यवतमाळ : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या वतीने यवतमाळ जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या ‘यवतमाळ महोत्सव २०२६’ चे आयोजन २७ ते ३१ मार्च या कालावधीत वाघापूर येथील कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्रावर करण्यात आले आहे. या महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन उद्या, शुक्रवार २७ मार्च रोजी दुपारी ३:०० वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पाच दिवसीय महोत्सवात नागरिकांना एकाच छताखाली अनेक गोष्टींचा अनुभव घेता येणार आहे. यात प्रामुख्याने,
कृषी आणि पशु प्रदर्शन: शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार पशुधनाचे दर्शन.
समृद्धी सरस व नव तेजस्विनी प्रदर्शन: महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री आणि फूड झोन.
ग्रंथोत्सव: वाचन संस्कृती जोपासण्यासाठी भव्य पुस्तक प्रदर्शन.
सांस्कृतिक महोत्सव: स्थानिक आणि निमंत्रित कलाकारांचे बहारदार कार्यक्रम.
शासकीय दालने: सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टॉल्स.
महोत्सवासाठी एकूण ८ भव्य डोम उभारण्यात आले असून, त्यात कृषी विभागाचे २०० स्टॉल्स असणार आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), उमेद अभियान, आत्मा आणि नगर परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे नियोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन सोहळ्याला आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार संजय देशमुख, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला असून, हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
“यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रमंडळींसह या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट द्यावी आणि शासनाच्या विविध योजनांसह कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.