हिंदू धर्मासाठी अत्यंतिक यातनांच्या अग्नीमध्ये शौर्याने व धीराने न डगमगता उभे राहून आपल्या प्राणांची आहुती देणारे धर्मवीर योद्धे म्हणजे शिवतेजसपुत्र छत्रपती शंभुजी महाराज. छत्रपती शंभूजी महाराजांच्या नावाने अनेक संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहेत. शिवशंभु छत्रपतींचे हिंदुत्व सकलजनांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या संघटना करत आहेत तरी देखील काही संघटना मार्फत छत्रपती शिवाजी महाराज तसेच शंभूजी महाराज यांना हिंदुत्व पासून दूर नेण्याचे कुटील कारस्थान सुरू आहे. शंभुजी महाराजांचे चरित्र हे एक प्रभावी व मांगल्यपूर्ण जीवन चरित्र आहे. मराठ्यांच्या इतिहासाबरोबर अखंड भारताच्या इतिहासाला एक नवी दिशा शंभुजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये मिळाली. धर्मरक्षणाच्या सर्व आघाड्यांवरती मराठ्यांनी औरंगजेबाशी दीर्घकाली लढा उभा केला या लढ्यामध्ये शंभूजी महाराजांची कारकीर्द व त्यांची धर्मनिष्ठा विशेष उल्लेख करण्यासारखी आहे. शिवरायांनी उभे केलेले स्वतंत्र हिंदू राज्य अबाधित राखण्यासाठी शंभूराजांनीसंबंध औरंगजेबाशी मोठा लढा देऊन स्वराज्य टिकवले. या कर्तव्याची जाणीव शंभूजी महाराजांना पदोपदी होती म्हणून ते एका पत्रात म्हणतात “आबासाहेबांचे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य”
अखंड भारताचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र शंभुराजे यांनी आपल्या कारकिर्दीत देखील आपल्या वडीलां प्रमाणे मठ-मंदिरांचे तसेच देवी-देवतांचे नित्य पूजन करण्यासाठी अनेक दानपत्र दिली. त्यातील एक दानपत्र परशुराम क्षेत्रातील कुडाळ येथील बाकरे आडनावाचे नामदेव भट्टाचे पुत्र बाकरे शास्त्री यांना देण्यात आले होते. ३०० सेंटीमीटर लांब असलेलं हे दानपत्र संस्कृत भाषेत असून शंभुराजे यांनी त्यांच्या संपूर्ण घराण्याचा उल्लेख केला आहे. या दानपत्रात विविध देवीदेवतांचे स्मरण करून आपल्या पूर्वजांना विशेष बिरुदावली देऊन संबोधले आहे.
दानपत्राची सुरुवात शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाचे वर्णन करताना भोसल्यांचे कुलदैवत शिखरस्वामिशांभुमहादेव असे म्हटले आहे. आपल्या वाडवडिलांच्या कार्याचा उल्लेख करताना मालोजी राजांनी यात्रेकरूंना कायमचे पाणी मिळावे म्हणून तेथे एक तलाव बांधला. आपल्या पूर्वजांनी अर्धवट सोडलेले काम जोमाने पूर्ण करून आपल्या १०१ पूर्वजांचा त्यांनी उद्धार केला. अशा या प्रसिद्ध मालोजी राजांचे पणतू शंभूजीराजे होय …! असे शंभु महाराजांनी स्वतःला संबोधले आहे .
मालोजी राजे यांचे पुत्र शहाजीराजे यांनी निजामशाहीच्या राज्यातील एक प्रमुख सेनापतीचे पद मिळवले. धनुर्विद्येच्या जोरावर त्यांनी अनेक प्रबळ शत्रूंना परास्त केले. दिल्लीपती असुराच्या आज्ञेवरून मंदिर उध्वस्त करण्यासाठी आलेल्या सैनिकांचा नाश प्राणांची पर्वा न करता केला व देवालयाचे रक्षण केले. श्रेष्ठ क्षत्रियांना शोभेल असा त्यांनी पराक्रम गाजविला. अनेक देवतांची स्थापना करून श्री शंकराचा कृपाप्रसाद प्राप्त करून घेतला. महाबली (माहुली) सारख्या दुर्गम किल्ल्याला जिंकून युद्धात पराक्रम गाजविला व शत्रूसैनिकांचा निपात करून स्वामीच्या धर्माचा अभिमान स्थापित केला. हिंदू धर्माचा जिर्णोद्धार करून यवनांचा नायनाट करणाऱ्या शहाजीराजांनी आपल्या स्वराज्याच्या सीमा संरक्षित करण्यासाठी अनेक वेळा तहाला सामोरे जावे लागले. राज्याच्या सीमा सांभाळण्यासाठी अनेक मांडलीकांनी त्यांना सहकार्य दिले. शौर्य, औदार्य, गांभीर्य, धैर्य इत्यादी अगणित गुणांनी शहाजीराजे मनोहर वाटत आहेत. हिंदुधर्माचे पुनरुत्थान करण्यासाठी ज्यांची बुद्धी स्थिरावली अशा शहाजीराजांना हैंदवधर्मजीर्णोद्धारणकरणधृतमतिः असे विशेषण या दान पत्रात देण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी गर्विष्ठ व क्रूर अशा अफजलखानाला पाठवण्यात आले. या मूर्तीभंजक यवनाला शिवरायांनी नरसिंहाप्रमाणे सहजपणे बिचवा खुपसुन ठार केले त्याच्या रक्तप्रवाहने शरीर माखल्याने शिवाजी राजे हे नरसिंह प्रमाणे दिसू लागले. शूर, पराक्रमी, तेजपुंज अशा शिवाजीराजांनी ७५ हजार घोडस्वार घेऊन आलेला औरंगजेबाचा मामा शास्ताखान याला परास्त केले. या प्रसंगाचे वर्णन जयद्रताची फजिती करणाऱ्या पार्थाबरोबर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे म्लेंछक्षयदिक्षीत आहेत कारण तरुणपणातच ज्यांनी म्लेंच्छांच्या नाशाची दिक्षा घेतली आहे असे या दानपत्रात लिहिलेले आहे. दिल्लीपती बादशहाचा गर्व नाहीसा करणारे विजापूरच्या राजाला कर द्यायला भाग पाडणारे असे हे शिवरायआपले शस्त्रधारी हात वर करताच सर्व पठाणही पळून जात. त्यांच्या या वीरश्रीमुळे भयभीत झालेल्या मांडलिक राजांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले होते. क्षत्रिय कुळाला अलंकार ठरलेले भोसले कुलोत्पन्न शिवाजी महाराज भूतलावरील इंद्रच आहेत असे या दानपत्रात शिवरायांचे वर्णन केले आहे.
शिवाच्या चरणाचे ध्यान करणाऱ्या कुलरूपी सूर्याचे वैभव ज्याने वाढविले कपाळाला भस्म लावलेल्या कविवर्य कवी कलशाने ज्याला प्रोत्साहन दिले अनेक दुष्टांनी आरंभलेल्या नीच कृत्यांनी ज्याचे डोळे लाल झालेले आहेत. इष्ट देवताची आज्ञा घेऊन आपले बलशाली दंड थोपटून ज्याने दूरजनांचा नायनाट केला व त्यामुळे शत्रूंची मस्तके गळ्यात घालून नृत्य करणाऱ्या चंडी देवीचा पती म्हणजेच शिव याप्रमाणे शंभूराजे दिसत आहेत. संपूर्ण घोडदळ ताब्यात घेऊन दिल्ली पती सारख्या अनेकांची तमा न बाळगता ज्याने सिंहासनावर आरूढ होऊन छत्र धारण केले. बलाढ्य अशा किल्ल्यांवरती ज्याने अधिपत्य मिळविले, केवळ नजरेने ज्याने दक्षिण दिशा काबीज केली. दानधर्म करून विद्वानांचा गौरव केला. शत्रूंच्या सामर्थ्याच्या गर्द पराक्रमरुपी सूर्य ज्याने जाळून टाकला, शरद ऋतूतील चंद्रामुळे भरती आलेल्या शुभ्र फेसाने शोभणाऱ्या अमर्याद समुद्राने वेढलेल्या पृथ्वीवर विराजमान झालेल्या या राजाधिराज छत्रपती शंभुराजे यांनी हे दान दिले आहे. राज्याची वाढ व्हावी म्हणून, गुरु पादुकांचे पूजन करून शत्रूंचा नाश व्हावा म्हणून आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य पुत्रपौत्रादी यांच्या अभिवृद्धीसाठी दरवर्षी स्वतःच्या आणि स्वामींच्या पुत्र पौत्र परंपरेने दिलेले हे दान चालत राहावे असे या दानपत्रात म्हटले आहे. शिवराज्याभिषेकाच्या सातव्या रौद्र संवत्सरात भाद्रपद शुद्ध अकरा सोमवारी प्रातःकालीन मुहूर्तावर रघुनाथ नारायण अमात्य यांनी या दानपत्राचे लेखन केले.
मराठ्यांमधील जाज्वल्य धर्माभिमान शंभुजी महाराजांच्या कारकिर्दीत प्रकर्षाने दिसून येतो. देवस्थानांना मुसलमानांचा उपग्रह होणार नाही याकडे लक्ष देण्याबाबत संभाजी महाराजांनी काही पत्र वासुदेव बाळकृष्ण व कृष्णाची भास्कर यांस पाठवलेली आहेत. या दोन्ही पत्रांमधील मजकूर जवळपास सारखाच असून “मुसलमान व हर कोणाचा उपद्रव न लागे” हे वाक्य विशेष लक्ष देण्यासारखे आहे.
हेमाद्री
पंकज विद्याधर भोसले
शिवशंभु विचार मंच, कोकण प्रांत