Tuesday, September 17, 2024

नांदेड पुरस्थितीवर अशोक चव्हाणांनी घेतला आढावा

Share

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील अतिवृष्टी व निर्माण झालेल्या पुराच्या परिस्थितीबाबत भाजपा नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतली आहे. आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला व नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले. सायंकाळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन शहरातील पुराच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, महसूल विभाग, विद्युत विभाग आदींनी समन्वय राखून काम करण्याच्या सूचना दिल्या. गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर असल्याने नदीकाठच्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांचा निवारा व भोजनाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. सोमवारी रात्री देखील मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने गस्त घालून परिस्थितीवर नजर ठेवावी असेही निर्देश दिले. नांदेड जिल्ह्यातील नदी-नाल्यांचा जलस्तर कमी करण्यासाठी तेलंगणातील पोचमपाड सारख्या प्रकल्पांचे दरवाजे उघडावेत, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

दरम्यान, आज दिवसभर नांदेड जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील नागरिकांनी दूरध्वनीवर संपर्क साधून पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. त्यासंदर्भात देखील अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला अवगत केले. भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर व मुदखेड या दोन तालुक्यांमध्ये परिस्थिती गंभीर असून, आवश्यक तिथे मदत पथके पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे पाणी ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना मदत देण्याबाबतची कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना पण यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाला केली.

अन्य लेख

संबंधित लेख