मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा इतिहास रचला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, त्यांच्या राजकीय वारसाची धुरा आता त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत. आज (३१ जानेवारी) संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
राजकीय हालचालींना वेग: ‘देवगिरी’वर खलबतं
आज पहाटेपासूनच मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार आणि जय पवार मुंबईत दाखल झाले आहेत. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या प्रदीर्घ बैठकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आजचा कार्यक्रम:
दुपारी २ वाजता: विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक होईल. यात सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली जाईल.
संध्याकाळी ५ वाजता: राजभवनावर त्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल.
कोण आहेत सुनेत्रा पवार?
सुनेत्रा पवार यांचा प्रवास सामाजिक चळवळीतून सुरू होऊन आता राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचला आहे:
जन्म व पार्श्वभूमी: १८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिवमधील तेर येथे जन्म. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत.
सामाजिक कार्य: १९८५ मध्ये अजित पवारांशी विवाह झाल्यानंतर त्यांनी काटेवाडीतून ग्रामस्वच्छतेची मोहीम राबवली. त्यांच्या प्रयत्नांमुळे काटेवाडीला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.
स्त्री सक्षमीकरण: ‘एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया’ आणि ‘बारामती टेक्सटाईल पार्क’च्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार मिळवून दिला.
राजकीय कारकीर्द: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला. पराभवानंतर खचून न जाता त्यांनी जनसेवा सुरू ठेवली, ज्याची दखल घेत त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले.
अजित पवार यांच्या राजकीय प्रवासात सुनेत्रा पवारांनी नेहमीच पडद्यामागून महत्त्वाची भूमिका निभावली. घर सांभाळण्यापासून ते निवडणुकीच्या नियोजनापर्यंत त्यांनी दादांना खंबीर साथ दिली. आज त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच, महाराष्ट्राच्या इतिहासात या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरणार आहेत.