पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. राज्यात भयंकर थंडी आणि गारठ्याचे प्रमाण वाढले असून, उत्तरेकडील शीत लहरींमुळे पुढील चार दिवसांसाठी राज्यात थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नागरिकांना असह्य केलं आहे. आज महाबळेश्वरपेक्षा (Mahabaleshwar) पुण्यात तापमान कमी नोंदवले गेले आहे. पुण्यात (Pune) तापमान 10 अंशांच्या खाली घसरले असून, राज्यभरात पहाटेच्या वेळी तापमानातील घसरण दिसून येत आहे. किमान तापमान सरासरीपेक्षा 2 ते 6 अंशांनी कमी झालं आहे. आज महाबळेश्वरमध्ये 13.5°C तापमान होतं, तर पुण्यात पारा 7.8°C होता.
तापमानाच्या घसरणीचा कडाका वाढत असून पुणे, नाशिक, लातूर आणि इतर भागांमध्ये थंडीची लाट तीव्र होत आहे. जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतातील बहुतेक राज्यांमध्ये तापमान शून्याच्या खाली गेलं आहे. भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तीव्र थंडीचा इशारा दिला आहे. येत्या 24 तासांत राज्यात तापमान आणखी 3 ते 5 अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे.