Saturday, September 7, 2024

बारीपाड्याचे वनभूषण : चैत्राम पवार

Share

एक ध्येय समोर ठेवून लोकचळवळ उभारली तर अशक्यही शक्य होते, हे चैत्राम पवार यांनी दाखवून दिले आहे. वन दिनाच्या (२१ मार्च) निमित्ताने चैत्राम पवार यांच्या कार्याचा परिचय.

महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ बारीपाड्याचे चैत्राम पवार यांना जाहीर झाला आणि ‘वृक्ष मित्र’ म्हणून ओळखले जाणारे चैत्राम पवार कोण आहेत, याचा महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने शोध लागला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दुर्गम बारीपाडा वनवासीपाडा असून ओसाड असलेल्या या पाड्याचे नंदनवन करणाऱ्या चैत्राम पवार यांच्या कामाचा राज्याच्या वन विभागाकडून गौरव करण्यात आला आहे. हा खऱ्या अर्थाने निसर्ग पूजक व्यक्तीचा सन्मान आहे.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ ही संत-महात्म्यांनी आपल्याला दिलेली शिकवण आहे. भारतीय संस्कृती पाहिली तर आपण निसर्ग पूजक समाजात राहतो. आपल्या विविधतेत एकता आहे आणि त्यात सर्वत्र निसर्गपूजन आहे. वृक्षांची पूजा करणे, त्यांचे संगोपन व रक्षण करणे, त्यांना देव मानणे, प्राण्यांची पूजा करणे, त्यांना नमस्कार करणे, त्याचप्रमाणे झाडांचा केवळ औषधी म्हणून वापर करणे हे आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वापार चालत आलेले आहे. वनवासी समाजाने नेहमीच या जंगलांचे रक्षण केले आहे, तसेच सेवाही केली आहे. याच शृंखलेत बारीपाड्याचे वृक्षमित्र चैत्राम पवार यांची वृक्ष सेवा जोडली गेली असून, त्यांचे नाव पहिल्या ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कारा’वर छाप पाडण्यापर्यंत जाऊन पोहोचले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्थानिक नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहित करणे, राखीव वनक्षेत्र आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांत वृक्षलागवड करणे; तसेच वनसंवर्धन करणे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आणि इतरांना नक्कीच प्रेरणा देणारे ठरले आहे. गावकऱ्यांबरोबर केलेल्या श्रमदानातून बारीपाडा या आदिवासी पाड्याचा आणि परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम ज्या चैत्राम पवार यांनी केले, त्यांना महाराष्ट्राच्या पहिल्या वनभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि बारीपाडा हे गाव खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या नकाशावर झळकले.

बारीपाड्याच्या विकासाची ही लोकचळवळ १९९२ नंतर सुरू झाली. पिण्याच्या पाण्याची भ्रांत, उजाड माळरान, शेतात पीक नाही, गावात अशिक्षित आणि निरक्षर लोकांचीच संख्या अधिक; तसेच झाडांची संख्यादेखील कमी, अशा परिस्थितीत बारीपाडा गाव होते. परंतु या गावात महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, सकस आहार, स्वच्छता, पाण्याच्या वापराबाबत जनजागृती, शौचालयाचा वापर, आरोग्य संवर्धनाबाबत करण्यात आलेले जागृतीचे उपक्रम राबवण्यात आले. याचाच परिणाम म्हणून जगातील ७८ देशांमध्ये चांगले गाव कसे असावे याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्वेक्षणामधून बारीपाडयाने दुसरा क्रमांक पटकावला. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या पाड्याला मिळालेल्या या पुरस्कारात चैत्राम पवार यांचे मोलाचे योगदान होते. त्याचप्रमाणे बारीपाडा प्रकल्पास अत्यंत मानाचा समजला जाणारा IFAD या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कारदेखील मिळालेला आहे.

मागील २६ वर्षांपासून नेहमीच कार्यकर्ता भाव जपणाऱ्या चैत्राम पवार यांनी नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि सक्षमीकरण याचबरोबरीने वनहक्क कायदा, कृषी विकास आणि शाश्वत विकास या विषयांवर वनवासी समाजाबरोबर काम केले आहे. वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील शंभरच्या आसपास गावांमध्ये आपल्या सामाजिक कार्याचा विस्तार केला असून, सध्या मराठवाडा आणि खानदेश भागासाठी वनवासी कल्याण आश्रमाचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

कार्याची दखल
संरक्षित क्षेत्रातून लागवड नसलेल्या रानभाज्यांची रेसिपी तयार करून स्थानिक जंगलातील पारंपरिक माहिती त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवली. आवश्यक असलेल्या पाण्याच्या साठ्याचा सिंचनासाठी काटकसरीने वापर करणे, मृद व जलसंधारणाची कामे करणे, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे, अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबतचे महत्त्व पटवून देणे, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक करणे, याकरिता त्यांनी सातत्याने काम केलेले आहे. त्यामुळेच त्यांनी केलेल्या या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि त्यांचा ‘महाराष्ट्र वनभूषण’ या पुरस्काराने सन्मान केला.

चैत्राम पवार यांना यापूर्वीदेखील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी – २०२३, भारत जैवविविधता पुरस्कार – २०१४, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, डॉ. हेडगेवार स्मृती सेवा निधी कार्य पुरस्कार, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार, आदिवासी अस्मिता पुरस्कार, नातू फाउंडेशनकडून दिला जाणारा ‘सेवाव्रत कार्यकर्ता पुरस्कार’, पु. भा. भावे स्मृती पुरस्कार, संस्कार कवच पुरस्कार, गो. नी. दांडेकर स्मृती नीरा गोपाल पुरस्कार आणि राज्य शासनाच्या जलनायक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. एवढे पुरस्कार मिळाले असूनही चैत्राम पवार यांचे पाय जमिनीवर आहेत आणि विविध मार्गांनी त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.

एक ध्येय समोर ठेवून लोकचळवळ उभारली तर अशक्यही शक्य होते, हे चैत्राम पवार यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे ‘जागतिक वन दिना’च्या निमित्ताने ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कारा’ने सन्मानित चैत्राम पवार यांचा आदर्श घेऊन, वनांचे संरक्षण व संवर्धन करून, जीवसृष्टीचेही संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी कृती करण्याचा संकल्प केला पाहिजे.

प्रतिनिधी
(महाराष्ट्र नॉलेज सेंटर)

अन्य लेख

संबंधित लेख