Sunday, December 22, 2024

लोकराजा राजर्षी शाहू महाराज

Share

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उद्योग, शिक्षण, कृषी सहकार, क्रीडा, संस्कृती अशा सर्व क्षेत्रात आपल्या दूरदृष्टीने पथदर्शी कार्य केले. २ एप्रिल हा त्यांचा राज्याभिषेक दिन. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिशांनी संपूर्ण भारतावर आपला अंमल प्रस्थापित केला. बहुतांशी संस्थाने ब्रिटिशांना मांडलिक बनली. ब्रिटिशांकडून येणाऱ्या तनख्यावर आणि वडिलोपार्जित संपत्तीवर या राजघराण्याची गुजराण सुरू होती. जनतेच्या मनात जरी त्यांच्याबद्दल आदराचे स्थान होते तरी ब्रिटिशांच्या नियम आणि कायद्यांनी त्यांचे हात बांधले होते. याला अपवाद म्हणून जी काही राजघराणी देशामध्ये होती त्यातील एक म्हणजे करवीर संस्थान.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी या संस्थानांमध्ये अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यांनी घेतलेले निर्णय आजही शासनाला मार्गदर्शक आहेत. राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. जोपर्यंत समाजातील वंचित घटक शिक्षणाची कास धरणार नाही तोपर्यंत त्यांचा उद्धार होणार नाही, ही बाब लक्षात घेऊन त्यांनी सक्तीचा शिक्षण हक्क कायदा केला. करवीर संस्थानातील प्रत्येकाने आपल्या मुलाला शाळेत घातले पाहिजे असा हा कायदा होता. जे पालक आपल्या मुलाला शाळेत घालणार नाहीत त्यांना दंड आकारला जायचा. माध्यमिक आणि त्या पुढील शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून विद्यार्थी कोल्हापुरात यायचे. त्यांची राहण्याची आणि जेवणाची सुविधा व्हावी यासाठी त्यांनी विविध बोर्डिंग कोल्हापूरमध्ये सुरू केले. सर्व जाती धर्माचे हे बोर्डिंग स्वतंत्र होते. या बोर्डिंग मध्ये राहून आपले शिक्षण पूर्ण करणारे असंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रात नावारूपाला आले.

समाजोपयोगी कामे
राधानगरी धरण बांधून छत्रपती शाहू महाराजांनी करवीर संस्थान खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम केले. शाहूपुरी सारखी व्यापारी पेठ त्यांनी वसवली. देशोदेशीच्या सराफ व्यवसायिकांना एकत्र आणून त्यांनी कोल्हापुरात सोने-चांदी व्यापार सुरू केला. कोल्हापूर संस्थानात पिण्याच्या पाण्याची अत्यंत उपयुक्त व्यवस्था केली. समाजातील वंचित घटकांना शासकीय सेवेत समाविष्ट करून त्यांनी आरक्षणाचा पाया घातला. विविध तालीम संस्था सुरू करून मल्लविद्येला प्रोत्साहन दिले. खासबाग सारखे मोठे कुस्ती मैदान त्यांनी बांधून घेतले.

कलांना राजाश्रय
मानवी जीवनामध्ये सृजनात्मकता आणण्यासाठी त्यांनी विविध कलांना राजाश्रय दिला. आबालाल रेहमान यांच्यासारखे ख्यातनाम चित्रकार त्यांच्या दरबारी होते. अल्लादिया खा सारखे दिग्गज शास्त्रीय गायक करवीर दरबारात होते. चित्रकलेमध्ये कोल्हापूर स्कूल असा एक नवा विचार पुढे आला. युरोपमधील नाट्यगृहांच्या धरतीवरती आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह राजर्षी शाहू महाराजांनी उभे केले. अनेक पहिलवानांना त्यांनी राजाश्रय दिला. विविध योजना सुरू करून त्यांनी शेतीमालाला भाव मिळवून दिला. शेती व्यवसायामध्ये अनेक नवीन प्रयोग करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. त्यांनी करवीर संस्थानांमध्ये विविध उद्योगांना चालना देऊन औद्योगिक क्षेत्राचा विस्तार घडवून आणला. त्याकाळी त्यांनी करवीर संस्थानाला देशांमधील सर्वात प्रगत आणि आधुनिक विचारांचे संस्थान बनविले.

अन्य लेख

संबंधित लेख