नागपूर : शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मानवता, सत्य आणि धर्मरक्षेसाठी गुरु तेगबहादुर साहिबजी यांचे योगदान सर्वांना ज्ञात आहे. भगवद्गीतेमध्ये उद्धृत वचन श्री गुरु तेगबहादूर साहिब यांनी धर्मसंरक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाला पुन्हा प्रत्ययास आणून दिले आहे. जेव्हा जेव्हा धर्मावर अधर्म हावी होईल-आक्रमण होईल, तेव्हा मी धावून येईल असे अभिवचन भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये दिले होते, याची आठवण केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आपल्या भाषणात करून दिली. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी मुघलांनी केलेले आक्रमण हे धर्म आणि संस्कृतीवरच होते. हे आक्रमण गुरु तेगबहादुर सिंग यांनी आपल्या बलिदानातून परतावून लावले हे सर्वांना ज्ञात असल्याचे गडकरी यांनी नमूद केले.
महाराष्ट्र शासनाने केलेल्या या भव्य आयोजनाबद्दल गडकरी यांनी कौतुक केले. गडकरी म्हणाले, महाराष्ट्र शासनाने या भव्य आयोजनातून इतिहासातील ही महत्त्वपूर्ण घटना व इतिहास या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पीढीपर्यंत पोहोचता केला. गुरु तेगबहादुर सिंग साहीब यांची प्रेरणा, कार्य आणि कर्तृत्व भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. गुरु श्री तेगबहादुर साहिबजी यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या राज्यभरातील भाविकांना एकत्र आणण्याचे कौतुकास्पद काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले.