Tuesday, December 3, 2024

बाबू जगजीवन राम : सामाजिक न्यायासाठी झटलेला नेता

Share

५ एप्रिल ही बाबू जगजीवन राम यांची जयंती. बाबूजींचे अनेक गुण आणि त्यांची कामगिरी समाजापुढे आली नाही. विशेषतः त्यांच्या सामाजिक विचारांकडे काहीसे दुर्लक्षच झाले. बाबूजींच्या जयंती दिनाच्या निमित्ताने त्यांचे सामाजिक चिंतन सांगणारा हा लेख.

१९ आणि २० व्या शतकाने प्रथम सामाजिक स्वातंत्र्य का राजकीय स्वातंत्र्य या वादाची अनुभूती घेतली. तटस्थ भूमिकेतून पाहिले, तर हे दोन्ही मतप्रवाह उदार आणि सर्वसमावेशक हिंदू समाजाची मानसिकता दर्शविणारे आहेत. किंबहुना याच अंगभूत गुणांमुळे हिंदू समाजाला सनातन मानले गेले. नित्यनूतन आणि चिरंतन हिंदू समाज आजही याच वैशिष्ट्यांमुळे अनेक आक्रमणांशी सामना करीत गौरवाने उभा आहे.

आधी सामाजिक का राजकीय या वादात संतुलनाची भूमिका पार पाडणारे थोर नेते म्हणजे बाबू जगजीवन राम ! त्या अर्थाने बाबूजी भारतीय मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतात. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होतानाच बाबूजींनी राजकीय कार्य तर केलेच परंतु राजकीय काम करताना सामाजिक समस्यांकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. राजकीय सत्तेचा वापर त्यांनी उपेक्षित समाजासाठी करून त्यांच्यासाठी सामाजिक स्वातंत्र्याचे दरवाजे उघडे केले. त्यांच्या या गुणामुळेच अखिल भारतात त्यांना ‘बाबूजी’ म्हणून आदराने संबोधले जाते.

बाबूजींची बुद्धिमत्ता बघूनच बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांनी त्यांना विशेष निमंत्रण देऊन सन्मानाने बोलावून घेतले. बिहारमधील एका मागास विद्यार्थ्यासाठी हा मोठा सन्मान होता. दुर्दैवाने बाबूजींना जातीभेदांवर आधारित काही कटू अनुभव आले. या अनुभवांमुळे व्यथित होऊन बाबूजी कोलकाता येथे शिक्षणासाठी गेले. याच कालावधीत त्यांचा काँग्रेसशी संबंध आला आणि थोड्याच कालावधीत त्यांनी स्वतःचे सामाजिक आणि राजकीय स्थान बळकट केले.

मते प्रकट करण्याचे धैर्य
या कालावधीत महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये झालेल्या पुणे करारामुळे काॅंग्रेसलासुद्धा उपेक्षित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याची गरज होती. ही पोकळी बाबूजींनी भरून काढली आणि काॅंग्रेससचा सामाजिक पाया विस्तृत करण्यास मदत झाली. त्यांनी केलेल्या कामाचा काँग्रेससला भरपूर राजकीय फायदा झाला. उपेक्षित समाज मुख्य प्रवाहाच्या बाहेर जाणार नाही, हा त्यांच्या धोरणाचा कायम केंद्रबिंदू होता. परिणामी, त्यांच्यावर टीका होऊनसुद्धा बाबूजी त्यांच्या भूमिकेवर सदैव ठाम राहिले. `फोडा आणि राज्य करा’ या धोरणाला बाबूजींचा कायम विरोध होता. यासाठी त्यांनी काॅंग्रेस नेत्यांशी सामना करण्यास मागेपुढे बघितले नाही. आपली मते प्रकट करण्यास ते कधीही कचरले नाहीत.

केंद्रीय मंत्री म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी
सर्वाधिक काळ केंद्रीय मंत्री राहिलेला नेता म्हणून बाबूजींचा उल्लेख केला जातो. १९४७ पासून १९८० पर्यंत ते केंद्रीय मंत्री होते. त्यांनी कामगार, रेल्वे, संरक्षण, शेती आणि दूरसंचार अशी विविध खाती समर्थपणे सांभाळली. उपेक्षित समाजाला न्याय देण्याची त्यांनी कायम भूमिका घेतली. भविष्य निर्वाह निधीचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्यांनी कामगार मंत्रिपदाच्या काळात घेतला. बाबूजी शेतीमंत्री असताना देशामध्ये हरितक्रांती झाली. आरक्षणाबाबत अनेक निर्णयांमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी होती. दुर्दैवाने भारतीय समाज आज त्यांचे महत्त्वाचे योगदान विसरून गेला आहे. पाकविरुद्धच्या लढाईत आणि बांगला देश निर्मिती काळात बाबूजी संरक्षण मंत्री होते. मात्र राजकीय कारणांमुळे त्यांना या कामगिरीसाठी योग्य ती मान्यता मिळाली नाही. ‘आम्हाला युद्ध नको, परंतु ते झालेच तर पाकच्या भूमीवर लढले जाईल”, हे त्यांचे उद्गार देशभक्त आणि धोरणकर्ता याची प्रचिती देतात.

लोकशाहीशी त्यांची बांधिलकी आणीबाणीनंतर दिसून आली. बाबूजींनी आणीबाणीला विरोध करून लोकशाही रक्षणासाठी मोलाची कामगिरी केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संभाव्य कोपाची तमा न बाळगता त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना करून आणीबाणीविरोधाच्या लढ्याला धार दिली.

बाबूजींनी दलित-मुस्लिम युतीला कायम विरोध केला. ब्रिटीश काळापासून त्यांनी या धोरणाचा पाठपुरावा केला. उपेक्षित समाज मुख्य प्रवाहामध्येच रहावा, यासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. बाबूजींवर संत रविदासांचा प्रभाव होता. त्यांनी संत रविदास यांच्या विचारांच्या प्रसारासाठी युवाकाळापसून कार्य केले. आणखी एका घटनेचा उल्लेख येथे करायला हवा. भारत पाकिस्तान युद्ध झाले आणि बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यामुळे भारताच्या इतिहासात संरक्षणमंत्री म्हणून बाबू जगजीवन राम यांची ही कामगिरी नोंदवली गेली. बाबू जगजीवन राम यांच्या या कामाची दखल म्हणून बांगलादेशाने त्यांचा गौरव केला होता.

१९६४ साली विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. कोणत्याही परिणामांची भीती न बाळगता विश्व हिंदू परिषदेच्या प्रथम अधिवेशनाला बाबूजींनी शुभेच्छा पाठविल्या होत्या आणि परिषदेच्या कामाविषयी आस्था प्रकट केली होती.

सत्यजित जोशी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख