नृत्य हे चित्रपटातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यातील समूह नृत्याला (ग्रुप डान्स) विशेष पसंती मिळते. त्याचा परिणाम म्हणजे, ग्रुपमध्ये डान्स करणाऱ्या कलावंतांची जणू स्वतंत्र इंडस्ट्रीच झाली आहे. त्या इंडस्ट्रीचे आर्थिक व्यवहारही मोठे आहेत. ता. २९ एप्रिल रोजीच्या जागतिक नृत्यदिनानिमित्त केलेले विवेचन.
भारतीय कला-परंपरेत लोकनृत्य, नृत्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. चित्रपटासारख्या दृक-श्राव्य माध्यमात त्याला जागा नसेल, असे होणेच शक्य नाही. एकेकाळी येथे प्रवेशासाठी विशेषतः मुलींना, नृत्य येणे आवश्यकच होते. पूर्वीचे चित्रपट बघितले, तर नायिकां – खलनायिकांच्या वाट्याला प्रामुख्याने नृत्येच अधिक येत. त्यामुळे नृत्य येणे आवश्यक असे. वहिदा रेहमान, आशा पारेख अशा नायिका तर शास्त्रीय नृत्याचे रितसर शिक्षण घेऊन आल्या होत्या. दक्षिण भारतात तर नृत्य घराघरांत भिनलेले आहे. साहजिकच वैजयंतीमाला, पद्मिनी, रागिणी या त्रावणकोर सिस्टर्स, सई आणि सुब्बुलक्ष्मी (अपलम चपलम गाण्यातील नर्तकी), हेमा मालिनी, जयाप्रदा वगैरे सगळ्या दाक्षिणात्य नायिका नृत्यनिपुण आहेत. रेखा व श्रीदेवी या नायिकाही नृत्यासाठी प्रसिद्ध आहेत, पण त्या नृत्य शिकल्या नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तेथील कमल हसन वगैरे नटही नृत्यनिपुण आहेत.
या सगळ्या विवेचनावरून चित्रपटातील नृत्याचे महत्त्व लक्षात आले असेल. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे, तर एक फार मोठा बदल झालेला आढळेल. तो म्हणजे नायिकांबरोबर आता नायकही ‘डान्स’ करू लागले आहेत. सुरुवातीला शम्मी कपूर, जितेंद्र वगैरे अपवाद होते. पण आता असा काही अपवाद राहिलेला नाही. याशिवाय आणखी एक साम्य आहे, ते म्हणजे समूह नृत्य. आधीच्या चित्रपटांत समूह नृत्य हे चित्रपटाचे वैशिष्ट्य असे. विशिष्ट प्रसंगांत ती हमखास येतच, प्रेक्षकही त्याची वाट बघत. नृत्यदिग्दर्शकाचा कस लागणारी ही नृत्ये असत. राज कपूरच्या ‘आवारा’मधील ‘घर आया मेरा परदेसी’ हे स्वप्नदृश्य, ‘पाकिजा’मधील ‘इन्ही लोगों नें’, ‘मधुमती’मधील ‘चढ गयो पापी बिछुआ’, ‘गाईड’मधील ‘मोसे छल किए जा’, ‘ज्वेल थीफ’मधील ‘होठोंपे ऐसी बात’, ‘बॉबी’मधील ‘झूठ बोले कौआ काटे’ अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. अतिशय भव्य-दिव्य स्वरुपात ही नृत्ये बसवली जात. वर उल्लेख केलेली अनेक नृत्ये तर कृष्ण-धवल रंगांत चित्रीत झाली आहेत. हा ट्रेंड अलीकडच्या हिंदी चित्रपटांतही आता दिसतो आहे.
‘रंगिला’मधील ‘रंगीला रे’, ‘तक्षक’मधील ‘मुझे रंग दे’, ‘दिलवाले दुल्हनिया’मधील ‘मेहंदी लगा के रखना’, ‘खलनायक’मधील ‘चोली के पीछे क्या है’, ‘ताल’मधील ‘कहीं आग लगे लग जाए’, ‘हम दिल दे चुके सनम’मधील ‘निंबुडा निंबुडा’, ‘कहो ना प्यार है’मधील ‘एक पल का जिना’, ‘तेरी बातोंमें’मधील ‘तेरी बातोंमें ऐसा उलझा जिया’ असे अनेक ग्रुप डान्स अर्थात समूहनृत्य अलीकडच्या चित्रपटांत दिसतात.. आणि ही नृत्ये प्रत्येक चित्रपटांत अपरिहार्य ठरत आहे. साहजिकच, नायक-नायिकांबरोबर नृत्य करणाऱ्या या कलावंतांना (यांना ज्युनिअर आर्टिस्ट्स म्हणतात) प्रचंड ‘भाव’ आलेला आहे. केवळ चित्रपटच नाही, तर देश-परदेशातील स्टेज शोजमध्येही ही मंडळी दिसतात.
या ज्युनिअर आर्टिस्ट्सचे ग्रुप्स असतात, तसेच कोरिओग्राफर्सच्या अकॅडमीही असतात. या ग्रुप्स, अकॅडमीद्वारे या मुला-मुलींना संधी मिळते. सिनेमा इंडस्ट्रीमधील ही एक मोठी इंडस्ट्री आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. फार मोठा आर्थिक व्यवहार इथे होतो.
पूर्वीचे समूहनृत्य किंवा आताचा ग्रुप डान्स यात काळाप्रमाणे झालेला बदल सोडला, तर फार फरक झालेला नाही. मात्र या नृत्यांवर पाश्चात्य नृत्याचा बराच प्रभाव दिसतो. गुणवत्तेचा निकष लावला, तर आजच्या या ग्रुप डान्सेसचीही रचना कलात्मकतेने केलेली असते. आजचे बहुतांश नट – नट्याही प्रशिक्षित डान्सर्स असतात. पण मुख्य कलाकारांच्या मागे नृत्य करणाऱ्या पूर्वीच्या आणि आताच्या डान्सर्समध्ये एक मुलभूत फरक म्हणजे, आजच्या या कलावंतांकडे उत्पन्नाचे स्रोत अनेक आहेत. केवळ चित्रपटांवर ते अवलंबून नाहीत.
माहितीच्या स्फोटामुळे आज जग अतिशय जवळ आले आहे. सगळी माहिती, कल्पना जणू एक झाल्या आहेत. प्रत्येक संस्कृतीचे मूळ वेगळेपण सोडले तर फार फरक राहिलेला दिसत नाही. नृत्यकलेच्या बाबतीत अनेकदा आपण पाश्चात्यांचे अनुकरण करत असलो, तरी त्यातही आपण आपले भारतीयीकरण जपत असतो, हे आजच्या काळाचे वैशिष्ट्यच म्हणायला हवे.
चित्रपटांखालोखाल किंवा बरोबरीने आज छोटा पडदा महत्त्वाचा ठरला आहे. आधी मालिका, काही कार्यक्रमांमुळे दूरचित्रवाणी हे माध्यम आधीच घराघरांत पोचले आहे. आता तर त्यावर वेगवेगळ्या वाहिन्यांचे कार्यक्रमही बघता येतात. या वाहिन्यांनी प्रायोजित केलेल्या नृत्यावरील स्पर्धा असतात, विविध कलाकारांचे देश-परदेशांतील शोज असतात, फिल्मफेअर वगैरेंचे पारितोषिक वितरण समारंभ असतात, फुटबॉल वगैरे खेळांच्या विश्वकरंडक स्पर्धांचे उद्घाटन किंवा समारोपाचे भव्य कार्यक्रम असतात अशा कोणत्याही ठिकाणी आपले ग्रुप डान्सर्स पोचत असतात. एक वेळ मुख्य नट-नट्यांना थोडी फुरसत मिळत असेल, पण हे डान्सर्सकडे सतत काम असेल, असे कधी कधी वाटते. त्यांना याचा मोबदला किती मिळत असेल माहिती नाही, पण या इंडस्ट्रीची आर्थिक उलाढालही अर्थातच मोठी असते.
या सगळ्यात कोणाची फसवणूक होणे, त्यांना त्रास होणे, शोषण होणे असे प्रकार होतच असतील. अर्थात जागतिकीकरणाच्या या काळात हा धोका सगळ्याच क्षेत्रांत संभवतो. पण सजगपणे पावले टाकली, तर त्रास कमी होऊ शकतो असे वाटते. या पलीकडे जाऊन विचार केला तर ‘ग्रुप डान्सर्स’च्या या इंडस्ट्रीमध्ये खूप क्षमता – पोटेंशियल आहे. इंडस्ट्री कितीही वाढली तरी प्रत्येकाला प्रमुख भूमिका मिळणे अवघड असते. अशावेळी नर्तकांच्या टॅलेंटला असे ‘रेकग्निशन’ मिळणेही मोठी गोष्ट आहे.
चित्रपटसृष्टीत ट्रेंड्स सतत बदलत असतात. सध्या ग्रुप डान्सेसना मागणी आहे. पुढे कोणता ट्रेंड येतो बघायचे..
ऋता बावडेकर