महापालिकेने खासगी संस्थेला चालविण्यास दिलेल्या फुगेवाडी येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींशी शाळेतीलच कर्मचाऱ्याने अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच शाळेतील एका विद्यार्थिनीचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केल्याचेही उघडकीस आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी भोसरी (दापोडी) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सरफराज मन्सूर शेख (वय ३२, रा. कोंढवा) याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हा शाळेत प्रशासकीय सहायक म्हणून काम करतो. त्याने ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत मुलींचे शोषण केले आहे. शाळेतील १३ वर्षीय मुलीने मुख्याध्यापकांना १५ ऑक्टोबर रोजी भेटून शेख याने ‘बॅड टच’ केल्याचे सांगितले
तसेच माझ्याप्रमाणे १५ वर्षीय एका मुलीबाबतही शेख याने असाच प्रकार केल्याचे पीडित मुलीने मुख्याध्यापकांना सांगितले. या दोन घटनांबरोबरच शेख याने एका मुलीचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केल्याची माहिती पीडित मुलीने मुख्याध्यापकांना दिली. त्यानंतर मुख्याध्यापकांनी तत्काळ भोसरी पोलीस ठाणे गाठले.