Saturday, January 31, 2026

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड, ५ वाजता शपथविधी

Share

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मोठा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची एकमताने विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे अजित पवार यांचा राजकीय वारसा आता सुनेत्रा पवार पुढे नेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या ४२ आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव विधीमंडळ गटनेतेपदासाठी मांडला. या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले, ज्याला उपस्थित सर्व ४२ आमदारांनी पाठिंबा दिला.

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचा पक्ष आणि सत्तेतील स्थान कोणाकडे जाणार, या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याचे अधिकृत पत्र सुनील तटकरे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवतील.

सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष राजभवनाकडे लागले आहे. आज संध्याकाळी ५ वाजता त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मात्र, त्यांच्याकडे अर्थ खाते राहणार की मुख्यमंत्री अन्य कोणत्या खात्याची जबाबदारी सोपवणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

अजितदादांसारखा कर्तृत्ववान नेता गमावल्याच्या दुःखात असतानाच, पक्षाची धुरा सुरक्षित हातात सोपवून कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख