मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’ सारख्या चित्रपटातून वास्तव मांडणारे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी भव्य चित्रपटाची घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेवर हा चित्रपट आधारित असणार आहे. विवेक अग्निहोत्री यांनी स्वतःच्या ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावरून ही माहिती दिली आहे.
हा चित्रपट लेफ्टनंट जनरल के.जे.एस. ‘टिनी’ ढिल्लन (निवृत्त) यांच्या ‘ऑपरेशन सिंदूर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक्स इनसाईड पाकिस्तान’ या पुस्तकावर आधारित आहे. भूषण कुमार यांची ‘टी-सीरीज’ आणि विवेक अग्निहोत्री यांची ‘आय.एम.बुद्धा प्रॉडक्शन्स’ संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
निर्माते भूषण कुमार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “काही कथा आपली निवड करतात आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ त्यापैकीच एक आहे. भारताने आतंकवादाला कशा प्रकारे धडा शिकवला, हे जगाला समजणे आवश्यक आहे. हा चित्रपट म्हणजे भारतीय इतिहासातील एका मोठ्या घटनेचा जिवंत दस्तऐवज असेल.”
या चित्रपटाविषयी बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले, “या चित्रपटाच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचा ‘न्यूक्लियर ब्लफ’ (अण्वस्त्रांची भीती) कसा उघड केला आणि आधुनिक युद्धशास्त्रात स्वतःचे सामर्थ्य कसे सिद्ध केले, हे दिसून येईल. भारतीय सशस्त्र दलाच्या विविध विभागांच्या सहकार्याने आणि सखोल संशोधनातून ही कथा समोर आणली जात आहे. यातील वास्तव अस्वस्थ करणारे पण प्रेरणादायी आहे.”
पहलगाम आक्रमणाचा प्रतिशोध घेण्यासाठी भारताने केलेल्या या खोलवरच्या हल्ल्याची (Deep Strikes) थरारक कथा चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या घोषणेमुळे सिनेसृष्टीत आणि देशभक्त प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.