मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) रणधुमाळीने आता वेग धरला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी २४ डिसेंबर रोजी ऐतिहासिक युतीची घोषणा केल्यानंतर मुंबईच्या राजकारणाची सर्व समीकरणे बदलली आहेत. मुंबईवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (UBT) आतापर्यंत कोणतीही अधिकृत यादी जाहीर केली नसली तरी, सुमारे ९० इच्छुकांना गुपचूप ‘AB’ फॉर्म सुपूर्द केल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी ५५ उमेदवारांची नावे आता समोर आली असून, यामध्ये अनुभवी माजी नगरसेवक आणि नव्या दमाच्या युवा नेत्यांचा भरणा आहे.
ठाकरे बंधू विरुद्ध महायुती: अस्तित्वाची लढाई
मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी ११४ हा बहुमताचा आकडा गाठणे अनिवार्य आहे. एकीकडे भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना (महायुती) ‘मिशन १५०’ घेऊन मैदानात उतरली आहे, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीने ‘मराठी अस्मिता’ आणि ‘स्थानिक विकास’ या मुद्द्यांवरून महायुतीला तगडे आव्हान दिले आहे. तब्बल २० वर्षांनंतर दोन ठाकरे एकत्र आल्याने मुंबईच्या मराठी पट्ट्यात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिवसेना ठाकरे गटाची (UBT) संभाव्य उमेदवार यादी :
| प्रभाग क्र. | उमेदवाराचे नाव | प्रभाग क्र. | उमेदवाराचे नाव |
|---|---|---|---|
| ५४ | अंकित प्रभू | ८९ | गितेश राऊत |
| ५९ | शैलेश फणसे | ९३ | रोहिणी कांबळे |
| ६० | मेघना विशाल काकडे माने | ९५ | चंद्रशेखर वायंगणकर |
| ६१ | सेजल दयानंद सावंत | १०० | साधना वरस्कर |
| ६२ | झीशान चंगेज मुलतानी | १२४ | सकीना शेख |
| ६३ | देवेंद्र (बाळा) आंबेरकर | १२७ | स्वरूपा पाटील |
| ६४ | सबा हारून खान | १३७ | महादेव आंबेकर |
| ४० | सुहास वाडकर | १३८ | अर्जुन शिंदे |
| २०६ | सचिन पडवळ | १४१ | विठ्ठल लोकरे |
| १५६ | संजना संतोष कासले | १४२ | सुनंदा लोकरे |
| १६४ | साईनाथ साधू कटके | १६७ | सुवर्णा मोरे |
| १६८ | सुधीर खातू | १५० | सुप्रदा फातर्फेकर |
| २१५ | किरण बाळसराफ | २१८ | गीता अहिरेकर |
| २२२ | संपत ठाकूर | २२५ | अजिंक्य धात्रक |
निवडणुकीची गणिते: २२७ जागा, एकच लक्ष्य!
मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. भाजपने आधीच ६६ उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतली होती, मात्र आता ठाकरे गटानेही ‘AB’ फॉर्म वाटप करून मैदानात शड्डू ठोकला आहे. बंडखोरी टाळण्यासाठी आणि राजकीय गोपनीयता राखण्यासाठी दोन्ही बाजूंनी अत्यंत सावधपणे पावले उचलली जात आहेत.