली विलग करणे ही तर केवळ सुरुवात आहे. यांना संधी मिळाली तर सत्तेच्या उन्मादात संविधान बदलून नाही तर संपवूनही टाकायच्या मार्गाला हे लागतील. 

मोदींच्या ‘मां गंगाने मुझे बुलाया हैं’ या वाक्याची हेटाळणी करताना त्यांना त्यांच्या अधिकारातील शिवसेनेने केलेला मिठी नदीतला भ्रष्टाचार आठवत नसतो. केवळ १८ किलोमीटरची ही नदी स्वच्छ करण्यासाठी त्यांना केंद्रातून पैसे मिळावेत अशी अपेक्षा असते. मोदींनी नमामी गंगे प्रकल्पाअंतर्गत जे अद्भुत बदल आणि स्वच्छता कार्य हाती घेतले आहे त्यातले एक अक्षर तरी ठाकरेना समजत असेल का? 

कोविड काळात गंगेत वाहणारी प्रेते यावर जेव्हा ठाकरे भाष्य करतात तेव्हा महाराष्ट्रात झालेला PPE किट घोटाळा, रेमदेसिविर घोटाळा, जम्बो सेन्टर घोटाळा, लिकर घोटाळा असे अनेक घोटाळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांना माहितीच नाही असे सामान्य जनतेने गृहीत धरावे का? 

स्वतःला बेस्ट CM अशी उपाधी ठाकरे कायम लावत असतात. ज्या सर्व्हे मध्ये हा रिझल्ट आला तो १३ राज्यांतील केवळ १७००० मतदारांनी नोंदवलेल्या मतावरून आला आहे. म्हणजे सगळे १७००० मतदार मराठी आहेत असे गृहीत धरले तरीही १० कोटी मराठी जनतेपैकी केवळ ठाकरेंना मिळालेल्या ४९% टक्के, ६५०० लोकांना ठाकरे Best CM वाटत असावेत. मोदींना देशातीलच नाही जगाला चालवणारे नेते बॉस वगैरे उपध्या देतात. त्यांच्या सह्या घेतात. मोदींनी एका अक्षरानेही याचा गवगवा केलेला पाहण्यात नाही. 

अमिता आपटे
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या असून आंतरराष्ट्रीय आणि ईशान्य भारतातील प्रश्नांच्या अभ्यासक आहेत)

अन्य लेख

संबंधित लेख