मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने आता ‘हिंदुत्व’ आणि ‘विकासाच्या’ मुद्द्यावरून विरोधकांना पूर्णपणे घेरले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पोस्टद्वारे उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि एमआयएम यांच्यावर प्रहार केला आहे. “कुराणावर हात ठेवून शपथ घेणारा ‘ममदानी’ मुंबईत हवा म्हणून लांगूलचालन सुरू झाले आहे,” अशा शब्दांत उपाध्येंनी धोक्याचा इशारा दिला आहे.
मराठी महापौर की लाचारी?
केशव उपाध्ये यांनी मुंबईकरांना आवाहन करताना स्पष्ट केले की, मुंबईच्या अस्मितेसाठी ‘मराठी महापौर’च हवा असेल, तर भाजपशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की:
“कुराणावर हात ठेवत ममदानी यांनी महापौरपदाची शपथ घेतली. कुराणावर हात ठेऊन शपथ घेणारा ‘ममदानी’ मुंबईत हवा म्हणून लांगूलचालन सुरू झाले आहे… अशी लाचारी नको असेल आणि मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही. धर्माचे नव्हे, विकासाचे राजकारण हवे. भाजपच्या राजकारणाला विकासाचा ध्यास आहे, तर उबाठाच्या राजकारणाला हिंदुद्वेषाचा वास आहे.”
उपाध्ये यांनी उबाठा गटाच्या बदललेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना विचारले आहे की, ‘हिजाब घालणारा महापौर का नाही’ असे विचारणाऱ्या एमआयएमची राज्यसभेत मदत घेणारी उबाठा, ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणाऱ्याला उमेदवारी देणाऱ्यांना विरोध करण्याची हिंमत दाखवू शकेल?, ‘देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे’ असे उघडपणे मानणारी कॅाग्रेस इथल्या एखाद्या ममदानीला विरोध करू शकेल ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
‘द्वेष’ हवा की ‘ध्यास’ हवा?
“धर्माच्या राजकारणाला बळी पडू नका… विकास आणि फक्त विकास हेच भाजपचे राजकारण आहे!” असे सांगत उपाध्ये यांनी मुंबईकरांना ‘द्वेष’ हवा की ‘ध्यास’ हवा हे ठरविण्याची हीच ती वेळ असल्याचे ठामपणे सांगितले आहे. भाजपचा अजेंडा केवळ आणि केवळ मुंबईचा विकास हाच असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.