Friday, May 23, 2025

अहिल्यादेवी होळकर यांचे स्थापत्य कार्य: धर्मरक्षण आणि धर्मसंवर्धन यांची प्रतीके

Share

अहिल्यादेवी होळकर या लोककल्याणकारी शासक होत्या. त्यांनी जनतेला केंद्रस्थानी ठेवून राज्यकारभार केला. त्यांच्या कार्याची व्याप्ती ही त्यांच्या माळवा प्रदेशापुरती मर्यादित नव्हती तर, संपूर्ण भारतभर त्यांनी जी मंदिरे, घाट, धर्मशाळा, तलाव, पूल, रस्ते, वसाहती बांधल्या त्या वास्तू या आजही त्यांच्या दूरदृष्टीचे आणि लोकसेवेच्या उत्कटतेचे साक्षीदार आहेत. त्यांच्या कामांमध्ये हिंदू धर्माबाबतची अतीव निष्ठा, सामाजिक समरसता, आर्थिक न्याय, पर्यावरणपूरक विचार आणि सार्वजनिक हित या मूल्यांचे स्पष्ट प्रतिबिंब दिसून येते. 

अहिल्यादेवींनी केलेले बांधकाम हे फक्त दगड-मातीचे नव्हते,
तर ती जनतेसाठी उभी केलेली एक जिवंत सेवाभावाची पायवाट होती.

https://socialstudiesfoundation.org/wp-content/uploads/2024/05/UV-14th-MAY.pdf

विश्लेषणात्मक दृष्टीकोन – 

अहिल्यादेवींनी संपूर्ण देशभरात मंदिरे, घाट, विहिरी, धर्मशाळा, पूल, रस्ते व कुंड उभारली. तसेच अनेक ठिकाणी मंदिरांचे जीर्णोद्धारही केले. हे त्यांचे धार्मिक कार्य होते. हे धार्मिक कार्य समाजकार्याशी जोडलेले होते. आजूबाजूला घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांकडे लक्ष ठेवून त्यांनी त्यातून धडा घेतला जसे पानिपत युद्धावेळी सैन्य पाणी पाणी करत मेले, हे लक्षात घेऊन त्यांनी ठिकठिकाणी विहिरी बांधल्या. युद्धजन्य किंवा आपत्तकालीन परिस्थितीत आश्रयस्थाने हवीत म्हणून धर्मशाळा बांधल्या. मुसलमानांच्या आक्रमणामध्ये हिंदू मंदिरे तोडली जात. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असे आपल्या प्रजेमध्ये चांगला संदेश जावा याउद्देशाने त्यांनी काही मंदिरे बांधली तर काहींचा जीर्णोध्दार केला. विविध नद्यांवर सुंदर घाट बांधले. त्यांचे हे कार्य  श्रद्धा आणि सेवा यांचा सुंदर संगमच म्हणावे लागेल. 

अहिल्यादेवी – देशभरातील स्थापत्यनिर्माणामागील  प्रेरणा 

अहिल्यादेवी होळकर या धर्माभ्यासक होत्या. भारतीय वैदिक परंपरेतील मूल्ये, विचारधारा आणि धर्मदृष्टी त्यांच्याकडे होती. वेद आणि उपनिषदे यांतील समाजकल्याण, धर्मपालन आणि प्रकृतीसह समन्वय त्यांनी प्रत्यक्षात साधला.  

याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा वैचारिक वारसा त्यांनी पुढे चालू ठेवला. महाराजांच्या तत्वांवर त्यांनी आपला राज्यकारभार चालवला. शिवाजी महाराजांनी धर्मसंरक्षण, स्वराज्य स्थापना, आणि जनतेच्या कल्याणाचा आदर्श उभा केला, त्याच तत्वांचा प्रभाव अहिल्याबाईंनी प्रत्यक्षात उतरवला. जसे शिवरायांनी मुघल आक्रमणांतून हिंदू मंदिरांचे रक्षण केले, तसेच अहिल्यादेवींनी काशी विश्वनाथ, सोमनाथ, रामेश्वरम, केदारनाथ यांसारख्या उद्ध्वस्त मंदिरे पुन्हा बांधून धार्मिक पुनरुत्थान घडवून आणले. शिवाजी महाराजांच्या “प्रजा हीच परमेश्वर” या तत्त्वाला अनुसरून त्यांनी धर्मशाळा, विहिरी, अन्नछत्रे, घाट आणि पाणपोया उभारल्या, ज्या केवळ धार्मिक नव्हत्या, तर जनसामान्यांच्या  मूलभूत गरजांशी जोडलेल्या होत्या. शिवरायांनी जसे स्थानिक किल्ले, रस्ते आणि बंदरे बांधून स्वदेशी स्थापत्यशैलीला चालना दिली, तसाच स्थानिक शिल्पकारांचा उपयोग अहिल्यादेवींनीही केला. दोघांच्या कार्यात धर्म, समाज आणि राष्ट्र यांचा त्रिवेणी संगम होता.

धार्मिक आणि आध्यात्मिक प्रेरणा

अहिल्यादेवी होळकर या केवळ एक राजमाता नव्हत्या, तर त्या अत्यंत मातृहृदयी, श्रद्धाळू, धर्मनिष्ठ आणि भक्तिपरायण स्त्री होत्या. भगवान शंकर, विष्णू, राम, कृष्ण यांच्याप्रती त्यांची निष्ठा प्रगाढ होती. त्यांनी मंदिरे, घाट, तीर्थक्षेत्रे यांचे जे पुनरुज्जीवन केले, त्यामागे केवळ स्वतःचा मोक्ष साधणे हा उद्देश नव्हता, तर संपूर्ण समाजाच्या अध्यात्मिक उत्थानाची भावना होती. मुघल आक्रमणांनी उद्ध्वस्त केलेली काशी, सोमनाथ, रामेश्वर, केदारनाथ, महाकालेश्वर अशा अनेक तीर्थस्थळांची त्यांनी पुनर्बांधणी केली. हे कार्य केवळ वास्तुशिल्पाच्या पातळीवर न थांबता, धर्माच्या गाभ्यात उर्जा फुंकणारे ठरले. त्यांनी नष्ट झालेल्या श्रद्धास्थानांचे पुनरुत्थान करून हिंदू समाजाच्या आत्मविश्वासाला बळ दिले. त्यांच्या धर्मसेवेतील वैशिष्ट्य हे की, ती कुठल्याही जात, पंथ, वर्गविरोधी द्वेषाच्या भावना न बाळगता, समतेच्या, सहिष्णुतेच्या आणि सेवाभावाच्या तत्त्वांवर आधारित होती. त्यामुळे त्यांना धर्मरक्षिका  म्हटले गेले, मात्र  त्या धर्माच्या रूढ चौकटीत कधीही अडकलेल्या नव्हत्या. 

https://socialstudiesfoundation.org/wp-content/uploads/2024/05/UV-14th-MAY.pdf

 राष्ट्रएकात्मतेचा धागा विणण्यासाठी

अहिल्यादेवींच्या बांधकाम कार्याची एक अनोखी बाब म्हणजे, त्यांनी ती केवळ आपल्या माळवा राज्यापुरती मर्यादित ठेवली नाही. त्यांच्या कार्याचा विस्तार संपूर्ण भारतभर पसरलेला होता. उत्तर भारतातील बद्रीनाथ, केदारनाथ, काशी, अयोध्या, गयेसारख्या स्थळांपासून ते दक्षिणेतील रामेश्वरम् आणि तामिळनाडूतील गंगाकुंडपर्यंत, पश्चिमेतील सोमनाथ व द्वारकापासून पूर्वेतील पुरी, गंगोत्री आणि बंगालपर्यंत – त्यांनी शेकडो ठिकाणी मंदिरे, घाट, धर्मशाळा, अन्नछत्रे उभी केली. या कार्यातून त्यांनी विविध प्रांतांतील, भाषांतील, जातीधर्मांतील जनतेला एका समान सांस्कृतिक सूत्रात गुंफले. त्या काळात तीर्थयात्रा ही केवळ धार्मिक नव्हती, तर ती सामाजिक आणि सांस्कृतिक संवादाचे माध्यम होती. त्या संवादास स्थैर्य, सोय आणि परंपरेचे अधिष्ठान त्यांनी दिले. त्यामुळे त्यांच्या बांधकामांनी भारतीय उपखंड वैविध्यपूर्ण भौगोलिक एकात्मतेच्या आध्यात्मिक धाग्याने जोडला गेला.

https://socialstudiesfoundation.org/wp-content/uploads/2024/05/UV-14th-MAY.pdf

जनसामान्यांच्या सेवेसाठी

अहिल्यादेवींनी तयार केलेली मंदिरे किंवा घाट हे केवळ पूजा-अर्चा, यज्ञ-हवनासाठी उभी राहिलेली नव्हती. त्या वास्तूंच्या केंद्रस्थानी जनसामान्य माणसाची गरज, श्रमजीवी वर्गाची उपयुक्तता आणि यात्रेकरूंची सेवा ही भावना होती. त्यांनी उभारलेल्या मंदिरांच्या आजूबाजूला धर्मशाळा, अन्नछत्र, पाणपोई, घाट, कुंडे, स्नानगृहे, विश्रांतीगृहे अशा सर्व सार्वजनिक सुविधा पुरवल्या होत्या. त्या स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना देणाऱ्या होत्या. यातून गवंडी, विणकर, शिल्पकार, कुंभार, कातकरी, रंगारी, मजूर अशा अनेकांना सतत काम आणि उत्पन्न मिळाले. अशा रीतीने त्यांच्या बांधकाम कार्याचा परीघ हा धार्मिकतेपुरता न राहता हे  कार्य आर्थिक पुनरुज्जीवनाचा आणि लोककल्याणाचा प्रभावी साधन ठरला.

अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतभर जे मंदिरे उभारली किंवा जीर्णोद्धारित केली, ती पाहता त्यांच्या कार्याची व्याप्ती किती व्यापक आणि दूरदृष्टीपूर्ण होती, हे स्पष्ट होते. त्यांच्या बांधकाम कार्याचा उद्देश केवळ धार्मिक भावना व्यक्त करणे हा नव्हता, तर त्यामागे एक सुस्पष्ट सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दृष्टिकोन होता. उत्तर भारतातील केदारनाथ, बद्रीनाथ, अयोध्या, काशीपासून ते दक्षिणेतील रामेश्वरम, श्रीशैलम, पश्चिमेतील सोमनाथ, द्वारका ते पूर्वेतील गया, पुरी, गंगोत्री आणि बंगालपर्यंत त्यांनी जे मंदिरे आणि तीर्थक्षेत्र उभे केले, त्यातून त्यांनी अखंड भारताला एका सांस्कृतिक धाग्याने जोडले. या मंदिरे आणि घाटांबरोबरच त्यांनी धर्मशाळा, अन्नछत्र, पाणपोई, कुंडे, घाट रस्ते यांसारख्या जनसुविधा निर्माण केल्या, ज्या सामान्य जनतेच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या होत्या. त्यांच्या या कार्यातून धर्मसंवर्धनाबरोबरच जनसेवा, संस्कृतीचे जतन आणि राष्ट्रबांधणी यांचा त्रिवेणी संगम दिसतो. त्यामुळे अहिल्यादेवींची ओळख केवळ एक भक्तिमय राणी म्हणून न राहता, ती एक दूरदृष्टीची प्रशासक, सांस्कृतिक पुरस्कर्ती आणि लोकमाता म्हणून दृढ होते.

https://socialstudiesfoundation.org/wp-content/uploads/2024/05/UV-14th-MAY.pdf

अहिल्यादेवी होळकर यांनी  देशभरात खालील ठिकाणी मंदिर निर्मिती केली आहे.  

उत्तर भारत

  • काशी (वाराणसी) – काशी विश्वेश्वर मंदिर
  • हरिद्वार – गंगा घाटांचे जीर्णोद्धार
  • गंगोत्री – मंदिर व परिसर दुरुस्ती
  • केदारनाथ – मंदिर पुनर्बांधणी
  • देवप्रयाग, नीलकंठ महादेव, ऋषिकेश – मंदिरांचे जीर्णोद्धार
  • अयोध्या – विविध मंदिरांचे बांधकाम
  • बद्रीनाथ – धार्मिक कामे
  • गया – विष्णुपद मंदिर (१७८७)
  • कुरुक्षेत्र – शिव शांतनू महादेव मंदिर
  • मथुरा, वृंदावन – मंदिर व घाट दुरुस्ती
  • बिथूर – ब्रह्मावर्त घाट
  • सारधाना – चंडी देवी मंदिर
  • सांभळ ग्राम – लक्ष्मीनारायण मंदिर
  • सुलतानपूर, कुमेर, अनंदकानन – विविध मंदिरे

 मध्य भारत व महाराष्ट्र

  • महेश्वर – काशी विश्वनाथ, राम मंदिर, राजराजेश्वर, कलेश्वर
  • उज्जैन – महाकालेश्वर मंदिर
  • भिमाशंकर – मंदिर सुधारणा
  • नाशिक – रामकुंडजवळ काळाराम मंदिर
  • औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, ओझर, कोल्हापूर – प्रमुख मंदिरे
  • सप्तश्रृंगी, पैठण, पंढरपूर, शिरपूर, शिंगणापूर, चिखलदरा, मिरी, संगमनेर, शिर्डी, बीड, भुसावळ, जेजुरी, शिरपूर, रावेर, पलधी (जामनेर) – विविध देवस्थाने
  • त्र्यंबकेश्वर – त्रिभुवनेश्वर महादेव मंदिर व कुशावर्त कुंड दुरुस्ती
  • वेरुळ (घृष्णेश्वर) – घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर (१७९१)

पश्चिम भारत (गुजरात)

  • सोमनाथ – मूळ मूर्तीसह मंदिर पुनर्बांधणी (१७८३)
  • द्वारका – द्वारकाधीश मंदिर
  • नाथद्वारा – श्रीनाथजी मंदिरातील अहिल्या कुंड

दक्षिण भारत

  • रामेश्वरम् – धार्मिक बांधकामे
  • श्रीशैलम – मल्लिकार्जुन मंदिर
  • आलमपूर – अनेक मंदिरांचे जिर्णोद्धार

पूर्व भारत व इतर

  • जगन्नाथपुरी – श्रीरामचंद्र मंदिर
  • भूषणपूर (बंगाल) – लक्ष्मीनारायण मंदिर
  • अमरकंटक, बेलूर, बाणपूर, देवगुराडिया, रांपूरा, टिलभंडेश्वर – मंदिरे
  • ओंकारेश्वर (ओंकारमंढाता) – विश्वनाथ मंदिर व मणिकर्णिका घाट
  • चिखलदा – नीलकंठेश्वर मंदिर
  • चौंडी – महादेव मंदिर

अहिल्यादेवींनी बांधलेल्या विहिरी आणि पाणपोई 

भोजायाश्वं सं मृजन्त्याशुं भोजायास्ते कन्या शुम्भमाना ।
भोजस्येदं पुष्करिणीव वेश्म परिष्कृतं देवमानेव चित्रम् ॥१०॥

ऋग्वेदात हा उल्लेख येतो. अहिल्याबाईंनी याचा आदर्श घेऊन जलकुंभ बांधले. अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकहितकारी कार्यामध्ये विहिरी, तलाव, कुंडे आणि पाणपोया यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. त्या केवळ धार्मिक श्रद्धास्थळे उभारणाऱ्या राणी नव्हत्या, तर त्यांनी पिण्याच्या पाण्याची आणि जलस्रोतांची सोय करून सामान्य जनतेसाठी जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम केले.

त्यांनी महेश्वर, नाशिक, नंदुरबार, परळी, पंढरपूर, वेरूळ, त्र्यंबकेश्वर अशा अनेक ठिकाणी विहिरी बांधल्या आणि जुन्या विहिरी साफ करून पुन्हा कार्यान्वित केल्या. नंदुरबार भागात त्यांनी १५ ते १६ विहिरी बांधल्या होत्या, जेव्हा तिथे पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण होती. त्याचप्रमाणे पंढरपूर येथे यात्रेकरूंकरिता “पेशवा बारव” नावाची विहीर उभारण्यात आली होती, जिचा उपयोग शेकडो लोकांनी एकत्र केला.

पाणपोया हे त्यांचे आणखी एक सामाजिक कार्याचे वैशिष्ट्य होते. यात्रेकरू, भाविक, गरजू लोक यांना पिण्याचे शुद्ध पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि रस्त्यांजवळ पाणपोया उभारल्या. त्यांच्या पाणपोया केवळ विशिष्ट स्तरातील लोकांसाठी नव्हत्या, तर त्या समाजाच्या प्रत्येक स्तरासाठी खुल्या आणि निशुल्क होत्या. त्यामुळे त्या काळात महिलांना, वृद्धांना, शेतकऱ्यांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

या सर्व कामांमागे त्यांची पर्यावरणपूरक विचारधारा, जलसंधारणाची जाण, आणि सर्वसामान्यांसाठीची तळमळ ही मूलभूत प्रेरणा होती. त्यामुळे विहिरी आणि पाणपोया हे केवळ बांधकाम नव्हते, तर त्या जनतेच्या जगण्याशी जोडलेल्या सुविधांचे सजीव प्रतीक होते.

https://socialstudiesfoundation.org/wp-content/uploads/2024/05/UV-14th-MAY.pdf

अहिल्यादेवी होळकर यांच्या बांधकाम कार्याचा आढावा घेतल्यास हे स्पष्ट होते की, त्या केवळ एका राज्याच्या किंवा काळाच्या सीमा ओलांडून संपूर्ण भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाची वाहक ठरल्या. मंदिरे, घाट, धर्मशाळा, विहिरी, पाणपोया, रस्ते, पूल यांसारखी त्यांनी उभारलेली बांधकामे ही केवळ श्रद्धेची किंवा धर्मनिष्ठेची प्रतीके नव्हती, तर त्या होत्या जनतेच्या जीवनमानात परिवर्तन घडवून आणणाऱ्या स्थायीगुणात्मक रचनात्मक कृती. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे लोकहिताची भावना, सामाजिक समरसतेची जाणीव आणि भविष्याचा विचार होता. त्यांनी उभ्या केलेल्या वास्तु या आजही केवळ पुरातत्वीय वारसा म्हणून नव्हे, तर लोकसेवेचे जीवंत स्मारक म्हणून उभ्या आहेत. त्यांच्या कार्यातून “धर्म ही सेवा असावी” ही भारतीय परंपरेतील उदात्त कल्पना वास्तवात उतरलेली दिसते. त्या  एक दूरदृष्टी असलेल्या प्रशासक, समर्पित समाजसेविका, राष्ट्रभाव जपणाऱ्या लोकमाता आहेत. 

आजच्या काळातही प्रशासन, लोकसेवा आणि सार्वजनिक रचना या क्षेत्रात अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी आदर्श ठरते.त्यांच्या कार्याचा आदर्श ठेऊन भारताला आजही एक आदर्श आणि समतोल समाज घडवण्याची प्रेरणा मिळू शकते. धर्मरक्षण आणि धर्मसंवर्धन हीच त्यांच्या कामाची खरी पावती आहे.  

अन्य लेख

संबंधित लेख