नवी दिल्ली – भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात जनजातीय समाजाचा सहभाग आणि त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून त्यातील तेजस्वी नायक म्हणजे भगवान बिरसा मुंडा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केलेल्या निवेदनात त्यांनी जनजाती समाजाच्या अस्मिता, संस्कृती आणि श्रद्धेच्या रक्षणासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले.
होसबाळे म्हणाले, “भगवान बिरसा मुंडा हे केवळ स्वातंत्र्यवीर नव्हते, तर त्यांनी जनजाती समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक पुनर्जागरणासाठी प्रखर चळवळ उभारली. ‘अबुआ दिशुम, अबुआ राज’ (आपला देश, आपले राज्य) हे त्यांचे घोषवाक्य जनतेच्या आत्मबोधाचे प्रतीक बनले.”
१८७५ मध्ये झारखंडमधील उलीहातू येथे जन्मलेले बिरसा मुंडा यांनी केवळ २५ वर्षांच्या आयुष्यात ब्रिटिश राजवटीच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध सशस्त्र आंदोलन उभारले. वने आणि जमीन ताब्यात घेणाऱ्या ब्रिटिशांच्या धोरणांमुळे जनजाती समाज उद्ध्वस्त होत असताना बिरसांनी त्याच्या हक्कांसाठी संघर्ष छेडला.
होसबाळे यांनी मिशनरी शाळांमधील जबरदस्तीच्या मतांतरण धोरणांकडेही लक्ष वेधले. “बिरसा मुंडा यांनी बालवयातच मतांतरणाचे षड्यंत्र ओळखले. धार्मिक अस्मिता हरवल्यास समाजाची ओळख नष्ट होते, हे त्यांनी अनुभवले आणि समाजजागरणासाठी स्वतःला झोकून दिले,” असे त्यांनी नमूद केले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदानाचे स्मरण करताना त्यांनी सांगितले की, “२५ व्या वर्षी कारागृहात झालेल्या त्यांच्या बलिदानाने संपूर्ण जनजाती समाज एकत्रित झाला. त्यांना ‘धरती आबा’ म्हणून जनजाती समाज आजही देवतासमान मानतो.”
भारत सरकारने संसद भवन परिसरात त्यांची प्रतिमा स्थापन केली असून दरवर्षी १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजाती गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
वर्तमान परिस्थितीचा उल्लेख करताना होसबाळे म्हणाले, “आज काही विभाजनवादी विचारसरणी भारतातील जनजाती समाजाबाबत चुकीचे आणि दिशाभूल करणारे कथानक उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी बिरसा मुंडा यांचे जीवन आणि त्यांची संघर्षगाथा समाजात स्वबोध, आत्मविश्वास आणि एकात्मतेचा दीप प्रज्वलित करणारी ठरेल.”
देशातील स्वयंसेवक व समाजाला त्यांनी आवाहन केले की, “भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनमूल्यांचा स्वीकार करून स्वबोधाने युक्त, संगठित आणि स्वाभिमानी समाज उभारण्याच्या कार्यात सर्वांनी सहभाग नोंदवावा.”