देशामध्ये बहुसंख्य असलेल्या हिंदूंमध्ये असलेले आंतरिक एकत्व प्रबळ करण्याचे आव्हानात्मक काम आपल्याला करावे लागणार आहे. या कामासाठीची प्रेरणा आपल्याला राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांपासून मिळालेली आहे. शिवछत्रपतींचे महानिर्वाण ३ एप्रिल १६८० रोजी झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण करू या.
३५० वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या शिवरायांनी पराक्रमाची शर्थ करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती म्हणजेच सार्वभौम राजा होणे ही हिंदुस्थानच्या इतिहासातील विलक्षण घटना होती. अतिशय कमी आयुष्यात आपल्या कर्तृत्वाने अनेक दूरगामी परिणाम साधणाऱ्या या भारतवर्षाच्या स्वामीचे चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती शके १६०२, म्हणजेच ३ एप्रिल १६८० रोजी महानिर्वाण झाले.
शिवपूर्वकाळातील आक्रमणे
हिंदुस्थानवर इसवीसन पूर्व काळापासून ग्रीक राजा अलेक्झांडर, शक, हूण, कुशाण यांची आक्रमणे झाली, परंतु त्यांना पराभूत करून आपण आपल्या संस्कृतीत सामावून घेतले. ८व्या शतकात इस्लामी अरब मोहंमद बिन कासिमचे आक्रमण मात्र सर्वस्वी भिन्न होते. यानंतर इस्लामी आक्रमणांची धार वाढत गेली. जगभर अनेक भागात पसरलेल्या इस्लामने तिथल्या प्राचीन संस्कृतींचा नाश करून सर्व जनता इस्लाममय केली. परंतु भारतात असे घडले नाही. इस्लामी आक्रमणांच्या काळात हिंदू समाजाने पराकोटीची असहिष्णुता आणि अत्याचार सहन करून आपल्या संस्कृतीचे रक्षण केले. अर्थात या कालखंडातील इतिहास फक्त पराभवाचा नसून हिंदूंच्या शौर्य आणि बलिदानाचाही आहे. परंतु हिंदू शासक स्वतंत्र लढल्यामुळे दिल्ली (इंद्रप्रस्थ), चितोड, कर्णावती, देवगिरी, यादव, होयसाल, काकतीय, पांड्य, रेड्डी, विजयनगर, वरंगल इथले राजे आणि साम्राज्ये एकेक करत संपुष्टात आली आणि कोणी सार्वभौम हिंदू राजा शिल्लक राहिला नाही. अनेक हिंदू राजांना मुघलांचे अथवा स्थानिक मुस्लिम राज्यकर्त्यांचे मांडलिकत्व स्वीकारावे लागले होते.
इस्लामी आक्रमणाचे नवनवीन प्रकार
एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कुराण घेऊन आलेल्या प्रत्येक नव्या इस्लामी आक्रमकाने आक्रमणाचे नवनवीन प्रकार अवलंबले, जे हिंदू समाजाला अभिप्रेत नव्हते. शरण आलेल्याला मारणे, घरदारे जाळणे, शेती लुटणे, गुलाम म्हणून परदेशात नेऊन विकणे, माता भगिनींवर अत्याचार, त्यांना बंदी बनवून बादशहाच्या जनानखान्यात भरती करणे किंवा सरदार आणि सैन्यात वाटप करणे, पैसे हवे असतील तेव्हा परदेशात गुलाम म्हणून विकणे, मठ-मंदिर-मूर्तींचा विध्वंस, मूर्ती भ्रष्ट करून मशिदींच्या पायऱ्यांमध्ये गाडणे अशा विविध प्रकारांनी आक्रमणे चालू होती. या आक्रमकांनी आमच्या पुढे दोन पर्याय ठेवले – इस्लाम स्वीकारा किंवा मरणाला सामोरे जा. तेव्हा जे हिंदू लढले ते मारले गेले. अनेकांनी इस्लाम स्वीकारला. जे लढले नाहीत परंतु इस्लामही स्वीकारला नाही त्यांना जिझिया कर द्यावा लागला.
हिंदूंना सण, उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरे करण्यास प्रतिबंध होता. अशा प्रकारे सार्वजनिक जीवनात उपेक्षित हिंदू समाज आपल्याच देशात दयनीय, हलाखीचे जीवन जगात होता. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:स हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे विधिवत राज्याभिषेक करून सार्वभौम शक्तिशाली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणूनच तो राज्याभिषेक दिवस सर्व हिंदू बांधवांसाठी एक गौरवशाली क्षण होता.
शहाजी राजे आणि जिजाऊंचे संस्कार आणि स्वराज्य
शहाजीराजे आणि जिजाऊंनी बाल शिवबाच्या प्रशिक्षणाची उत्तम व्यवस्था केली होती. अनेक कला, विद्या आणि शास्त्रांचे प्रशिक्षण त्यांना दिले गेले. आपल्याला मिळालेले प्रशिक्षण आणि अंगभूत गुणांच्या आधारे शिवाजी राजांनी अनेक गोष्टी साध्य केल्या.
शिवरायांच्या उपलब्धी
प्रारंभीच्या काळात शिवाजी राजांनी शेतीमध्ये अनेक सुधारणा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यामधून शेतकरी समृद्ध झाल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या १२ बलुतेदार आणि अलुतेदारांना रोजगार मिळाला. ही मंडळी सर्व समाज किंवा जातीतील होती. तेच शिवरायांच्या सैन्यात दाखल झाले. अशा रितीने अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य स्थापना केली. १६४८ साली फत्तेखानाच्या पहिल्या स्वारीच्या वेळी महाराजांकडे जेमतेम बाराशे मावळे होते. १६८० साली महाराजांचा मृत्यू झाला. या ३२ वर्षातील उपलब्धी पाहूया. स्वराज्याचे एक लाखाचे घोडदळ, एक लाखाचे पायदळ, आरमारात तीनशे माणसे किंवा तीनशे टन सामान वाहू शकणारी जहाजे अशी लष्करी सिद्धता झाली. डोंगरी तसेच सागरी किल्ले बांधून स्वराज्याच्या सीमांचे रक्षण केले गेले. महाराजांनी गडकोटांचे प्रशासन उत्तम रितीने राबविले. महत्त्वाच्या किल्ल्यांवर १८ कारखाने, १२ महाल बांधले. किल्ल्यांच्या रक्षणासाठी १.७५ लाख होन आणि मुघलांशी लढण्यासाठी १.२५ लाख होन राखून ठेवले. प्रभावी गुप्तचर यंत्रणा निर्माण केली. स्वदेशी व्यापार आणि उद्योगधंद्यांना संरक्षण दिले आणि वाढीसाठी प्रोत्साहनही दिले. राज्याभिषेकाचे वेळी अष्टप्रधान मंडळ नेमून त्यांच्या अधिकारांची आणि कर्तव्यांची निश्चिती केली. स्वभाषा किंवा भाषाशुद्धीसाठी काम करताना रघुनाथपंत हणमंते, धुंडिराज लक्ष्मण व्यास यांच्या माध्यमातून राज्यव्यवहार कोषाची निर्मिती केली. स्वराज्यातले साधुसंत आणि गुणीजनांचा सन्मान करून त्यांना मदत दिली. महाराजांच्या प्रेरणेने अनेक लेखक, विद्वान आणि कवींनी उत्तमोत्तम ग्रंथांची निर्मिती केली. परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचे महाराजांनी पुनर्निर्माण केले. परावर्तनाचे उदाहरण सर्वांसमोर ठेवताना नेतोजी पालकरांचे हिंदू धर्मात परावर्तन करून त्यांच्या मुलाला आपली मुलगी दिली.
मुख्य ध्येय – दिल्ली जिंकणे
छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य लक्ष दिल्ली जिंकण्याचे होते याचे समकालीन पुरावे आपल्याला मिळतात. १) जयसिंहाचा दरबारी कवी रत्नाकर पंडित याचे काव्य २) राजाराम महाराजांचा जन्म झाला तेव्हा शिवाजी महाराजांनी केलेली भविष्यवाणी ३) अॅबे कॅरे या फ्रान्सच्या प्रवाशाने लिहून ठेवलेले वर्णन ४) गेरॉल्ड आँजिअर या मुंबईच्या इंग्रज वखारीच्या प्रमुखाने लिहिलेले पत्र यामधून हे ध्येय स्पष्ट होते.
शिवाजी महाराजांची मुद्रा
एकीकडे मध्ययुगीन भारतात आलेल्या इस्लामी आक्रमकांची अन्यायी शासन पद्धत आणि त्यांचे ध्येय दिसते, तर त्याच वेळेस वयाच्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांचे अंतिम ध्येय लोकांचे कल्याण हेच होते हे त्यांच्या मुद्रेमधून दिसून येते.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
साहसूनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते ॥
अर्थ – प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंद्य असणारी, शाहजीराजांचा पुत्र असलेल्या शिवाजी महाराजांची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभून दिसत आहे.
किल्ले रायगडाची राजधानी म्हणून निवड
हिंदवी स्वराज्याची नवी राजधानी म्हणून शिवरायांनी किल्ले रायगडाची निवड केली. सुसज्ज, परिपूर्ण आणि सुरक्षित राजधानीसाठी रायगडावर यथायोग्य बांधकामे करण्याची जबाबदारी हिरोजी इंदुलकर यांनी सार्थपणाने पार पाडली. अशा पद्धतीने एका सार्वभौम राजाची राजधानी म्हणून रायगड सुसज्ज झाला होता.
राज्याभिषेकाची आवश्यकता आणि सिद्धता
एक सार्वभौम राजा म्हणून इतर राजे अथवा शासनकर्त्यांशी करावे लागणारे तह, करार, तसेच आपल्या राज्यात दिलेली इनामे, नेमणूकपत्रे, वतने यांना अधिकृतपणा येण्यासाठी शिवाजी महाराजांना स्वत:स राज्याभिषेक करून घेणे तांत्रिक दृष्ट्या आवश्यक होते. या दिवसाच्या एक आठवडा अगोदरच वेगवेगळ्या धार्मिक विधींना सुरुवात झाली. यासाठी गागाभट्टांनी ‘राज्याभिषेक प्रयोग’ या ग्रंथाची निर्मिती केली.
शिवराज्याभिषेक दिन – हिंदू साम्राज्य दिन
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ या मुहूर्त दिनी पहाटेपासून अनेक विधी पार पडल्यानंतर शिवराय सुवर्णसिंहासनावर स्थानापन्न झाले. शेकडो गडकोटांचे आणि सहस्त्रावधी सेनेचे स्वामी झालेल्या शिवाजी महाराजांनी स्वत:ला या मंगल दिनी दिवशी राज्याभिषेक करून घेतला. हिंदू सार्वभौमत्वाचे प्रतिक म्हणून राज्याभिषेकावेळी महाराजांनी आपल्या मस्तकावर छत्र धारण करून स्वतःला ‘छत्रपती’ म्हणून घोषित केले. ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरू केली. स्वतःच्या नावाने होन ही सुवर्णनाणी आणि शिवराई ही तांब्याची नाणी सुरू केली. राज्याभिषेक हा या छोट्या राज्याचा आणि प्रजेचा श्रद्धा, स्वाभिमान आणि अस्मिता प्रगट करणारा सोहळा आनंदसोहळा ठरला.
राज्याभिषेकाचे दूरगामी परिणाम
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने एक हिंदू राजा म्हणून त्यांना मान्यता मिळाली. याचे उदाहरण म्हणून आपण राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजय मोहिमेत झालेल्या कुतुबशहा भेटीकडे पाहू शकतो. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजे, राजाराम महाराज, शाहू महाराज यांच्याकडेही एक हिंदू राजा म्हणूनच पाहिले गेले. शिवाजी महाराजांच्या पश्चात ज्यावेळेस बलाढ्य मुघल सम्राट औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस याच राष्ट्रभक्तीच्या भावनेतून मराठ्यांनी २७ वर्षे संघर्ष केला व स्वराज्याचे रक्षण केले. या स्वातंत्र्यसमराचे नेतृत्व छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी केले. याचाच परिणाम अपयशाने निराश झालेला औरंगजेब २० फेब्रुवारी १७०७ रोजी महाराष्ट्रातच मृत्यू पावला.
हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर
शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतलेल्या मराठ्यांनी अठराव्या शतकात छत्रपती शाहू महाराज, पेशवे बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे यांच्यासह शिंदे, होळकर, गायकवाड, पवार, नागपूरकर भोसले, नाना फडणीस यांच्यासह अनेक सरदार मंडळी आणि मुत्त्सद्दी यांच्या पराक्रम आणि कौशल्याने विशाल साम्राज्य निर्माण केले. १७५८ मध्ये अटकेपार भगवा झेंडा फडकावला व अटक ते कटक हिंदूंचे शक्तिशाली साम्राज्य निर्माण करून शिवरायांचे स्वप्न साकार केले.
मराठा साम्राज्याच्या उपलब्धी
हिंदू संस्कृतीचा पूर्ण नाश होणार आणि तिची ओळख पुसली जाईल असे वाटत असतानाच हिंदूही राज्यकर्ते होऊ शकतात हा विश्वास शिवरायांनी आणि मराठा साम्राज्याने निर्माण केला. भारत इस्लाममय करण्याचे इतिहासाचे कालचक्र शिवशाहीने परतवून लावले. अठराव्या शतकातील मराठ्यांच्या राजवटीत हिंदू समाज पुन्हा आर्थिकदृट्या सबल झाला. याच लेखात इस्लामी अत्याचारांचे जे प्रकार नमूद केले आहेत, ते मराठा साम्राज्याच्या विस्तारामुळे कमी झाले. त्याच वेळी हिंदू संस्कृतीतील कला, संस्कृती आणि कलाकार यांचा विकास झाला.
मराठा साम्राज्याच्या उपलब्धींची नोंद आवश्यक
इंग्रजांनी आपल्या देशाचा गौरवशाली आणि देदीप्यमान इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्यांचेच धोरण स्वातंत्र्यानंतरही चालू राहिले. त्यामुळे मराठा साम्राज्याच्या उपलब्धींची नोंदच घेतली गेली नाही. म्हणूनच आपल्या कर्तृत्वाचा इतिहास समाजासमोर आणणे आवश्यक आहे. देशामध्ये बहुसंख्य असलेल्या हिंदूंमध्ये असलेले आंतरिक एकत्व प्रबळ करण्याचे आव्हानात्मक काम आपल्याला करावे लागणार आहे. या कामासाठीची प्रेरणा आपल्याला राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांपासून मिळालेली आहे.