Wednesday, January 29, 2025

उन्हाची तीव्रता कमी कशी करावी?

Share

‘यावेळी खूप ऊन आहे,’ असे प्रत्येक उन्हाळ्यात हमखास म्हटले जाते. ते खरेही असते, पण यंदाचा उन्हाळा खरेच खूप तीव्र आहे. अगदी रात्रीही झळा जाणवतात. अशावेळी काय काळजी घ्यावी, याबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन.

फेब्रुवारी संपता संपता आणि मार्चच्या सुरुवातीला हवामान एकदम पालटते. सूर्याचे किरण लखलखू लागतात, तापमान वाढायला लागते, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते आणि उन्हाळ्याचे आगमन होते. सकाळपासूनच अंगाची तलखी सुरू होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच या उन्हाळ्याचा त्रास होत असतो. या काळात अनेक प्रकारचे आजार आणि विकार उद्भवू शकतात.

१. मूत्रमार्गाचे विकार – उन्हाळ्यातले तापमान कधी कधी ४० अंशाच्याही पुढे झेपावते. या बाह्य उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन लघवीचे प्रमाण कमी होऊ लागते. लघवी होताना जळजळ होते. लघवी पिवळी किंवा प्रसंगी तांबडट रंगाची होते. याबरोबरच मूत्रामध्ये जंतूसंसर्ग होऊन थंडी-ताप येऊ शकतो. मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गात खडे निर्माण होऊ शकतात. ज्यांना हा त्रास पूर्वी होऊन गेला आहे अशांना तो त्रास पुनश्च उद्भवण्याची शक्यता जास्त असते. भरपूर पाणी पीत राहणे हाच या सर्व त्रासांवरचा उपाय असतो. पण मूत्रमार्गाचे किंवा मूत्रपिंडाचे खडे झाले असल्यास, वैद्यकीय तपासणी करून योग्य तो उपचार करावा.

२. पोटाचे विकार – उन्हाळ्यातल्या उष्णतेमुळे आणि त्यामुळे आतड्यामधील पाण्याच्या तसेच क्षारांच्या प्रमाणात होणाऱ्या बदलामुळे अनेकांना उलट्या-जुलाबाचा त्रास होतो. लहान मुलांना, विशेषतः नवजात अर्भकांना याचा त्रास होतो. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा साठा कमी होतो, अशुद्ध आणि फिल्टर न केलेले पाणी प्यायची वेळ येते. त्याशिवाय या काळात अनेक लग्न-मुंजी आणि सार्वजनिक समारंभांमध्ये भोजन समारंभ असतात. त्यात भर म्हणजे, सुट्टीमुळे अनेकांचा बाहेरगावी प्रवास होतो. उन्हाळी सुट्टीचा आनंद घेताना, गावातल्या गावातही बाहेरचे खाणे, बागेत जाऊन तेथील उघड्यावरील पदार्थ खाणे, सरबते किंवा रस पिणे अशा गोष्टी नकळत घडत राहतात. बाहेर खाण्याच्या या साऱ्या प्रसंगांत, जे खाद्यविक्रेते असतात, त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची खात्री देता येत नाही. त्यांनी याकरता वापरलेले पदार्थसुद्धा चांगल्या प्रतीचे नसतात. त्यात अनेकदा ते उघड्यावर असल्यामुळे हवेतील धूळ माती त्यात हमखास जाते. साहजिकच हे पदार्थ सेवन केल्याने अन्नातून जंतुसंसर्ग होणे, आमांश होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे उन्हाळ्यात अपचन, उलट्या, जुलाब, डिसेन्ट्री, आमांश अशा कारणाने पोटाच्या तक्रारी वाढतात. उन्हाळ्यात हातगाडीवर मिळणारे बर्फाचे गोळे, सरबते, फळांचे रस, हलक्या दर्जाची आईस्क्रीम्स सर्वत्र उपलब्ध असतात. यात अनेकदा जो बर्फ वापरलेला असतो, तो आरोग्यखात्याने प्रमाणित केलेला नसतो. बहुसंख्य ठिकाणी तो अशुद्ध पाण्यापासून बनवलेला असतो. अशा बर्फाच्या वापरामुळे या पदार्थातून टायफॉईड, कावीळ अशासारखे गंभीर आजार पसरतात.

३. शरीरातील पाणी व क्षार कमी होणे – आपल्या शरीराच्या पेशी आणि रक्त, मांस यात ९० टक्के पाणी असते. विचार करण्यासाठी आपल्या मेंदूला, हालचाल करण्यासाठी आपल्या हातापायांना आणि टवटवीत राहण्यासाठी आपल्या शरीराला पाणी आणि क्षारांचे योग्य प्रमाण आवश्यक असते. वातावरणातील दाहक उष्णतेने शरीरातील पाणी आणि क्षार कमी होतात. त्यामुळे तोंडाला कोरड पडून सतत तहानलेले वाटणे, गळून गेल्यासारखे किंवा सतत थकल्यासारखे वाटणे, डोके जड होणे, गरगरणे, हात-पाय तसेच अंग दुखणे, पोटऱ्या दुखणे अशासारख्या तक्रारी उद्भवतात. शरीरातील पाणी व क्षार कमी झाल्याने तोंडाची चव जाणे, भूक मंदावणे हे त्रास उन्हाळ्यात सर्रास आढळतात. उन्हाळ्यामध्ये खूप उन्हात काम केल्यास अंगातील क्षार आणि पाणी अतिशय कमी झाले तर उष्माघात होऊ शकतो. यामध्ये जास्त तापमानामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमालीची खालावते. आपल्या मेंदूमध्ये शरीराचे तापमान कायम राखणारी एक यंत्रणा असते. पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ही यंत्रणा पूर्ण कोलमडते. परिणामतः त्या व्यक्तीला घाम येणे, मळमळ, उलटय़ा, घबराट आणि जास्त प्रमाणात थकवा, त्वचा निळी पडणे, शरीराचे तापमान अचानक कमी होणे, चक्कर येणे, रक्तदाब आणि नाडीचे ठोके कमी होणे अशी लक्षणे दिसतात. अशा व्यक्तीला वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर त्याला झटके येणे, बेशुद्ध होणे, कोमात जाणे अशाप्रकारची गुंतागुंत वाढत जाते. याप्रकारात त्या व्यक्तीच्या जीवावरही बेतू शकते.

४. संसर्गजन्य आजार – गोवर, कांजिण्या, गालफुगी किंवा गलगंड या आजारांच्या साथी उन्हाळ्यात पसरतात. वीस वर्षांपूर्वी लहान मुलांमध्ये सर्रास आढळणारे हे संसर्गजन्य आजार, उत्तम लसीकरणामुळे आजकाल क्वचित पाहायला मिळतात. मात्र लस न घेतलेल्या लहान मुलांत आणि तरुणांमध्ये अजूनही हे आजार दिसून येतात.

५. डोळ्यांचे विकार – आपल्या डोळ्यांच्या बुबुळावर एक बारीकसा द्रवाचा तवंग असतो. त्यामुळे आपले डोळे थंड राहतात. उन्हाळ्यात हा द्रव पदार्थ हवामानातल्या उष्णतेने कमी होतो आणि डोळे जळजळणे, लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे येणे असे त्रास उद्भवतात.

६. त्वचेचे विकार – तीव्र उन्हात गेल्याने त्वचा लाल होणे, काळी पडणे, चेहेऱ्याची आग होणे असे त्रास सर्वांनाच होतात. अनेक व्यक्तींना तळपायांची आग विशेषतः सायंकाळी होते. तसेच उन्हाळ्यामध्ये लहान मुले, नाजूक त्वचा असलेल्या व्यक्तींना अंगावर घामोळ्या येण्याचा त्रास होतो. सतत घाम येत असल्यामुळे काखा आणि जांघा स्वच्छ आणि कोरड्या न ठेवल्यास तिथे गजकर्णासारखे त्वचाविकार होऊ शकतात. बऱ्याच स्त्रियांना स्तनाखाली अशापद्धतीचे गजकर्ण उन्हाळ्यात उद्भवते.

उन्हाच्या त्रासावरील उपाय
उन्हाळ्यात साऱ्या अंगाची लाही लाही होते. तप्त वातावरणामुळे आपल्या शरीरातले पाणी कमी होते. त्यामुळे मरगळ येते, पाय-पोटऱ्या दुखतात, अस्वस्थ वाटायला लागते आणि उन्हाळा दु:सह्य होतो. हे टाळायला भरपूर पाणी प्यावे. भरपूर म्हणजे किती? तर साधारणपणे दर तासाला एक ग्लास. मग यामध्ये तुम्ही मध्येच एखाद्यावेळी पाण्याऐवजी, ग्लासभर लिंबू सरबत, कोकम सरबत, पन्हे, ताज्या फळांचा घरी बनवलेला रस, ताक, लस्सी, शहाळे घेऊ शकता. थोडक्यात काय तर दिवसभरात विविध रूपाने दोन लिटर चांगल्या पद्धतीचे, द्रव पदार्थ आपण प्राशन केले पाहिजेत. त्यायोगे उन्हामुळे आपल्या अंगातून नाहीसे होणारे पाणी आणि क्षार प्रमाणबद्ध राहतात आणि उन्हाळ्याचे हे त्रास दूर पळतात.

उन्हाळ्यात एकसारखी तहान लागते, मात्र त्यासाठी लगेच बर्फाळलेली कोलायुक्त किंवा तत्सम शीतपेये, कृत्रिम सरबते, तयार मिळणारे पॅकबंद रस अथवा फ्रीजमधले दातांना कळा आणणारे पाणी प्यायची गरज नसते. खरे तर या अतिथंड पेयांनी तहान तर भागत नाहीच, पण घसा दुखायला लागून सर्दी, ताप, खोकला होण्याची शक्यता मात्र दाट असते. त्याऐवजी माठातले साधे थंड पाणी प्यायले तर तहान निश्चितच शमते आणि कुठलाही त्रास होत नाही.

लक्षात असू द्या भर दुपारच्या उन्हातून घामाघूम होऊन आल्यावर लगेच पाणी पिऊ नये. आल्यावर थोडावेळ शांत बसावे. अंगातला घाम निथळू द्यावा. हवे तर टॉवेलने अंग पुसून घ्यावे. शरीर थोडे गार होईल, मग हवे तेवढे साधे थंड पाणी प्यावे. उन्हातून आल्या आल्या पाणी पिण्याने होणारे सर्दी, डोकेदुखी असे त्रास अजिबात होणार नाहीत.

  • उन्हाळ्यात लिंबू सरबत दिवसातून किमान दोनदा घ्यावे. त्यामध्ये पाणी, लिंबाचा रस आणि चवीपुरती साखर तर घालावाच; पण चिमूटभर मीठ आणि पाव चमचा खायचा सोडासुद्धा घालावा. यामुळे आपल्या शरीरातील क्षारांचे प्रमाण व्यवस्थित राहून कामाला जास्त हुरूप येऊ शकतो.
  • या दिवसात कलिंगड, संत्री, काकड्या, द्राक्षे अशा फळांचा समावेश आपल्या आहाराबरोबर असला तर आरोग्य नक्की उत्तम राहते.
  • शहाळी या उन्हाळ्यात जरूर घ्यावीत. पण रोज दोन तीनदा ते पिण्याचा रतीब लावण्याऐवजी, एखादे शहाळे दोन-तीन दिवसातून घेतल्यास जास्त बरे. शहाळ्यात पोटॅशियम भरपूर असते, त्यामुळे ते अधून मधून जरूर प्यावे, पण त्याचा अतिवापर टाळावा.
  • उन्हाच्या वेळी बाहेर जाणे शक्यतो टाळावे; पण जावेच लागत असेल तर डोके झाकावे. टोपी, हॅट किंवा स्कार्फ बांधणे उत्तम ठरते. त्यामुळे सूर्याच्या कडक उष्णतेचा संपर्क आपल्या डोक्याशी थेट होणे टळते आणि शरीरातील पाणी थोडे कमी प्रमाणात नष्ट होते.
  • उन्हाळ्याच्या काळात, अंगावरील कपडे सैल असावेत, शक्यतो सुती आणि फिकट रंगाचे असावेत. गडद रंगाचे, सिंथेटिक कापडाचे आणि घट्ट कपडे घातल्याने अधिक गरम होते, जास्त घाम येतो, साहजिकच जास्त मरगळल्यासारखे वाटते. शिवाय, त्यामुळे गजकर्ण, घामोळ्या असे त्वचेचे विकार होतात.
  • उन्हाच्या वेळी बाहेर जाताना डोळ्यावर काळा चष्मा लावणे आवश्यक असते. ज्या योगे प्रखर उन्हामुळे डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, डोळ्यांतून सारखे पाणी येणे असे त्रास कमी होतात.
  • स्त्रियांनी, मुलांनी आणि पुरुषांनीदेखील, उन्हात जाताना सनस्क्रीन लोशन चेहऱ्याला व हातांना लावावे. त्यामुळे त्वचा लाल होणे, तिच्यावर काळे डाग पडणे, चट्टे उठणे असे विकार होत नाहीत.
  • रोजच्या रोज किंचितशा गार पाण्याने स्वच्छ अंघोळ करावी आणि अंघोळीनंतर एखादी टाल्कम पावडर अंगाला लावावी. डीओडोरंट फवारण्याऐवजी टाल्कम पावडर या दिवसात त्वचेला जास्त योग्य असते. रोज तीन-चार वेळा चेहरा आणि डोळे साध्या गार पाण्याने स्वच्छ धुवावेत. त्यामुळे उन्हाळ्यात चेहऱ्यावर फोड येणे आणि डोळ्यांना रांजणवाडी होणे टळते.
  • उन्हाळ्यात मांसाहार टाळावा. तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. शक्यतो पालेभाज्यांवर भर ठेवावा, कारण शरीरातील पाणी कमी होण्याने बद्धकोष्ठता वाढते आणि त्यात मांसाहाराने अधिक त्रास होऊन मूळव्याध होण्याची शक्यता असते. याच कारणासाठी या दिवसात धूम्रपान आणि मद्यप्राशनही करू नये.

    एप्रिलमध्ये शाळांच्या परीक्षा संपून सुट्ट्या लागतात, त्यामुळे मुलांचा दुपारभर धिंगाणा चालू असतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी जरूर खेळावे, पण सकाळी लवकर उठून ११ च्या आत मैदानी खेळ खेळावेत. दुपारी ११ ते सायंकाळी पाच या काळात बाहेर खेळण्याऐवजी घरातील बैठे खेळ, वाचन, टीव्ही, कम्प्युटर अशा इतर करमणुकीच्या साधनांचा आनंद घ्यावा. संध्याकाळी उन्हे उतरल्यावर पुन्हा खेळायला हरकत नाही. दुपारी मैदानी खेळ खेळल्याने उष्माघात होण्याचा धोका असतो.

    खेळताना जवळ पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या जवळ असाव्यात. खेळताना आणि खेळून झाल्यावर त्यातील थोडे थोडे पाणी घोट घोट घ्यावे. एकदम गटागटा पाणी पिऊ नये.

    उन्हे तापलेली असताना, दुपारी जेवण झाल्यावर लगेच झोपण्याचा मोह होतो आणि उन्हाळ्याच्या दुपारी झोपही शांत लागते. पण शक्यतो जेवल्या जेवल्या लगेच आडवे होऊ नये आणि वामकुक्षी घेतल्यास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ नसावी. दुपारी झोपल्याने वजन तर अनियंत्रितपणे वाढतेच, पण अॅसिडिटी, अपचन हेही विकार उद्भवतात.

    उन्हाळ्यात रात्री झोपताना सीलिंग पंख्याखाली झोपल्यामुळे किंवा टेबल फॅन असेल तर त्याचे वारे अंगावर सतत येईल असे झोपल्याने सकाळी उठल्यावर अंग दुखणे, हातापायांना मुंग्या येणे असे त्रास संभवतात. सीलिंग पंखा खोलीच्या मध्यभागी असतो, त्यामुळे खोलीत कडेला झोपावे आणि टेबल पंखा फिरता ठेवावा. खोलीत वारे खेळते राहायलाच हवे, त्यासाठी खिडक्या उघड्या हव्यात. मधेच रात्री येणारी वाऱ्याची झुळूक वेगळाच आनंद देऊन जाते.

    उन्हाळ्याच्या काळात या सर्व गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर ग्रीष्मातल्या शारीरिक चटक्यांपासून बचाव होऊन आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच निरामय आणि सुखद गारवा निर्माण होईल.

डॉ. अविनाश भोंडवे

(लेखक आरोग्य विश्लेषक आणि पुण्यातील प्रसिद्ध फॅमिली डॉक्टर आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे ते माजी अध्यक्ष आहेत)

अन्य लेख

संबंधित लेख