पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर येथील सर्व ईव्हीएम , व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिट भोसरी येथील गोदामात ठेवण्यात आली आहेत. 45 दिवस या ईव्हीएम मशीनचे व त्यातील डेटाचे जतन करण्यात येणार आहे.
उमेदवारांकडून ४५ दिवसांच्या आत आक्षेप आल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतांची पुनर्मोजणी करण्यात येते. त्यामुळे 45 दिवस ईव्हीएम मशीन डेटा ठेवण्यात येणार आहे. मात्र, आक्षेप न आल्यास ईव्हीएममधील सर्व डेटा 45 दिवसानंतर नष्ट करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मतमोजणी झाल्यानंतर या मशीन पुन्हा सील करून भोसरी येथील गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी स्ट्रॉंग रुम तयार करण्यात आली असून या ठिकाणी या मशीन सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त 24 तास तैनात असणार आहे.
एखाद्या उमेदवाराकडून मतमोजणीबाबतत आक्षेप आल्यास तसेच या मतमोजणी संदर्भात न्यायालयात दावा केल्यास मतमोजणी सर्व रेकॉर्ड उपलब्ध असावे. तसेच मशीनमधील डेटा उपलब्ध असावा, त्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या ईव्हीएम 45 दिवस जपून ठेवण्यात येणार आहे. जर या मुदतीत कोणाचाही आक्षेप नसेल तर या सर्व मशीन मधील डेटा क्लिअर करून त्या मशिन निवडणूक आयोगाकडे पाठविल्या जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.