Sunday, April 13, 2025

वेदमंत्राहून आम्हा वंद्य ‘वंदे मातरम्’

Share

चित्रप्रदर्शनीतून उलगडला ‘वंदे मातरम्’चा इतिहास

‘वंदे मातरम्’ (Vande Mataram) हे केवळ दोन शब्द नाहीत तर भारतीय नागरिकांसाठी हा एक मंत्र आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देताना क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या ओठी ‘वंदे मातरम्’ हाच मंत्र होता. म्हणूनच या गीताचे ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ असे समर्पक वर्णन महाराष्ट्र वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांनी केले आहे. पुण्यात (Pune) भरविण्यात आलेल्या वंदे मातरम् भारतमाता चित्रप्रदर्शनीतून ‘वंदे मातरम’चा इतिहास उलगडून दाखवण्यात आला आहे.

‘वंदे मातरम’ या राष्ट्रमंत्राच्या सार्ध शती म्हणजेच दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त तसेच ऋषी बंकिमचंद्रांच्या १३१ व्या स्मृतीदिनानिमित्त ऋषी बंकिमचंद्र स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात ‘वंदे मातरम्’चा इतिहास मांडणाऱ्या गेल्या सव्वाशे वर्षात नामवंत भारतीय चित्रकारांनी रेखाटलेल्या भारतमातेच्या चित्रांचे प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आले असून त्याचे उदघाटन खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. ‘वंदे मातरम’चे अभ्यासक मिलिंद सबनीस, ज्येष्ठ चित्रकार चंद्रशेखर जोशी, अनिल उपळेकर या वेळी उपस्थित होते. प्रदर्शनाचे संयोजन मकरंद केळकर, मिलिंद सबनीस आणि मकरंद केळकर यांनी केले आहे. शनिवारपर्यंत (१२ एप्रिल) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

प्रदर्शनात काय पहाल…
या प्रदर्शनात गेल्या सव्वाशे वर्षांत विविध मान्यवर चित्रकारांच्या कुंचल्याच्या प्रतिभेतून साकारलेली भारतमातेची रूपे पाहावयास मिळतात. रावबहादूर धुरंधर, दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर, अल्लाबक्ष, पं. श्रीपाद दा. सातवळेकर, अवनीन्द्रनाथ ठाकूर, वासुदेव कामत, सुहास बहुळकर यांच्या मुद्रित चित्रांसह जि. भी. दीक्षित, अनिल उपळेकर, सचिन जोशी, गिरीश सहस्रबुद्धे, चंद्रशेखर जोशी यांची मूळ चित्रेही प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. प्रदर्शनाची संगणकीय मांडणी अनंत कुलकर्णी यांची आहे. या प्रदर्शनाला ‘वंदे मातरम्’ सार्ध शती जयंती समारोह समिती आणि भारतीय इतिहास संकलन समितीचे सहकार्य लाभले आहे.

भारतीयांच्या दृष्टीने देश म्हणजे केवळ भौगोलिक भाग नाही तर ती मातृभूमी आहे. यातूनच देशाकडे राष्ट्र आणि माता या भूमिकांमधून पाहिले जाते. युवा पिढीनेही आपण देशाचे देणे लागतो या भावनेतून मातृभूमीकडे बघणे आवश्यक आहे. ‘वंदे मातरम्’चा इतिहास मांडणारे आणि भारतमातेच्या चित्रांद्वारे मातृभूमीची विविध रूपे दर्शविणारे हे प्रदर्शन पाहताना एकात्मतेचा संदेश मिळत असल्याने देशवासियांनी भावंडांसारखे एकत्र राहिले पाहिजे, ही भावना मातृभूमी जागृत करत असल्याचे जाणवते, असे मत खासदार प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांनी या प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी व्यक्त केले.

ऋषी बंकिमचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. रेव्हरंड टिळक रचित ‌‘वन्दे त्वाम्‌‍ भू देवीं‌’ या अपर्णा केळकर यांनी संगीत दिलेल्या गीताचे गायन स्वानंदी वाणी आणि साव्या कुलकर्णी यांनी केले. मास्टर कृष्णराव फुलंब्रिकर यांनी संगीतबद्ध केलेल्या संपूर्ण ‘वंदे मातरम’च्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. बंकिमचंद्र यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित या स्मृतीमहोत्सवाची सांगता शनिवारी (१२ एप्रिल) रोजी दुपारी एक वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ‌‘आनंदमठ‌’ या संगीत नाटकाच्या प्रयोगाने होणार आहे.

भारतमाता पुन्हा एकदा सिंहासनावर आरूढ होऊन आपल्या लेकरांना सांभाळून घेत देशाला सुरक्षा, शांतता, स्थैर्य देईल असा विश्वास वाटतो. ऋषी बंकिमचंद्र यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीवर आधारीत ‌‘आनंदमठ‌’ हे संगीत नाटक हिंदीत यावे, जेणे करून ते राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत होईल.
प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी, खासदार, राज्यसभा

अन्य लेख

संबंधित लेख