नवी दिल्ली : “जे प्रत्यक्ष घाम गाळून काम करतात, त्यांनाच नफ्यात वाटा मिळाला पाहिजे. ‘भारत टॅक्सी’च्या माध्यमातून आम्ही टॅक्सी चालकांना म्हणजेच ‘सारथीं’नाच या संस्थेचे मालक बनवत आहोत,” असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. नवी दिल्ली येथे भारत टॅक्सीच्या चालकांशी (सारथी) संवाद साधताना ते बोलत होते.
सारथीच होणार टॅक्सीचे मालक
अमित शाह म्हणाले की, देशातील पाच प्रमुख सहकारी संस्थांना एकत्र करून भारत टॅक्सीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, ‘सारथीं’ची संख्या जसजशी वाढेल , भागीदार बनू इच्छिणाऱ्या कोणत्याही ‘सारथी’ला ₹500 किमतीचे शेअर्स खरेदी करून मालकी हक्क मिळवता येतील. शाह पुढे म्हणाले की, जेव्हा भारत टॅक्सीच्या संचालक मंडळाच्या निवडणुका होतील तेव्हा काही जागा सारथींसाठी राखीव ठेवल्या जातील. एकदा का, सारथी हे संचालक मंडळाचा भाग झाले की, ते स्वतः इतर चालकांचे हित आणि चिंता यांचे रक्षण करतील आणि त्यांचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिला सुरक्षेसाठी ‘सारथी दीदी’ उपक्रम
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, भारत टॅक्सीमध्ये ‘सारथी दीदी’ (महिला चालक) ही संकल्पना मांडण्यात आली आहे. भारत टॅक्सीची ‘सारथी दीदी’ सुविधा महिला सारथींना स्वावलंबी बनवेल आणि महिला प्रवाशांची आणि सारथींची सुरक्षितता सुनिश्चित करेल. ते म्हणाले की, येत्या काळात भारत टॅक्सी ॲपमध्ये ‘सारथी दीदी’ या नावाने एक तरतूद केली जाईल जेणेकरून जेव्हा जेव्हा एकटी महिला प्रवासी असेल तेव्हा तिच्यासाठी स्वाभाविकपणे ‘सारथी दीदी’ ला प्राधान्य दिले जाईल.
सहकार मंत्र्यांनी जाहीर केले की, येत्या तीन वर्षांत भारतातील प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात ‘भारत टॅक्सी’ची सेवा उपलब्ध करून दिली जाईल. खासगी ॲप-आधारित कंपन्यांच्या नफेखोरीला छेद देऊन चालकांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.