मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उबाठा गटाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर “मुंबई तोडण्याचा प्रयत्न” आणि “भाजपने शिवसेनेला वापरून घेतले” असे गंभीर आरोप केले. मात्र, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या आरोपांचा समाचार घेत उद्धव ठाकरेंचा ‘खोटारडेपणा’ पुराव्यासह उघड केला आहे. “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांच्या रक्ताने हात माखलेल्या काँग्रेससोबत सत्तेचा संसार थाटणाऱ्यांनी आम्हाला मराठी अस्मिता शिकवू नये,” अशा कडक शब्दांत उपाध्ये यांनी ठाकरेंना सुनावले आहे.
केशव उपाध्ये यांचे ट्विट जसेच्या तसे
“उध्दव ठाकरे, अजून किती खोटं बोलणार?
उबाठा बैठकीत बोलताना आज मुंबई तोडण्याचा प्रयत्न आणि भाजपाने वापरल्याची भाषा केली. पण किती खोटं बोलाल?
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही मुख्यमंत्रीपद उपभोगलं.
ज्या काँग्रेसविरोधात संयुक्त महाराष्ट्राचा ऐतिहासिक लढा झाला,
ज्या लढ्यात शंभराहून अधिक हुतात्मे काँग्रेसच्या दमनशाहीत शहीद झाले,
त्याच काँग्रेससोबतच्या सत्तेचा संसार तुम्हाला चालला.
ज्या काँग्रेसने मुंबई वेगळी करण्याचा कट रचला,
त्याच काँग्रेससोबत तुम्ही सत्तेची खुर्ची वाटून घेतली —
आणि आज मराठी अस्मितेच्या गप्पा?
आता आरोप करता — “भाजपाने वापरून घेतलं”
थोडं वास्तवात या.
इतिहास नीट वाचा.
👉 शिवसेना स्थापनेपूर्वी जनसंघ अस्तित्वात होता.
👉 शिवसेना–भाजपा युती झाली, तेव्हाही भाजपाचे आमदार शिवसेनेपेक्षा अधिक होते.
युती ही मजबुरी नव्हती,
ती जनादेशातून आलेली राजकीय समजूत होती.
इतिहास पुसून खोटा आक्रोश करता येतो,
पण सत्य बदलता येत नाही.
मराठी माणूस भावनांवर नाही,
तो इतिहासावर आणि वास्तवावर निर्णय घेतो.
खोटं कितीही वेळा बोला,
इतिहास मात्र कायम सत्याचाच साक्षीदार राहतो.”
खोटा आक्रोश अन् वास्तवाचा विसर!
केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना वास्तवाची जाणीव करून देताना स्पष्ट केले की, शिवसेना स्थापनेच्या आधीपासून जनसंघ (आजचा भाजप) अस्तित्वात होता. युती ही कधीही मजबुरी नव्हती, तर तो जनतेने दिलेला कौल होता. मात्र, केवळ सत्तेसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी करून उद्धव ठाकरेंनी स्वतःच हिंदुत्वाच्या आणि मराठी अस्मितेच्या विचारांशी प्रतारणा केली आहे.
“मराठी माणूस आता अशा खोट्या आक्रोशाला बळी पडणार नाही. तो इतिहासावर आणि वास्तवावर आधारित निर्णय घेईल,” असे म्हणत उपाध्ये यांनी मुंबईच्या आगामी रणधुमाळीत भाजपच खऱ्या अर्थाने मराठी हिताचे रक्षण करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.