नवरात्राचा, देवीचा जागर सुरु झाला आहे. दुष्टांचे निर्दालन करणारी, राक्षसांचा नाश करणारी देवी हे केवळ प्रतीक नसून, हिंदू धर्माने पाहिलेले स्त्रीचे शक्तीत्मक रूप आहे. तेच शौर्य, धैर्य, तेज स्त्रीच्या अंगी आहे असे मानणाऱ्या भारतीय समाजात आज काय घडते आहे? स्त्री समाजात सुरक्षित का नाही? तिच्यातलं ते तेज कुठे लोप पावले आहे? अन्याय अत्याचारांना ती का बळी पडते आहे? आर.जी. कर महाविद्यालयातली घटना, बदलापूर ची घटना घडते आणि जनक्षोभ उसळतो. बलात्काऱ्याला फाशी द्या, मुलींना ज्युडो कराटे शिकवा अशा ‘अॅक्शन पॅक’ तरतुदीच्या मागण्या, निदर्शने होतात, होऊ लागताता. जो ‘स्त्री सुरक्षा’ हा विषय धरी-दारी चर्चेत येतो. अशा घटनांनी समाजमन आहत होते हे खरेच, पण तात्कालिक चर्चा, मोर्चे, निदर्शन, मागण्या या घटना घडून गेल्यानंतर च्या प्रतिक्रिया असतात . वारंवार समोर येणाऱ्या घटनांनी स्त्रिया, मुलींचा आत्मविश्वास डळमळीत होतो. या घटना घडू नयेत म्हणून कायम स्वरूपी उपाय काय? हे किती काळ घडत रहाणार? अशी हतबलता ही येते कधीकधी! कायदे, स्व-संरक्षण यांच्या इतकीच गरज आहे सुसंस्कारित समाज घडवणे, मनामनात समानता रुजवणे म्हणजेच मनपरिवर्तन आणि वृत्ती बदल. ही प्रक्रिया वेळखाऊ असते, येणाऱ्या नव्या पिढीगणिक सातत्याने करावी लागते. लिंगभाव समानतेचे प्रशिक्षण, जाणीव जागृती, आत्मभान, शिबिर अशा अनेक नावांनी अनेक संस्था, व्यक्ती हे काम करत आहेत.
‘थेंब थेंब पाणी, सुरक्षेच्या कारणी’ या सूत्रा अंतर्गत अशा संस्थांचे कार्य समोर आणण्याचा व नवरात्राच्या निमिताने स्त्रियांमधले तेज जागवण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय स्त्री शक्ती ही महिला सशक्ती च्या सामर्थ्यशीलतेसाठी काम करणारी सुप्रसिद्ध संघटना. १९८८ मध्ये भारतीय स्त्री शक्तीची स्थापना झाली व स्त्री-पुरुष समानता – सन्मान व सुरक्षितता हे या कामाचे एक सूत्र ठरले. स्त्रियांना स्व संरक्षणाची कौशल्ये शिकवणे, आत्मविश्वास जागा करणे ,याच्या जोडीने उमलत्या वयातल्या मुला-मुलीन साठी जाणीव-जागृती शिबिरे घेणे हे ही संघटना नेमाने गेली 30 वर्ष करत आहे. आज कुटुंबातून होणारे संस्कार व समाजमाध्यमे व मिडियामधून समोर दिसणारा कंटेंट यामध्ये फार फार अंतर आहे. आई वडीलच नव्हे तर आजी आजोबाही नोकरी, व्यवसायाच्या व्यस्ततेत व स्वत: च्या फोनमध्ये गुंतलेले असताना संवाद कमी झाला आहे.
आज सामाजिक अवकाशात सकारात्मकता दिसत नाही. याला उपाय म्हणजे मूल्य शिक्षण! आई-वडील व समाजाचे मूल्य आचरण. ‘कळी उमलताना’ या नावाने वयात येणाऱ्या मुलींसाठी वयात येताना होणारे बदल, धोके व घ्यावयाची काळजी यां बद्दल चर्चा सत्र शाळा, शाळात जाऊन घ्यायला सुरुवात केली ती ९० च्या दशकात. कळी उमलताना या नावाने एक छोटी पुस्तिका ही प्रकाशित केली. याच्या वीस हजारांहून अधिक प्रति वितरित केल्या. भारतीय स्त्री शक्तीच्या सर्व शाखांमध्ये हा कार्यक्रम होतो आजवर तीन लाखांहून अधिक मुलीपर्यंत हा कार्यक्रम पोचला आहे. अनुभव असा आला की वयात येणाऱ्या मुलांचे वेगळे प्रश्न आहेत. शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण विषयाचा अंतर्भाव केला गेला तरीही पालक-शिक्षक व मुलग्यांमध्ये मोकळा संवाद नाही. त्यांना शरिरात होणारे बदल, मुलींचे आकर्षण, मर्दानगी ची कल्पना, स्त्री-पुरुष समानता याबददल सजग करणे जास्त आवश्यक आहे. तशी मागणी शिक्षकांकडूनही येऊ लागली. व ‘कळी उमलताना या कार्यक्रमाचा विस्तार झाला. ‘जिज्ञासा ‘कुतुहल’ या नावाने मुलग्यांसाठी जाणीव-जागृतीची शिबिरे घ्यायला सुरुवात झाली. पुस्तिकाहि तयार झाली.
लिंगभाव समानता ही आजच्या काळाची गरज आहे. उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र, आत्मविश्वासपूर्ण नव्या पिढीने एकमेकांचे स्वातंत्र्य जपणे, हक्क मान्य करणे, सन्मान ठेवणे व सुखी सहजीवन जगणे हे समाजस्वास्थासाठी आवश्यक आहे. भारतीय स्त्री शक्ती याकडे निकोप कुटुंब जीवनाचा पाया म्हणून बघते. संस्कार- सुसंवाद – सन्मान व सकारात्मकता हे त्याचे आधारस्तंभ आहेत. बदललेल्या काळातली घर-नोकरी-करीयर ही आव्हाने, स्त्री-पुरुषांमधले वाढलेले साहचर्य, स्पर्धात्मक वातावरण, सोशल मीडिया च्या माध्यमातून आदळणारा हिंसात्मक कंटेंट यातून तावून सुलाखून निघण्यासाठी उमलत्या वयातली ही छोटी चर्चासत्रं सुद्धा सकारात्मक परिणाम करतात. आज या चर्चा सभांमध्ये काळानुरूप बदल केले जातात. संस्कार, सन्मान यांच्या बरोबरच सायबर गुन्हे, सायबर कायदे, पॉक्सो कायदे, वाढती व्यसनाधीनता, पीयर प्रेशर्स (म्हणजे समूहाचे दबाव), मैत्री-प्रेम-आकर्षण यातला फरक, कळत-नकळत घडणारी शाब्दिक, भावनिक हिंसा असे अनेक विषय हातालळे जातात. ‘फंड हर एज्युकेशन, बचत गट अशा प्रकल्पातल्या पालकांसाठी शिबिरे घेतली जातात.या शिबिरांमधून काही साधते का? साधले असते तर असे गुन्हे घडलेच नसते असेही कोणी म्हणू शकेल.पण शिबिरानंतर येणारा प्रतिसाद, शिक्षकांकडून विद्याथ्यांच्या वर्तनान झालेला बदल कळतो तेव्हा त्यांची आवश्यकता व परिणामकारकता लक्षात येते.
समाजपरिवर्तन, व्यक्ति परिवर्तन व मनपरिवर्तन हे मोजता आले नाही तरी अनुभवता नक्की येते. अशा शिविरानंतर मी आई-बहिणींवरुन शिवी द्यायचे सोडून दिले, व्यसन करून येऊन आईवर हात उगारणाऱ्या वडिलांना मी रोखले, मी दारू न पिन्याचा निःश्वय केला, मी मित्रांकडून गिफ्ट घेणे नाकारले, शारिरीक जवळीक करणाऱ्या मित्राला रोखण्याचे धैर्य माझ्यात आले, मी फोटो, व्हिडिओ पाठवताना काळजी घेतो, मी ‘मुलीचे मत’ मानायला लागलो’ अशा अनेक प्रतिक्रिया मुलामुलींकडून येतात. मुलांच्या विचार प्रक्रियेत बदल झाल्याचे शिक्षकही सांगतात.अर्थात अशी शिबिरे, चर्चा वारंवार व्हायला हव्यात. वेडेवाकडे विचार मनात येतात तेव्हाच त्यावर उपाय व्हायला हवा. मुलग्यांचा दृष्टीकोन व मुलींचा आत्म-विश्वास वाढायला हवा. प्रत्येक वेळी ‘रिस्क असेसमेंट’ म्हणजे धोके ओळखण्याचे कौशल्य व भान जागवायला हवे. उपायांचा आधार घ्यायला हवा. या नवरात्र च्या निमिताने स्त्री सुरक्षा व स्त्री सन्मानाचा पसा भरायचा असेल तर ‘थेंब थेंब पाणी ! घालायलाच हवे, बदल घडतो या विश्वासाने!
नयना सहस्रबुद्धे
भारतीय स्त्री शक्ती