मुंबई : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याचा पराभव झाल्याचे खळबळजनक विधान केल्यानंतर भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी चव्हाणांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत, त्यांच्यावर ‘देशद्रोही मानसिकतेचे प्रदर्शन’ करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाद्वारे पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसला धारेवर धरले. त्या म्हणाल्या की, “भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी स्वतः अधिकृत तपशील दिले आहेत, पण काँग्रेसला भारतीय सैन्यापेक्षा पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवर अधिक विश्वास वाटत आहे.”
चित्रा वाघ यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचे नेमके किती नुकसान केले, याची आकडेवारीच जाहीर केली.
📍 4 रडार प्रणाली नष्ट
📍 2 कमांड अँड कंट्रोल सेंटर्स उद्ध्वस्त
📍 2 हवाई तळांच्या धावपट्ट्या निकामी
📍 3 हॅन्गर्सचे मोठे नुकसान
📍 1 C-130 क्लासचे विमान नष्ट
📍 4–5 लढाऊ विमाने (F-16 / JF-17) उद्ध्वस्त
📍 300 किमी आत घुसून AEW&C / SIGINT विमानावर अचूक हल्ला
📍 1 अत्याधुनिक SAM हवाई संरक्षण प्रणाली नष्ट
“हे जर पराभवाचे आकडे वाटत असतील, तर प्रश्न भारतीय सैन्याचा नाही तर काँग्रेसच्या राष्ट्रनिष्ठेचा आहे,” अशा शब्दांत वाघ यांनी चव्हाणांना सुनावले. भारतीय सैन्य शत्रूचा पराभव करत असताना काँग्रेस शत्रूची बाजू घेऊन सैनिकांचे मनोबल खच्ची करत असल्याची टीका त्यांनी केली.
“देशाचा भारतीय सैन्यावर विश्वास आहे… काँग्रेसवर नाही,” असे म्हणत चित्रा वाघ यांनी या वादात भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.