Wednesday, April 2, 2025

गुढीपाडव्यापासून विश्व हिंदू परिषदेतर्फे मंदिर दर्शन अभियानासह रामोत्सव

Share

हिंदू नववर्ष स्वागत, रामोत्सव आणि मंदिर दर्शन अभियान अशा तीन अभियानांचे आयोजन विश्व हिंदू परिषदेने केले आहे.

येत्या गुढीपाडव्या (Gudhi Padwa) पासून पुढे वीस दिवस तीन अभियानांचे आयोजन विश्व हिंदू परिषदेने (Vishva Hindu Parishad) केले आहे. गुढीपाडवा, ३० मार्चला असून मंदिरांनी पुढाकार घ्यावा आणि हिंदू नववर्षाचे स्वागत विविध कार्यक्रमांनी करावे, गुढीपाडवा ते हनुमान जयंती या काळात समाजात विविध पद्धतीने रामोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करावा आणि गुढीपाडवा, ३० मार्च ते २० एप्रिल या काळामध्ये तीन अपरिचित मंदिरांचे दर्शन घेऊन मूर्तीवर कुंभातील गंगाजलाने जलाभिषेक करावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले आहे. या तिन्ही कार्यक्रमात हिंदू समाजाने, तसेच विविध धार्मिक संस्था, संघटना, मंदिरे, संत, धर्माचार्य, पुरोहित, पुजारी, विश्वस्त आणि भाविकांनी मोठ्या संख्यने सहभागी व्हावे, असेही आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे.

हिंदू नववर्ष स्वागत

येत्या चैत्रशुद्ध प्रतिपदे पासून हिंदू नवीन वर्ष सुरू होईल. आमची प्राचीन शास्त्रीय हिंदू कालगणना पुन्हा प्रस्थापित व्हावी, याकरिता हिंदूंचे, नवीन वर्ष जे चैत्र शुद्ध प्रतिपदे पासून सुरू होते, त्या नववर्ष स्वागताचे धार्मिक क्षेत्रातील नेतृत्व मंदिरांनी करावे आणि समाजाचीही तशी स्वाभाविक अपेक्षा आहे. त्या दृष्टीने मंदिरांनी पुढाकार घेऊन आपल्या वस्तीत या कार्यक्रमाची योजना करावी, असे आवाहन मंदिरांचे विश्वस्त तसेच व्यवस्थापकांना करण्यात आल्याचे विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे आणि मंदिर आयामचे क्षेत्र संपर्कप्रमुख अनिल सांबरे यांनी सांगितले.

मंदिरांसाठी किमान कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. मंदिरांनी आपल्या शक्तीनुसार हिंदू घरांवर लावण्यासाठी भक्तांना किमान शंभर, पाचशे, हजार भगवे ध्वज वितरित करावेत, प्रत्येक मंदिरावर मोठ्या आकाराचा भगवा ध्वज लावावा, या ध्वजाचे पूजन आसपासच्या विविध समाजातील अकरा वा एकवीस तरुण जोडप्यांच्या हस्ते करावे, गुढीपाडव्याच्या दिवशी वस्तीतच शोभायात्रा काढावी किंवा जाहीर कार्यक्रम करावा, आपल्या परिसरातील अतिशय गरीब, मजूर, उपेक्षितांना मिठाईवाटप, कपडे वाटप, असा काही ना काही त्यांना समर्थ करणारा सेवा कार्यक्रम करावा, असे कार्यक्रम मंदिरांनी आयोजित करावेत अशी अपेक्षा आहे.

अपरिचित मंदिर दर्शन अभियान

हिंदू समाजाला प्रामुख्याने नवीन पिढीला मंदिरांशी पुन्हा घट्ट जोडणे, मंदिरांविषयी जनजागृती, मंदिर विचाराच्या/जीवनाच्या केंद्रस्थानी आणणे आणि या निमित्ताने मंदिर गणना हे तीन उद्देश अपरिचित मंदिर दर्शन अभियानामागे आहेत. रामनवमी ६ एप्रिल ते २० एप्रिल हा या अभियानाचा पंधरा दिवसांचा कालावधी आहे. महाराष्ट्रात या काळात एक लाख वेगळ्या, अपरिचित मंदिरांपर्यंत हिंदू युवा वर्ग पोहोचेल, असा विश्वास सांबरे यांनी व्यक्त केला आहे.

कोणत्या मंदिरांना भेट द्यावी ?

ज्या मंदिरामध्ये आपण आधी गेलेलो नाही, भेट दिलेली नाही, दर्शन घेतलेले नाही, असे आपल्या गावातील, तालुक्यातील अपरिचित मंदिर, सेवा वस्तीतील मंदिरे, तसेच संवेदनशील वस्तीत टिकून असलेली मंदिरे, येथे जावे. यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने किमान तीन मंदिरांना भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मंदिर दर्शनाच्या वेळी कुंभाहून आणलेल्या पवित्र गंगाजलाचा तेथील मूर्तीवर जलाभिषेक करावा., स्थानिक पुजारी किंवा मंदिराची देखभाल करणाऱ्यांचे अभिनंदन करावे, मंदिर ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी उभारले, टिकवले, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, मंदिराची तसेच पुजारी वगैरे माहितीचे संकलन करावे, या उपक्रमाची माहिती समाजमाध्यमांवर छायाचित्रांसह अवश्य द्यावी आणि या उपक्रमात सहभागी होण्याचे सर्वांना सुचवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. मंदिरांनी या दरम्यान येणाऱ्या भाविकांना टिळा लावावा, प्रसाद द्यावा, येणाऱ्यांची आस्थेने चौकशी करावी, त्यांना मंदिराची माहिती द्यावी, असेही सुचविण्यात आले आहे.

रामोत्सवाचेही आयोजन

चैत्र शुक्ल प्रतिपदा ३० मार्चपासून, हनुमान जयंती, १२ एप्रिलपर्यंत सर्वत्र रामोत्सव करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. प्रारंभी प्रभू रामाची स्तुती, शेवटी प्रभू श्री रामाची आरती, संतांची प्रवचने आणि आशीर्वाद अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असेल. यावेळी प्रभू श्री रामांच्या जीवनकथेचा संदर्भ देत समरसता आणि कौटुंबिक प्रबोधन हा विषय मांडला जाईल. रामोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करावा, असेही आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख