केरळ काँग्रेसमध्ये ‘कास्टिंग काऊच’ चा प्रकार सुरू असून पक्षातील नेते यात सहभागी असल्याचा आरोप पक्षाच्या नेत्या सिमी रोजबेल जॉन यांनी केला आहे. या आरोपांनंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. या प्रकारणावरून भाजपने काँग्रेसवर टीका सुरू केली आहे.
काँग्रेस पक्षातील अनेक महिलांना चित्रपट उद्योगातील कास्टिंग काऊचप्रमाणे शोषणाचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाच्या पदांवर असलेल्या महिलांचे राजकीय ट्रॅक रेकॉर्ड पाहावे, जवळच्या असलेल्या, तडजोड करणाऱ्या नेत्यांना संधी दिली जात आहे. केएसयू आणि महिला काँग्रेसमध्ये तळागाळात केलेल्या कामाच्या आधारे ही पदे देण्यात आलेली नाहीत, असे सिमी यांनी म्हटले होते.
या आरोपांनंतर काँग्रेसने सीमी जॉन यांना पक्षातून काढून टाकले. सिमी ज़ॉन यांच्याविरोधात कारवाई करताना काँग्रेसने निवेदन जारी केले असून केपीसीसी राजकीय व्यवहार समितीच्या महिला नेत्या, केपीसीसी पदाधिकारी आणि महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी संयुक्तपणे केपीसीसी नेतृत्वाला सिमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. सिमी यांनी शिस्तीचा गंभीर भंग केला असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत असल्याचे यात म्हटले आहे. काँग्रेसशी संबंधित शेकडो महिलांचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे असे कारण यात दिले आहे. यावर सिमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या महिलांना प्रतिष्ठा आणि स्वाभिमान आहे, त्या काँग्रेसमध्ये काम करू शकत नाहीत. पक्षासाठी लढणाऱ्या व्यक्तीची त्यांनी हकालपट्टी केल्याचे सिमी जॉन यांनी म्हटले आहे