बारामती : “अजितदादा अमर रहे…”, “परत या दादा…” अशा हृदयस्पर्शी घोषणा आणि साश्रू नयनांनी आज महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. काल (२८ जानेवारी) बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले होते. आज, २९ जानेवारी रोजी बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी बारामतीत हजेरी लावली होती. यामध्ये, अजित पवार यांचे काका आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्रातील लाखोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
याशिवाय सुप्रिया सुळे, पार्थ पवार, जय पवार आणि मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांनी जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या नेत्याला निरोप दिला.
बारामतीत जनसागराचा महापूर
अजितदादांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि सामान्य नागरिकांचा बारामतीत जणू महापूर आला होता. सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून सुरू झालेली अंत्ययात्रा अलोट गर्दीमुळे संथ गतीने पुढे सरकत होती. मैदानावर पार्थिव आणल्यानंतर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली.
राज्यात ३ दिवसांचा दुखवटा
अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात २८ ते ३० जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज बारामतीसह अनेक शहरांतील बाजारपेठा आणि व्यवहार कडकडीत बंद ठेवून नागरिकांनी आपल्या लोकनेत्याला श्रद्धांजली वाहिली.
प्रशासकीय शिस्त, वेळेचे नियोजन आणि विकासाचा ध्यास घेणारा एक कार्यक्षम ‘लोकनेता’ आज अनंतात विलीन झाला आहे.