Tuesday, October 22, 2024

योगेंद्र यादव यांच्या अकोल्यातील विचारसभेत वंचित बहुजन आघाडीचा गोंधळ

Share

अकोला : स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक आणि भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांच्या अकोल्यातील विचारसभेत सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. या कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की, घोषणाबाजी, आणि खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली, ज्यामुळे काही काळ तेथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

नेमके काय घडले?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र डेमोक्रेटीक फोरम आणि भारत जोडो अभियानांतर्गत योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लोकशाहीची सुरक्षा आणि आपले मत’ या विषयावर विचारसभेचे आयोजन अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवनात करण्यात आले होते. विचारसभेदरम्यान, योगेंद्र यादव यांचे भाषण सुरू असताना सभागृहात उपस्थित वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही तीव्र प्रश्न विचारले.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आरक्षणविरोधी भूमिका घेणाऱ्या आणि आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसला मतदान कसे करावे, असा प्रश्न योगेंद्र यादव यांना विचारला. तसेच, महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपला मतदान केले असताना काँग्रेसने कोणतीही कारवाई न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजपविरोधी भूमिका स्पष्ट न करता मतदारांनी मतदान कुणाला करावे, यावर योगेंद्र यादव यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावरून सभागृहात वातावरण तापले आणि दोन्ही बाजूंतील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी यादव यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे आयोजकांना त्यांची सुरक्षा वाढवून त्यांना सभागृहातून सुरक्षित बाहेर काढावे लागले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला समर्थन करण्याच्या भूमिकेचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. घटनेनंतर पोलिस बंदोबस्तामध्ये योगेंद्र यादव यांना अकोल्यातून सुरक्षितरित्या पुढे पाठवण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख