Friday, November 21, 2025

महाराष्ट्रभर ‘भाजपचा फीव्हर’! दोंडाईचा नगरपरिषद १००% बिनविरोध; राज्यात ‘बिनविरोध हॅट्रिक’चा विक्रम!

Share

धुळे : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषदेमध्ये भाजपने इतिहास रचला आहे. राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असतानाच, दोंडाईचा नगरपरिषदेनं त्याहून मोठी कामगिरी केली आहे. या संपूर्ण नगरपरिषदेत नगराध्यक्षांसह सर्व 26 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यातील संपूर्ण बिनविरोध ठरणारी ही पहिलीच नगरपरिषद ठरली आहे.

ही निवडणूक राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. दोंडाईचा नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर यंदाच पहिल्यांदा निवडणूक होणार होती, परंतु महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने सर्व जागा भाजपच्या नावावर गेल्या. नगराध्यक्षपदी देखील जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवर रावल या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

या निवडणुकीत एक महत्त्वाचा वादही निर्माण झाला. नगराध्यक्ष पदासाठी नयन कुवर रावल यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या शरयू भावसार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र भाजपकडून त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवण्यात आला. भाजपने मांडलेल्या कारणानुसार, शरयू भावसार यांच्या वडिलांची, अ‍ॅड. एकनाथ भावसार, घरपट्टीची थकबाकी असल्यामुळे त्यांचा अर्ज नियमांनुसार अपात्र ठरतो, असा दावा करण्यात आला. हा आक्षेप मान्य करत निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जाला बाद ठरवले. यामुळे असमाधानी झालेल्या शरयू भावसार यांच्या कुटुंबीयांनी धुळे जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले आहे. पुढील काही दिवसांत या अपीलवर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

राज्यात भाजपचे बिनविरोध ‘त्रिकुट’

नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या मतदानाआधीच भाजपचे तीन नगराध्यक्ष/अध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत, ज्यामुळे राज्यात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे:

दोंडाईचा (धुळे): जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवर रावल (बिनविरोध).

जामनेर (जळगाव): मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन (बिनविरोध).

अनगर (सोलापूर): भाजप नेते राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता पाटील (बिनविरोध).

या ऐतिहासिक विजयाबद्दल भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा केला जात आहे.

निवडणुकीचे राजकीय परिणाम

दोंडाईचा नगरपरिषद पूर्णपणे भाजपच्या ताब्यात गेल्याने महायुतीला स्थानिक स्तरावर मोठा फायदा झाल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आणि प्रमुख उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भाजपला बिनविरोध सत्ता मिळाली. ही निवडणूक राज्यातील इतर नगरपरिषदांसाठीही राजकीय दिशादर्शक ठरू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख