Saturday, September 7, 2024

मन हे रामरंगी रंगले…

Share

१ फेब्रुवारी रोजी मला फोन आला की कोल्हापूर ते अयोध्या स्पेशल ट्रेन निघणार आहे. तू येणार असशील, तर लगेच पैसे भर. खरंच रामजन्मभूमीची गोष्टच वेगळी. सुमारे ५०० वर्षांच्या अविरत संघर्षानंतर हे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे श्रीरामांच्या दर्शनाची ओढ होतीच, पण जेथे हा संघर्ष घडला, जेथे लाखो रामभक्तांचे रक्त सांडले तो परिसरही डोळे भरून बघायचा होता. त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. लगेच पैसे भरले. २२ जानेवारी २०२४ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला होता आणि महिन्याच्या आतच जणू प्रत्यक्ष श्रीरामांनीच बोलावून घेतले होते. खूपच उत्सुकता होती.

१४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २.०५ वाजता आस्था स्पेशल ही गाडी साताऱ्यात येणार होती. साडेबारा वाजताच स्टेशनवर पोहोचलो. जमलेल्यांचा प्रचंड उत्साह सहजच जाणवत होता. कोल्हापूर, मिरज येथील रामभक्तांना घेऊन गाडी सातारा येथे आली. नंतर पुणे, दौंड, नगर आणि मनमाड येथील रामभक्तांना घेऊन आमची गाडी अयोध्येकडे निघाली. प्रवास खूपच मोठा. सुमारे ३६ तासांचा प्रवास, पण जुने मित्र भेटत होते. नवीन ओळखी होणार होत्या. त्यामुळे सर्व प्रवास मजेतच होत होता. प्रवासातील काही गोष्टींचा उल्लेख करावाच लागेल. संपूर्ण प्रवासात (जाता-येता) भोजन, स्वच्छता, चादरी वगैरे पुरवणारे सर्व गट अगदी मन लावून सेवा देत होते. बोगी प्रमुख म्हणून नेमलेले रामभक्तही त्यांचे काम चोख करत होते. काहीजण त्यांना उत्स्फूर्तपणे सहकार्य करत होते. गाडीत वैद्द्यकीय सेवाही पुरवली गेली होती.

प्रत्येक बोगीत सुरक्षारक्षक होते. अगदी दोन-तीन दिवसांपूर्वीच ‘सुरत ते अयोध्या’ आस्था ट्रेनवर दगडफेकीची घटना घडली होती. त्यामुळे शासन कोणताही धोका पत्करायला तयार नव्हते. हे सर्व रक्षक अगदी आस्थेने वागत होते, थोडा वेळ मिळाला की गप्पा मारत होते. एखाद्या स्टेशनवर रामभक्त खाली उतरले असतील तर गाडी सुरु होण्यापूर्वी शिट्टी वाजवून त्यांना गाडीत चढण्याची विनंती करत होते. विनाकारण आवाज चढवून कोणीही बोलत नव्हते.

आमचा प्रवास सुरू असताना गाडीतच आवश्यकतेनुसार मेसेज पाठवले जात होते. त्यात एक मेसेज आला की संध्याकाळी खांडवा स्टेशनवर गाडी थांबेल, तेव्हा आपापल्या बोगीनुसार प्रार्थना घ्या. आणि एक अभूतपूर्व प्रसंग घडला. आमची गाडी खांडव्याला पोहोचली, नेमकी त्याचवेळेस सुरतेकडून अयोध्येला गेलेली गाडी दर्शन घेऊन परत निघाली होती, ती ही खांडव्याला पोहोचली. आणि… कोणाला काही लक्षात येण्याच्या आतच दोन्ही गाड्यांमधील रामभक्त दोन्ही रेल्वेफलाटांवर मधल्या मोकळ्या जागेत एकत्र आले आणि घोषणांचा जो काही जल्लोष सुरू झाला, त्याचे वर्णन करताच येणार नाही. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. पण ज्यांनी तेथील प्रसंग प्रत्यक्ष अनुभवला आहे त्यांना तो व्हिडिओ अगदीच किरकोळ वाटेल. त्यामुळे झाले असे की तेथील रेल्वे प्रशासन पूर्णपणे घाबरून गेले आणि त्यामुळे त्यांना जो एकमेव उपाय करता येणे शक्य होते ते त्यांनी केले. तो म्हणजे आमची गाडी लगेच सुरू केली गेली आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला.

प्रयागराज येऊन गेल्यानंतर मात्र कधी एकदा अयोध्येला पोहोचतो असे झाले होते आणि… १५ फेब्रुवारीला दुपारी ३.३० च्या सुमारास आम्ही अयोध्या धाम स्टेशनवर पोहोचलो. अनेकजणांनी सवयीप्रमाणे उतरल्यावर लगेचच फोटो काढायला सुरुवात केली. तेवढ्यात स्टेशनवरील एक रेल्वे इन्स्पेक्टर म्हणाले “भाईसाब यहाँ क्यो फोटो खिचवा रहे हो। प्लॅटफॉर्म एक पे जाईए वो बिलकुल एअरपोर्ट जैसा बनाया है। लगेच आम्ही ‘तीर्थक्षेत्र पूरम’कडे गेलो. तेथील ‘मोरोपंत पिंगळे’ नगरमध्ये आमची निवास व्यवस्था करण्यात आली होती. व्यवस्था लागेपर्यंत थोडा वेळ गेला. पण इतकी संख्या म्हटल्यावर ते स्वाभाविकही होते. लगेच तयार होऊन सोयीस्कर ग्रुपनुसार सर्वजण बाहेर पडले. येथे रस्ते इतके अरुंद आहेत की फिरण्यासाठी ‘इ रिक्षा’ हे एकमेव योग्य साधन आहे. नाहीतर मग चालत जाता येते. अयोध्येत ४००० ‘इ रिक्षा’ आहेत. प्रथम लता मंगेशकर चौक आणि शरयू तीरावर गेलो. तेथे रोजची आरती झाली की रामायणावर आधारित शो असतो त्यासाठी एका मंदिराची मोठी भिंतच स्क्रीन म्हणून वापरली जाते. या तीरावरच ६ डिसेंबर १९९२ रोजी आचार्य धर्मेंद्र आणि साध्वी ऋतंबरा यांच्या प्रेरक भाषणांनी पुढचा इतिहास घडला होता.

नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हनुमानगढी आणि रामलल्लाचे दर्शन. आम्ही उशीरा गेल्यामुळे गर्दी थोडी कमी झाली होती. जसे ‘हनुमानगढी’पाशी पोचलो तसे १९९० च्या कारसेवेचे वर्णन डोळ्यासमोर येऊ लागले. येथूनच ‘साधुराम’नामक एका साधूने उद्दाम मुलायमच्या गर्जनांना भीक न घालता त्या ढाच्याजवळ ट्रक घुसवला होता. त्याला इतर अनेक कारसेवकांनी साथ दिली होती. कारसेवा केली होती. त्याचा राग मुलायमनी कारसेवकांवर काढला होता. अनेक जण हुतात्मा झाले होते. ते सर्व दृश्य डोळ्यासमोर येत होते. नकळत डोळ्यातून पाणी येत होते. ६ डिसेंबर १९९२ ची कारसेवाही आठवत होती. त्यावेळी त्या लोकांनी जे कष्ट घेतले, पराक्रम केला होता त्यामुळेच मी आज दर्शन घेऊ शकत होतो. त्या सर्व घटना आठवत हुतात्मा झालेल्या कारसेवकांना मनोमन श्रद्धांजली वहात पाणावलेल्या डोळ्यांनी दर्शन घेतले. माझ्यापुरती यावेळची यात्रा पूर्ण झाली होती. मंदिर दर्शनाची व्यवस्था खूप छान आहे. प्रचंड मोठा परिसर आहे. आत जाताच मंदिराच्या भव्यतेची कल्पना येते. अजून काम चालूच आहे. सुरक्षा मात्र थोडी अजून कडक व्हायला पाहिजे. कारण कित्येकजण थेट आतपर्यंत मोबाईल घेऊन येत होते. असो.

दुसऱ्या दिवशी शरयू नदीवर स्नान केले. खूप वर्षांनी एखाद्या नदीवर स्नान झाले. परत एकदा रामलल्लाचे दर्शन घेतले. शरयू आरतीमध्ये सहभागी झालो. परत येताना प्लॅटफॉर्म एकवर फिरलो. सुंदरच आहे. येताना रेल्वेचा सर्व स्टाफ निरोप द्यायला गाडीपाशी जमा झाला होता. तेही सर्वजण ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते. १८ तारखेला सकाळी १०.०० वाजता सातारा येथे पोहोचलो. परत एकदा दर्शन घ्यायला खूप आवडेल. जर तोपर्यंत काशी विश्वेश्वर पूर्ण मुक्त झाले तर त्याच्याही दर्शनाचा लाभ घेता येईल. न्यायालय अजून किती वेळ घेते ते बघायचे आहे. अयोध्येइतका वेळ लागणार नाही अशी आशा आहे.

उज्ज्वल केळकर
(लेखक अध्यापनाच्या क्षेत्रात काम करतात. ते रा. स्व. संघाचे सातारा जिल्हा सेवाकार्य प्रमुख आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख