Friday, September 13, 2024

लोकसभा निवडणुकीत भारताचा जागतिक विक्रम: सर्वात मोठा लोकशाही देश

Share

लोकसभा निवडणुक : एक ऐतिहासिक टप्पा गाठताना, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भारताने ६४.२ कोटी मतदारांनी सहभाग घेऊन एक नवीन जागतिक विक्रम केला आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) मतमोजणीच्या पूर्वसंध्येला लोकशाही सहभागासाठी देशाची बांधिलकी दर्शविणारी ही ऐतिहासिक कामगिरी जाहीर केली.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील ECI ने या यशाचा ‘चमत्कार’ म्हणून गौरव केला. ३१.२ कोटी महिला मतदारांनी सहभाग घेतल्याने, या निवडणुकांमध्ये महिला सहभागाची अभूतपूर्व पातळी दिसून आली, ज्यामुळे लोकशाही प्रक्रियेत महिलांच्या समावेशकतेसाठी देशाची वचनबद्धता अधिक दृढ झाली.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत १.५ कोटी मतदान कर्मचारी, ६८७६३ निरीक्षण पथकं, १३५ विशेष गाड्या, ४ लाखांहून अधिक वाहने आणि १६९२ हवाई उड्डाणांसह मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन करण्यात आले. मतदानाच्या व्याप्ती मोठी असूनही निवडणूक आयोगाने २०१९ च्या निवडणुकांच्या तुलनेत कमी फेर मतदान प्रक्रिया राबविली आहे. मागील निवडणुकीतील ५४० फेर मतदान घटनांच्या तुलनेत यावर्षी फक्त ३९ ठिकाणी फेर मतदान झाले आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या चार दशकांमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. तसेच या निवडणुकीत हिंसाचार झाला नाही. देशभरातील निवडणुका शांततेत आणि व्यवस्थित पार पडल्याचा हा दाखला आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची रेकॉर्डब्रेक संख्या सर्व G7 देशांच्या मतदारांच्या १.५ पट आणि युरोपियन युनियनमधील २७ देशांच्या मतदारांच्या २.५ पट आहे. मतदानाचा हा विक्रमी आकडा भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे यावर शिक्कामोर्तब करणारा आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याची भारतीय निवडणूक आयोगाची क्षमता दर्शवितो.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या ४ जून रोजी जाहीर होणार असल्याने, ६४.२ कोटी मतदारांनी सहभाग घेतलेले यश हे भारताच्या लोकशाही संस्थांच्या सामर्थ्याचा आणि राजकीय प्रक्रियेत तेथील नागरिकांच्या सहभागाचा पुरावा आहे.

अन्य लेख

संबंधित लेख