महाराष्ट्र : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी तथा राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार (MP Sunetra Pawar) यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी त्यांना राज्यसभेत पाठवले होते. पहिल्याच कार्यकाळात त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तालिका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी एक्स पोस्टद्वारे त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, “राज्यसभेतील चर्चेला योग्य दिशा देणे, संसदीय कामकाजाची शिस्त कायम राखणे आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘तालिका अध्यक्ष’ पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार श्रीमती सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा!”
सुनेत्रा पवार यांच्यासह आठ खासदार तालिका अध्यक्षपदी नियुक्त, अनुपस्थितीत राज्यसभेचे कामकाज सांभाळणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण आठ खासदार तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड आणि उपाध्यक्ष हरिवंश यांच्या अनुपस्थितीत हे आठ खासदार सभागृहाचे कामकाज चालवतील.
तालिका अध्यक्षपदी नियुक्त आठ खासदार
सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या सुश्मिता देव, भाजपच्या किरण चौधरी आणि संगीता यादव या चार महिला खासदारांची निवड करण्यात आली आहे. तसेच, भाजपचे घनश्याम तिवारी आणि डॉ. दिनेश शर्मा, द्रमुकचे पी. विल्सन आणि आम आदमी पक्षाचे विक्रमजितसिंग साहनी या खासदारांची तालिकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.