Thursday, November 14, 2024

‘निर्मल वारी’ दशकपूर्ती निमित्त पुण्यात सन्मान सोहळ्याचे आयोजन

Share

पंढरीच्या वारीमध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘निर्मल वारी’ या अभियानाचा दशकपूर्ती सोहळा रविवारी, १० नोव्हेंबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात ‘निर्मल वारी’ अभियानात उत्कृष्ट योगदान देणार्‍यांचा विशेष सन्मान केला जाईल.

पंढरीची वारी हे अवघ्या महाराष्ट्राचे भूषण आहे. संतपंरपरा म्हणजे पंढरीची वारी. या वारीला निर्मल करण्याचा ध्यास पुण्यातील ‘सेवा सहयोग फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने २०१४ साली घेतला आणि एका आगळ्या अभियानाचा प्रारंभ झाला. या आगळ्या अभियानाची यंदा दशकपूर्ती झाली. त्यानिमित्ताने या उपक्रमात लक्षणीय कार्य केलेले स्वयंसेवक, शासकीय कर्मचारी, अधिकारी, गावागावांमधील युवामंडळे, स्वयंसेवी संस्था, सरपंच, स्वच्छता कर्मचारी आदिंचा विशेष सन्मान सोहळा रविवारी १० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

‘सेवा सहयोग फाउंडेशन’ आणि ‘निर्मल वारी अभियान’ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी ही माहिती दिली. या अभियानाचे मार्गदर्शक ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, माजी खासदार प्रदीप रावत, संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे प्रमुख किरण ढमढेरे आणि अतुल नागरस हेही यावेळी उपस्थित होते.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची या सन्मान सोहळ्यात प्रमुख उपस्थिती असेल. त्यांचे मार्गदर्शनही उपस्थितांना लाभणार आहे. कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

निर्मल वारी या अभियानाची माहिती ऐकण्यासाठी तसेच हे अभियान यशस्वी करणार्‍या सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन ‘सेवा सहयोग फाउंडेशन’नेे केले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख