Wednesday, December 4, 2024

नवा मुख्यमंत्री कोण? दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले

Share

मुंबई : शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुंबईतील राजभवन येथे अधिकृतपणे राज्यपाल सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांच्याकडे राजीनामा (Resignation) सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. शिंदे यांच्यासोबत दीपक केसरकर देखील होते. राजीनामा सादर केल्यानंतर राजभवनाबाहेर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माध्यमांशी संवाद साधत या निर्णयावर स्पष्टीकरण दिले.

केसरकर म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. नवीन सरकार स्थापनेपूर्वी ही एक औपचारिकता असते.” तसेच, राज्यपालांनी शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे. आजपासून ते या भूमिकेत काम करतील.”

नवीन सरकार कधी?
सरकार स्थापन होण्याच्या प्रश्नावर केसरकर म्हणाले, “नवीन सरकार लवकरच स्थापन होईल. भाजपची गटनेता निवडीसाठी उद्या बैठक होऊ शकते. तिन्ही पक्षाचे नेते त्यानंतर चर्चा करून पक्षश्रेष्ठींकडे निर्णय पाठवतील. जो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, तो मान्य असेल.”

मुख्यमंत्री कोण?
मुख्यमंत्री कोण होणार, या प्रश्नावर केसरकर यांनी सांगितले की, “प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की, त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. तिन्ही पक्षांनी ठरवले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य असेल.”

‘आम्ही तिघेही एकत्र आहोत’
शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना केसरकर म्हणाले, “एकनाथ शिंदे अजिबात नाराज नाहीत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत बैठक बोलावली तर शिंदे तिथे जातील. आम्ही तिघेही एकत्र आहोत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र काम करू.”

नवीन सरकार स्थापनेसाठी महायुतीतील हालचाली आता वेग घेत आहेत, आणि राज्याचे भवितव्य निश्चित करण्यासाठी येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची अपेक्षा आहे.

अन्य लेख

संबंधित लेख