Monday, June 24, 2024

सावरकर आणि हिंदू राष्ट्रीयत्वाचे स्वप्न

Share

स्वा. सावरकर यांची आज जयंती. कोणताही मानसन्मान पदरी न पडताही सावरकर विजयी ठरले. या हिऱ्याच्या तेजाच्या प्रकाशात आज हिंदू समाज आणि भारत विश्व संचार करीत आहे.

आज २८ मे रोजी एका शापित यक्षाचा जन्म झाला. विनायक दामोदर सावरकर. संस्कृती, राष्ट्रीयत्व, ध्येयवाद, तत्वज्ञान या बाबींचे विस्मरण होते असा समाज व त्याहून महत्त्वाचे म्हणजे असे नेतृत्व, हे इतके विकलांग बनते की तेजाकडे पहाण्याची क्षमताही संपते. अशा नेतृत्वाकडून सावरकर उपेक्षित रहाणे तर अपेक्षित होतेच पण संकुचित द्वेषाला त्यांना समोरे जावे लागावे हे अक्षम्य होते पण तसे घडले. म्हणूनच ते शापित वाटतात. नाही शापित ठरतात. व यक्षाचा संबंध कलेशी आहे व आपला नायक तर कलेचे एकही असे अंग नसेल ज्याला स्पर्षुन गेला नाही. म्हणून वीर सावरकर हे शापित यक्ष आहेत.

परंतु असे शापित काही सावरकर एकटे नाहीत. ज्यांच्या नावाचा उच्चार केल्या शिवाय एक पाऊलही सार्वजनिक जीवनात टाकता येत नाही अशा छत्रपती शिवाजी महाराज यांची अवस्था या तत्वज्ञानशून्य नेतृत्वाने काही वेगळी केली नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण देशाचा विचार केला, हिंदू समाज व संस्कृतीचा विचार केला, काशी विश्वेश्वराचा विचार केला, हिंदू राज्याभिषेकाचा विचार केला, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांना या नेतृत्वाने महाराष्ट्राचे ठरवून टाकले व सर्व जगाला जे नेतृत्व मार्गदर्शन करणार त्यांची आसेतुहिमाचल प्रतिभा सह्याद्री पुरती छोटी करायचा प्रयत्न केला.

अशा क्लैब्य अव्यस्थेतील देशात व समाजात या महापुरुषांच्या वाट्याला अजून काय येणार? पण मला वाटते की या सर्व महापुरुषांनी देवाकडे भांडून ही कर्मभूमी व हा समाज मागून घेतला असणार.

स्वातंत्र्य पूर्व काळात शत्रुशी लढा होता. त्या हाल अपेष्टा समजू शकतो. पण स्वतंत्र भारतात उपेक्षा व द्वेष एकाचवेळी? अहो आश्चर्यम्. उपेक्षेने मारावे एवढे ते सामान्य नव्हते व द्वेषाने जाळावे तर सावरकर व्यक्तिविलोप अवस्थेत जगत होते. पाकिस्तानचा पंतप्रधान येणार म्हणून देशभक्ताला तुरूंग? पण ज्या देशासाठी दोन काळ्या पाणी भोगले त्या देशातील नेतृत्वाने हूं की चूं केले नाही. पण सावरकरांचे सोडून देऊ. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाट चुकलेला नेता अशी संभावना ज्या देशाच्या सर्वोच्च नेत्याने केली होती त्याचा साधा निषेधही आम्ही केला नव्हता. अशा कृतघ्नतेवर सुद्धा सावरकर रागावले नाहीत. म्हणजे नक्कीच या सर्व महापुरुषांनी हे आयुष्य मागून घेतले असेल.

याचे कारणही स्पष्ट आहे. या विश्वाच्या पसाऱ्याचे सुचारु चलन वलन व्हावयास हवे असेल तर हा हिंदू समाज क्लैब्यातून बाहेर काढून पुरूषार्थी बनवायला हवा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक करवून घेतला, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उपेक्षा, उपहास, द्वेषाचा स्वीकार पत्करला. पण सावरकरांना दिली गेलेली प्रत्येक शिवी ही हिंदू समाजासाठी चैतन्य शलाका ठरली. सावरकरांना पार्थिव सोडून ६० हून अधिक वर्ष झाली तरी निवडणुकीच्या रिंगणात माफीवीर ही शिवी फिरते. पण त्याच वेळी तरुण हिंदू संतापून उठतो व हेच तर सावरकरांना साधायचे होते. लाकडी ओंडक्यासारखा असलेला हिंदू समाज लोखंडी कांबे सारखा बनवायचा होता व तो बनला.

स्वातंत्र्यवीर सावरकर या अर्थाने अवध्य मी ठरले.
उपेक्षा, उपरोध असूनही १५ अॉगस्टला तिरंगा फडकवून त्यांनी दिशा दिली देश स्वातंत्र्य सर्वोपरी.
विद्युत शलाका सावरकर जळून गेल्यावर कोळसा नाही, हिरा झाले. ज्या हिऱ्याच्या तेजाच्या प्रकाशात आज हिंदू समाज व भारत विश्व संचार करीत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचवलेल्या मनगटात तलवारीची ताकद व हृदयात विश्व चिंतनामुळे आलेली करूणा घेऊन भारत वाटचाल करत आहे.

म्हणून कोणताही मानसन्मान पदरी न पडताही सावरकर विजयी ठरले, कालजयी ठरले.
आज त्यांचे पुण्यस्मरण करू या अथक प्रयत्नांसाठी.

सुनील देशपांडे
(लेखक ब्लॉगर असून ते विविध सामाजिक विषयांवर लेखन करतात.)

अन्य लेख

संबंधित लेख