Saturday, July 27, 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर: सांस्कृतिक राष्ट्रवादाचे मूर्तिमंत प्रतीक

Share

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भारतीय ऐक्याचे अद्भुत उदाहरण आहे. अहिल्यादेवी यांनी भारताचे धार्मिक भावविश्व केवळ टिकवलेच नाही तर ते बळकट केले. अहिल्यादेवी यांचे जीवनकार्य म्हणजे पाश्चात्य विचारांनी प्रेरित झालेल्या आणि भारताला कायम क्षुद्र समजणाऱ्या बुद्धिवंताना सणसणीत चपराक आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या नावामागे `पुण्यश्लोक’ अशी उपाधी लावली जाते. ‘पुण्यश्लोक’ या विशेषनामाचे उच्चारण करताच फक्त आणि फक्त अहिल्यादेवींचेच स्मरण होते. या नावात सात्विकता, आध्यात्मिकता, मंगल आणि पवित्र्याचा भाव आहे. अहिल्यादेवींचे सारे आयुष्य उच्च धर्मिक आणि आध्यात्मिक मूल्यांनी प्रेरित झाले होते. अहिल्यादेवी यांचा कार्यकाल, तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली तर, भारताला त्यांनी दिलेले योगदान अभूतपूर्व, अविस्मरणीय आणि तितकेच अविश्वसनीय आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णय आणि कृतीमधून हिंदू धर्मावरील अढळ निष्ठा दिसून येते. त्या एक धर्मरक्षक शासक तर होत्याच परंतु त्यांनी समाजसुधारणेला अनन्यसाधारण महत्त्व दिले. त्यांचे व्यक्तिगत जीवन समाजसुधारणेच्या मूल्यांनी प्रेरित झाले होते, याचे अनेक दाखले मिळतात.

अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन म्हणजे, भारतातील समाजसुधारणेचे श्रेय इंग्लिश शिक्षण आणि पाश्चात्य विचारांना देणाऱ्या तथाकथित ‘elite’ वर्गाला एक सणसणीत चपराक आहे. कदाचित म्हणूनच अहिल्यादेवी यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. सत्ताधारी काॅंग्रेसच्या आश्रयाने जगलेल्या इतिहासकारांनी अहिल्यादेवी यांचे जीवन जाणीवपूर्वक लपवून ठेवले. या इतिहासकारांचा हेतू अभ्यासापेक्षा विशिष्ट राजकीय विचार प्रसारित करण्याचाच होता. केवळ अहिल्यादेवीच नव्हे तर संपूर्ण भारताचाच इतिहास एका विशिष्ट पद्धतीने जगासमोर मांडण्याचा त्यांचा हेतू होता. मात्र गेल्या काही वर्षात ही अवस्था बदलली आहे. अनेक अभ्यासक खरा इतिहास मांडण्यासाठी पुढे येत आहेत आणि तथाकथित इतिहासकारांची विश्वासार्हता लयास गेली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माळवा प्रांताच्या (सध्याचा मध्य प्रदेश) शासक होत्या. मात्र त्यांची दृष्टी संपूर्ण भारताला कवेत घेणारी होती. अहिल्यादेवी या भारतीय ऐक्याच्या प्रतीक होत्या आणि आहेत. अहिल्यादेवी यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणे भारतभर पसरलेली आहेत. ही ठिकाणे प्रामुख्याने धार्मिक स्वरूपाची आहेत. अहिल्यादेवी यांचे जीवन म्हणजे भारतातील संस्कृतिक आणि धार्मिक ऐक्याचा फार मोठा वस्तुपाठ आहे. माळवा प्रांताच्या शासक महिलेला भारतातील अन्य ठिकाणांचा विचार का करावासा वाटतो, याचा विचार पाश्चात्य विचारांनी प्रेरित विद्वानांनी करणे अपेक्षित आहे. अहिल्यादेवी यांनी आपल्या कार्याने सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या वास्तवाला मजबुती दिली. वस्तुतः, अहिल्यादेवी यांना ही प्रेरणा सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या सनातन सत्यामधूनच मिळाली. अहिल्यादेवी यांच्या जीवनकार्यामुळे भारताचे भावनिक विश्व बळकट झाले आणि अहिल्यादेवी यांच्यामुळे त्याला नवीन ऊर्जा प्राप्त झाली.

आपल्याला लहानपणापासून शिकवण्यात येते की, भारतीय समाज पुरुषप्रधान आहे. आम्ही हे सदोदित ऐकत आलो की, भारतात राजा किंवा शासक एका विशिष्ट जातीचाच असायला पाहिजे. वर्षानुवर्षे आम्हाला सांगण्यात आले की, भारतीय राजे आणि शासक केवळ ऐश करण्यासाठी जन्माला आले होते. पाश्चात्य विचारांनी प्रेरित झालेल्या लोकांनी कायम ठसविण्याचा प्रयत्न केला की, भारत हे कधीही एक राष्ट्र नव्हते आणि तो एक भूभाग होता. हीच मंडळी सतत सांगत राहिली की, १८५७ चे स्वातंत्र्य समर हे केवळ एक बंड होते. समाजहिताची कोणतीही दृष्टी भारतीय शासकांकडे नव्हती, असे आम्हाला शिकविण्यात आले.

तथापि, अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य या खोट्या इतिहासाला जबरदस्त छेद देणारे आहे. अहिल्यादेवी यांच्याबाबत भरपूर पुरावे सुदैवाने आजही उपलब्ध आहेत. त्यावर साधी नजर टाकली तरी लक्षात येते की, अहिल्यादेवी या उत्कृष्ट शासक, प्रशासक, अर्थतज्ज्ञ, समाज सुधारक, लष्करी नेत्या आणि राजनीतिज्ञ होत्या. पाश्चात्य विचारांप्रमाणे, जर्मनीच्या बिसमार्कला (१९ वे शतक) कल्याणकारी राज्याचा जनक मानले जाते. तथापि त्याआधी फार पूर्वी अहिल्यादेवी यांनी कल्याणकारी राज्याची पायाभरणी केली होती. स्त्रियांच्या सन्मानापासून जनजातीच्या सन्मानापर्यंत सर्व बाबींचा यामधे समावेश होतो. त्यांनी घेतलेले सर्वसमावेशक आणि कल्याणकारी निर्णय अभ्यासले तर अहिल्यादेवी होळकर यांचे राज्य म्हणजे welfare state चे आदर्श मॉडेल मानावे लागेल. अहिल्यादेवी यांनी मानवी जीवनाच्या सर्व पैलुंबाबत निर्णय घेतलेले दिसून येतात. यामध्ये शेती, जलसंधारण, महसूल पासून मंदिर निर्मिती आणि त्याचे व्यवस्थापन यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे अहिल्यादेवी यांचे भारतातील अन्य शासकांशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते. हे सर्व एक महिला करत होती, हे सदैव ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

आध्यात्मिकता आणि धार्मिकता हा अहिल्यादेवी यांचा स्थायीभाव होता. त्या भगवान शंकरांच्या निस्सीम भक्त होत्या. किंबहुना शिवभक्त ही त्यांची फार मोठी ओळख आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणा अस्सल भारतीय आणि याच मातीमधे जन्माला आल्या होत्या. अहिल्यादेवी यांचा जन्म जणू काही छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य पुढे नेण्यासाठीच झाला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी `राजा हा राज्याचा उपभोगशून्य स्वामी असतो’ या भारतीय विचार परंपरेच्या सर्व अर्थाने पाईक होत्या.

सत्यजित जोशी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

अन्य लेख

संबंधित लेख