Sunday, December 22, 2024

लाडकी बहीण योजने’चा डिसेंबरचा हप्ता कधी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Share

नागपूर : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेच्या डिसेंबर (December) महिन्याचा हप्ता कधी वितरित होईल, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली.

हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये जमा केले जातील. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणताही विलंब होणार नाही.”

मुख्यमंत्र्यांनी योजनेच्या सातत्याबाबत दिलासा देत म्हटले की, “आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत. लाडकी बहिण योजना सुरूच राहील. कोणत्याही प्रकारचे निकष बदलले गेलेले नाहीत. ज्यांनी अर्ज केले आहेत, त्या सर्व लाभार्थींना वेळेवर पैसे मिळतील.”

यासोबतच विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत त्यांनी सांगितले की, “कोणीही मनात शंका ठेवू नये. ही योजना गरजू महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, ती अधिक प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.”

‘माझी लाडकी बहिण योजना’ महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षमीकरण देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिलांना त्यांचे दैनंदिन आर्थिक प्रश्न सोडवण्यास मदत होत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख