नवी मुंबई : महाराष्ट्रातील पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन OSAT प्रकल्पाचे उद्घाटन महापे, नवी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भारतरत्न सचिन तेंडुलकर, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकरजी यांच्या उपस्थितीत झाले. “आजचा दिवस हा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाईल. भारतातील सेमीकंडक्टर (SemiConductor Plant) क्षेत्रातील पहिला प्रकल्प महाराष्ट्रात सुरु होत असल्याचा विशेष आनंद आहे. एका मराठी माणसाने ही इकोसिस्टीम सर्वात पहिल्यांदा उभी केली असून याची क्लिनरूम तयार करणारा एक नागपूरकर आहे” हि अभिमानाची गोष्ट असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) म्हणाले.
पुढे बोलतांना ते म्हणाले, OSAT आणि ATMP मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील हा टप्पा गाठणारा पहिला प्रकल्प म्हणून ‘आरआरपी इलेक्ट्रॉनिक’कडे पाहिले जात आहे. आयटी व डिझाईन क्षेत्रात जसे भारतीय पुढे आहेत, अगदी त्याचप्रमाणे रिअल हार्डवेअर क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आणि जगामध्ये विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित होण्यासाठी भारताला सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रस्थापित करणे गरजेचे होते. यासंदर्भात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक मिशन हाती घेतले. या मिशनला सपोर्ट करणारी एक इकोसिस्टीम उभी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सेमीकंडक्टर क्षेत्रात आपली स्वतःची पॉलिसी, इन्सेन्टिव्ह पॅकेज आणि सपोर्टींग इकोसिस्टीम तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे,” असं ते म्हणाले.
“आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये आपली क्षमता विस्तारली आहे. त्यामुळे डिजिटल वर्ल्ड आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक प्रकारे आपले जीवन बदलत आहेत. यामुळे भविष्यातील रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्रातील प्रत्येक गोष्टीत क्रांती घडविण्यासाठी ‘सेमीकंडक्टर’ अतिशय महत्त्वाचे आहेत. आरआरपी तयार करत असलेली रिप्लेसमेंट टेक्नोलॉजी जगातील इतर देश देखील वापरतील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“गेल्या महिन्यात महायुती सरकारने सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक आणली आहे. याशिवाय ‘होरिबा’ कंपनीदेखील नागपुरात सेमीकंडक्टरमध्ये लवकरच गुंतवणूक करणार आहे. भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासह महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी सेमीकंडक्टर इकोसिस्टीम अत्यंत महत्त्वाची आहे. पुढील 10 वर्षात जेव्हा सेमीकंडक्टर इंडस्ट्रीचा इतिहास वाचला जाईल, त्यावेळी अनिल काकोडकरजी, राजेंद्र चोडनकर आणि सचिन तेंडुलकर यांचे नाव निश्चितपणे घेतले जाईल. 2026 मध्ये देशातील पहिली चीप ज्यावेळी प्रत्यक्ष बाजारात येईल, त्यावेळीही आम्हालाच बोलवाल,” असा विश्वासही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी मंत्री उदय सामंत, आरआरपी इलेक्ट्रॉनिकचे चेअरमन राजेंद्र चोडनकर, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.