शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्त्राएलने क्षेपणास्त्रांचा अचूक आणि लक्ष्यभेदी (targeted) मारा करून इराणचे सर्वेसर्वा आणि जगभरातील बारा इमामी शियापंथीय मुसलमानांचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला अली खामेनेई यांना सद्गतीचा मार्ग मोकळा करून दिला.
अराजकाचा वणवा…

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, १ मार्च २०२६ पासून जगभरात बाराइमामी शियापंथीय मुसलमानांनी निदर्शने सुरू केली. विशेषतः अमेरिकन दूतावासांच्या बाहेर उग्र निदर्शने करण्यात आली. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये सर्वात मोठे आणि हिंसक आंदोलन कराची इथे झाले. आंदोलकांनी अमेरिकन वाणिज्य दूतावासावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, भिंती ओलांडल्या आणि तोडफोड केली. या संघर्षात सुमारे १५/१६ आंदोलकांचा मृत्यू झाला.
गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्कार्दू या शहरात हजारो लोक रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) लष्करी निरीक्षक गटाच्या कार्यालयाला आग लावली. या निदर्शनांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गिलगिट-बाल्टिस्तान सारख्या संवेदनशील भागात तीन दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. येथे झालेल्या हिंसाचारात किमान १२/१३ आंदोलकांचा मृत्यू झाला.
राजधानी इस्लामाबादमध्ये आंदोलकांनी अमेरिकन दूतावासाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेसाठी पोलिसांनी ‘रेड झोन’ कडे जाणारे रस्ते कंटेनर लावून बंद केले होते. येथे झालेल्या चकमकीत किमान २ ते ३ आंदोलक मारले गेले. लाहोर येथेही शेकडो आंदोलक अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर जमा झाले होते. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तसेच पेशावर, हैदराबाद, मुल्तान आणि फैसालाबाद या शहरांमध्येही निदर्शने आणि शोकसभा आयोजित करण्यात आल्या होत्या. देशभरातील या हिंसाचारात किमान २५ जणांचा बळी गेल्याची नोंद झाली आहे. थोडक्यात म्हणजे, काही काळ इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये अराजक सदृश्य परिस्थिती होती.
वास्तविक इस्लामचा अर्थ “शांती” म्हणून सांगितला जातो आणि रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक देशात जनतेला शांततापूर्ण निदर्शने करण्याची पूर्ण मुभा असते. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान या देशाच्या नावातच इस्लामची शांती आहे व रिपब्लिकची शांततापूर्ण निदर्शने करण्याची व्यवस्था आहे.
पण जगाचा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की “शांतीदूतां”ची निदर्शने म्हणजे फक्त तोडफोड जाळपोळ रक्तपात आणि हिंसा वास्तविक शियापंथीयांनी मोर्चे बंद रास्ता रोको शोकसभा अशा शांततामय मार्गाने निदर्शने करण्यास काहीच हरकत नव्हती. त्यांनी तसा प्रयत्न केलाही असावा पण हजारोंचा जमाव जमला आणि बहुदा त्यांना अचानक आठवले असावे. अरेच्चा, आपण तर मुसलमान आहोत आणि मग पुढचा सगळा अनर्थ ओढवला.
रोगापेक्षा औषध भयंकर…

यानंतर गुरुवार, १९ मार्च रोजी राजधानी रावळपिंडी येथे शिया समुदायाच्या एका इफ्तार पार्टीत इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे तहहयात स्वयंघोषित लष्करप्रमुख “फेल्ड मार्शल” आसिम मुनीर यांनी आपण देशाचे लष्कर प्रमुख असताना बाराइमामी शिया मुसलमानांनी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला वेठीला धरले यामुळे जनरल आसिम मुनीर यांच्या मनात संतापाचा अक्षरशः ज्वालामुखी उकळत होता. (बहुदा आपल्या दूतावासांवरील हल्ल्यावरून अमेरिकेने जनरल आसीम मुनीर यांना एनीमा दिला असावा) आणि इफ्तार पार्टीत पोचल्यावर त्यांच्या ज्वालामुखीचा स्फोट झाला. शिया धर्मगुरूंना काहीही बोलण्याची किंवा त्यांची मते व्यक्त करण्याची संधी न देता त्यांनी जवळपास एक तास सतत भाषण केले.
“मी कोणालाही दुसऱ्या देशासाठी असलेल्या त्यांच्या निष्ठेमुळे पाकिस्तानात अशांतता पसरवण्याची परवानगी देणार नाही. दुसऱ्या देशातील घटनांच्या आधारावर पाकिस्तानात हिंसाचार सहन केला जाणार नाही. ज्यांना इराणवर इतके प्रेम आहे, त्यांनी तिथे निघून जावे.” असे उकळते शिसे जनरल आसिम मुनीर यांनी उपस्थित शिया धर्मगुरूंच्या कानात ओतले. इफ्तारीतील तोंडातले खजूर बियांसकट शिया इमामांच्या घशात अडकले.
बैठकीनंतर उलेमांना सांगण्यात आले होते की, रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा चर्चा होईल. पण जनरल आसिम मुनीर मध्येच अचानक कार्यक्रम सोडून निघून गेले. एकंदरीत जनरल आसिम मुनीर यांचे औषध रोगापेक्षा भयंकर व विषारी होते.
शिया सुन्नी १४०० वर्षे जुने वैर…

जनरल आसिम मुनीर यांची कडक धमकी देशभक्तीवर घेतलेली शंका, रुक्ष वागणूक आणि बैठक मध्येच सोडून दिलेला अपमान यामुळे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील शिया धर्मगुरू प्रचंड पिसाळले आहेत. शिया धर्मगुरू मोहम्मद शिफा नजफी यांनी सांगितले की, त्यांनी तिथेच जनरल आसीम मुनीर यांच्या बोलण्याला विरोध केला. “सर्व शियांना या घटनांसाठी जबाबदार धरणे योग्य नाही. सर्वांना एकाच दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये.” असे त्यांनी जनरल आसिम मुनीर यांना सुनावले म्हणे.
मोहम्मद शिफा नजफी यांच्या म्हणण्यानुसार इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सैन्यातही शिया सैनिक आणि लष्करी अधिकारी आहेत. (८ लाख सैन्यापैकी सैनिक आणि लष्करी अधिकारी मिळून ३ लाख शिया आहेत असाही त्यांनी हिशोब मांडल्याचे सांगितले जाते.) आणि देशाचे संस्थापक कायदे आजम मोहम्मद अली जिन्ना हे देखील शिया होते. (पण बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना हे शिया पंथीयातील इस्माईल खोजा संप्रदायाचे होते. त्यांच्याशी तुमचा काय संबंध..? असे जनरल आसिम मुनीर यांनी विचारले असते तर बाराइमामी शिया संप्रदायाचे सदर इमाम मोहम्मद शिफा नजफी यांची बोलती बंद झाली असती.)
मोहम्मद शिफा नजफी यांच्या मते जेव्हा त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा मुनीर यांच्या वृत्तीत थोडा बदल झाला. पण तरीही “जर तुम्हाला इराणवर इतके प्रेम असेल, तर तिथे निघून जा, दरवाजे खुले आहेत.” असे त्यांनी सुनावलेच. शिया समुदायाच्या धर्मगुरूंचे म्हणणे आहे की, त्यांची निष्ठा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आणि इस्लाम या दोघांप्रती आहे. मक्का, मदिना, इराक आणि इराणसारख्या धार्मिक स्थळांशी त्यांचे नाते त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्यांची देशभक्ती कमी आहे. धार्मिक संबंधांना देशभक्तीशी जोडून पाहणे चुकीचे आहे. (हे शहाणपण त्यांना भारतात का सुचत नाही हे कोडेच आहे.) या शिया धर्मगुरूंचा सगळ्यात मोठा आक्षेप अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात झालेल्या निदर्शनांसाठी शिया समुदायाला जबाबदार धरण्याला आहे.
जनरल आसिम मुनीर यांनी गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये झालेल्या अशांततेला थेट शिया नेतृत्वाशी जोडले आणि संपूर्ण समुदायाला जबाबदार धरले. याबद्दल या शिया धर्मगुरूंची तीव्र नाराजी आहे. जनरल आसिम मुनीर यांनी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील समस्त शिया पंथीयांची माफी मागावी अशी त्यांची एकमुखी मागणी आहे.
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या शिया (जाफरिया) समुदायाच्या नेत्याने आसिम मुनीर यांच्या विधानांना प्रत्युत्तर देताना त्यांना इशारा दिला आहे की “या देशाच्या पाठीशी खरोखर कोण उभे आहे, हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ.” तर, एका अन्य शिया विद्वानाने मुनीर यांनाच इस्रायलला जाण्यास सांगितले आहे.
नावडतीचे मीठ अळणी…

२०२३ च्या जनगणनेच्या निकालानुसार इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची एकूण लोकसंख्या सुमारे २४.१५ कोटी आहे. विशेष म्हणजे शिया मुस्लिमांची निश्चित जनगणना अधिकृतपणे स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जात नाही. मात्र विविध तज्ज्ञ आणि संस्थांच्या अंदाजानुसार शिया समुदाय इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे १५% ते २०% इतका आहे. म्हणजे संख्यात्मकदृष्ट्या पाहिल्यास, ही लोकसंख्या साधारणपणे ३.५ कोटी ते ४.८ कोटी दरम्यान असू शकते.
इराणनंतर जगात शिया मुस्लिमांची दुसरी सर्वात मोठी लोकसंख्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात असल्याचे मानले जाते. म्हणजे शिया हा तिथला नगण्य किंवा दुर्लक्ष करण्याजोगा जनसमुदाय निश्चितच नाही. शिया समुदायामध्ये ‘हजारा’ हा एक महत्त्वाचा वांशिक गट असून त्यांची संख्या प्रामुख्याने क्वेटा आणि बलुचिस्तान भागात ५ लाखांहून अधिक आहे. पण तरीही सुन्नी बहुल इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये शियापंथीयांची स्थिती नावडतीचे मीठ अळणी अशीच आहे.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे संस्थापक बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना केवळ हेच शियापंथीय होते असे नाही तर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती इस्कंदर मिर्जा, माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो आणि त्यांची कन्या बेनझीर भुट्टो, बेनझीर भुट्टो यांचे पती व सध्याचे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी हे देखील शिया आहेत. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे झहीर अब्बास मोहसीन खान शादाब खान हे सगळे क्रिकेटपटू शिया पंथीय आहेत. जगप्रसिद्ध कव्वाल आणि गायक, ज्यांनी सुफी संगीताला जागतिक ओळख मिळवून दिली ते नसरत फतेह अली खान हे देखील शिया पंथीयच.
इतिहासात पहिल्यांदा धर्माच्या आधारावर आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन करत असताना इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची निर्मिती करत असताना हिंदुस्थानातला शिया आणि सुन्नी मुसलमान खांद्याला खांदा लावून “काफीरां” विरुद्ध जिहाद करत होता. हे स्वतः मोहाजीर असलेले जनरल आसीम मुनीर कसे काय विसरू शकतात?
गृहयुद्धाचे बीजारोपण…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे लष्कर प्रमुख स्वयंघोषित फेल्ड मार्शल आसिम मुनीर हे सुन्नी मुस्लिम असून त्यांना धार्मिक बाबतीत अत्यंत कर्मठ (Conservative) मानले जाते. मूळचे भारतातील जालंधर (पंजाब) येथील मुनीर कुटुंब १९४७ च्या फाळणीनंतर रावीपार पंजाबात हिजरत करून (मोहाजीर) गेले होते. अर्थात स्वतः अशी मुनीर हे जरी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या निर्मितीनंतर १९६८ रावळपिंडीला जन्माला आलेले असले तरीही इथे त्यांची ओळख “मोहाजीर” अशीच आहे. मुनीर यांचे कुटुंब स्थानिक पातळीवर ‘हाफिज कुटुंब’ म्हणून ओळखले जाते. कारण त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी कुराण कंठस्थ केले आहे. त्यांचे वडील सय्यद सरवर मुनीर शाळेत मुख्याध्यापक तसेच एका मशिदीत इमाम देखील होते.
स्वतः जनरल आसीम मुनीर यांनी सौदी अरेबियामध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून तैनात असताना कुराण मुखोद्गत केले होते. कुराण मुखोद्गत असल्यामुळे आणि त्यांच्या धार्मिक दृष्टिकोनामुळे त्यांना अनेकदा ‘हाफिज-ए-कुराण आर्मी चीफ’ किंवा ‘मौलाना जनरल’ असेही संबोधले जाते. यावरून त्यांच्या सुन्नी इस्लामिक धार्मिक कट्टरतेची कल्पना यावी. आता सगळ्यात मोठी मजा म्हणजे त्यांचे नाव असलेला “आसिम” (عاصم) या अरेबिक शब्दाचा अर्थ “रक्षणकर्ता किंवा आश्रयदाता” असा आहे. आणि तसेही सर्वोच्च लष्करी अधिकारी म्हणून जनरल आसिम मुनीर हे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे रक्षणकर्ता किंवा आश्रयदाता देखील आहेत. आणि देशाच्या त्याच रक्षणकर्त्याने आपल्याच देशाच्या १५% लोकसंख्येच्या देशभक्तीवर शंका घेऊन सरसकट सगळ्या जवळपास ४/४.५ कोटी शिया पंथीयांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून “इराणला जा” म्हणून सांगणे म्हणजे अराजकाला निमंत्रण देणेच होय. He has invited the insurgency. एका अर्थी जनरल आसीम मुनीर यांनी आपल्या सुन्नी इस्लामच्या कट्टरतेपायी इस्लाममधील १,४०० वर्षे जुन्या शिया सुन्नी वैरावरची खपली काढण्याचे धाडस केले आहे.
यापेक्षा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील सगळ्या या समुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यापेक्षा त्यांनी केवळ इराणच्या बाराइमामी (जाफरी) संप्रदायाच्या समर्थकांना “इराणला जा” असा सल्ला दिला असता तर शिया पंथीयांमधील इस्माईल खोजे, दाऊदी बोहरे, झैदी हे सांप्रदायिक नाराज होण्याचे काहीच कारण नव्हते. कारण तसेही अयातुल्ला अली खामेनेई त्यांचे धर्मगुरू नव्हतेच. ना हे सांप्रदायिक त्या हिंसक निदर्शनांमध्ये सहभागी होते.
शिवाय इराण समर्थक बाराइमामी शियांना एकटे पाडून त्यांना व्यवस्थित जमालगोटा देता आला असता पण आपल्या सुन्नी धार्मिक कट्टरतेपायी जनरल आसिम मुनीर यांनी सगळ्याच शियापंथीयांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये गृहयुद्धाची बीजे रोवली आहेत. एका लष्कर प्रमुखाला एवढी साधी व्युहरचना कळू नये यातच त्यांची सुन्नी धार्मिक कट्टरता किती विलक्षण आहे याची प्रचिती येते.(आणि म्हणे हे काश्मिर घेण्यासाठी भारताशी लढणार)
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची निर्मिती करताना “हिंदू काफिरां”ना नृशंस नरसंहार करून निपटून काढल्यावर आता काफीरांची व्याख्या विस्तृत करून त्यात “शिया मुसलमानां”चा देखील समावेश करण्याचे पुण्यकार्य (फजीलत فضیلت) जनरल आसिम मुनीर यांनी हाती घेतलेले दिसते.
मात्र जनरल आसिम मुनीर एक गोष्ट साफ विसरले आहेत जिहादमध्ये स्वतःच्या शरीरावर स्फोटके लावून आत्मघातकी अर्थात ‘फिदायीन’ हल्ले करण्याच्या तंत्राचे विलक्षण आकर्षण कर्बला युद्धातील इमाम हुसैन यांच्या बलिदानामुळे शिया पंथीयांमध्ये सर्वाधिक आहे.
त्यामुळे आपल्या देशातील शिया पंथीयांचा रोष जनरल आसीम मुनीर यांना परवडणारा नाही. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील ४/४.५ कोटी शिया पंथीयांनी खरोखर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी “ऑपरेशन तंदूर” सुरू केले तर जनरल आसिम मुनीरना ते आवरता येणार नाही.
म्हणून गृहयुद्ध सुरू होण्यापूर्वी त्यांनी शिया संप्रदायाची माफी मागावी हेच श्रेयस्कर सॉरी बोल दे आसिम मुनीर.
लांडोराचा पिसारा…

एरव्ही जगाला ज्ञात नसलेले कोणतेही युद्ध न जिंकता छातीवर डझनावारी पदके लटकवणाऱ्या फेल्ड मार्शल आसिम मुनीर यांना “शियांना वठणीवर आणले” म्हणून आणखी एक पदक लटकवून छातीवरचा लांडोराचा पिसारा अजून फुलवता येईल.