Friday, September 13, 2024

अयोध्येतील राम मंदिराचा संदेश

Share

२२ जानेवारीचा अलौकिक दिवस अयोध्ये बरोबर सर्व जगाने अनुभवला. या दिवसाचे पावित्र्य, महत्त्व आणि दिव्यत्व अखंड आपल्या मनात राहीलच पण या दिवसाने जगाला दिलेला मानवतेचा, समरसतेचा, त्यागाचा, पुरुषार्थाचा, राष्ट्रीय ऐक्याचा, समर्पणाचा संदेश आपल्या सर्वांच्या हृदयात कायमस्वरूपी राहावा, हीच प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना.

पौष शुक्ल द्वादशी शके १९४५ सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत श्रीरामाच्या जन्मस्थानावर देशाच्या पंतप्रधानांच्या शुभहस्ते दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी नवनिर्मित भव्य मंदिरात मोहक, सुकुमार, निरागस हास्य मुखावर विलासत असलेल्या, भक्ताला आश्वासित करणाऱ्या, दर्शनार्थींचे अंत:करण श्रद्धेने ओतप्रोत भरणाऱ्या, संस्कारीत जीवन जगताना उत्तम गुणांचा अंगीकार करून संयमपूर्ण मर्यादेत राहून जीवन जगता येते या आदर्शाची आठवण करून देणाऱ्या बालरूपातील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची आध्यात्मिक दृष्ट्या संपूर्ण शास्त्रीय पद्धतीने प्राणप्रतिष्ठा झाली. भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचा, राष्ट्राच्या दृढतेचा राष्ट्रीय एकात्म भावनेच्या अविष्काराचा हा एक अलौकिक क्षण होता.

जगभरातील हिंदूंमध्ये आत्मविश्वास
स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय जागरणासाठी, राष्ट्रीय प्रेरणास्त्रोत निर्माण करण्यासाठी, राष्ट्रीय एकात्म भाव वाढीसाठी राष्ट्रधुरीणांनी जे विविधांगी प्रयत्न केले त्या प्रयत्नांमुळे राष्ट्रीय ऐक्य वाढीला नक्कीच चालना मिळाली. परंतु गेल्या ३५ वर्षातील राम जन्मभूमीच्या आंदोलनामुळे व त्याच्या फलश्रुतीतून निर्माण झालेल्या भव्य राम मंदिराच्या निर्माणामुळे जगभरातील हिंदूंमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला, जी अस्मिता प्रफुल्लित झाली, जो राष्ट्रीय भाव जागृत झाला तो अभूतपूर्व आहे. जन्म स्थानावर राम मंदिराची निर्मिती आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे प्रत्येक हिंदूच्या मनात आत्मगौरवाची, आत्मसन्मानाची भावना निर्माण झाली आहे.

२२ जानेवारी २०२४ हा दिवस हिंदूंच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाऊन येथून पुढे हजारो वर्षे या दिवसाचा दाखला दिला जाईल. त्यादिवशी देशभरातील व जगभरातील प्रत्येक हिंदूंचे घर सजले होते. सगळीकडे मंगलमय वातावरण झाले होते. शहरातील वस्तीत राहणाऱ्या हिंदू पासून ते जंगलातील खोपटात राहणाऱ्यांपर्यंत व अब्जावधी किमतीच्या महालात राहणाराही हिंदू त्या दिवशी ‘जय श्रीरामा’चा नारा देत होता. सारा देश अयोध्या झाला होता. भौतिकदृष्टया तशी अयोध्या आधीच दोन महिने सजली होती. जगातील सगळ्या हिंदूंना भगवंत येत आहेत त्यांच्या दर्शनाला यावे याचे निमंत्रण द्यायचे होते. ५ नोव्हेंबरला छोट्या रामललाच्या (आधी असलेल्या) मूर्तीच्या पदस्पर्शाने व पवित्र मंत्रजपाने पूजीत अक्षता देशभर पाठवल्या गेल्या होत्या. १६ जानेवारीपासूनच रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी धार्मिक विधी सुरू झालेले होते. एखाद्या मूर्तीत देवत्व यावे यासाठी हिंदू धर्मशास्त्रात अनेक धार्मिक विधी, अनुष्ठाने, यज्ञ याग सांगितले आहेत.

रामललाची प्राणप्रतिष्ठित होणारी सगुणमूर्ती तर विश्वातील देवत्वाचे सर्व सकारात्मक गुण अंगीकारून विराजित होणार होती. जगातील सर्वात ज्येष्ठ मूर्तिकार तीन वेगवेगळ्या ठिकाणी आयोध्येतच मूर्ती घडवत होते. त्यातील एक मूर्ती नक्की करण्यात आली. मूर्ती घडवतानाही मूर्तिकराने सतत आठ महिने स्वतःला संपूर्ण समर्पित करून भाव विश्वातील परमेश्वराशी एकरूप होऊन कलारूपी शक्तीची मनोभावे साधना करून नीलशामवर्णी पाषाणातून बालसुलभ भाव प्रकट करणारी, मनोहारी, दर्शनार्थींना आश्वासित करणारी, भक्ताचे अष्टसात्विक भाव जागृत करणारी, मंत्रमुग्ध करणारी अगदी अश्रद्ध नास्तिक माणसातही श्रद्धा भाव उत्पन्न करणारी, दृष्टीस पडताचक्षणी श्रद्धावान मनुष्याच्या डोळ्यातून अश्रू धारा वहायला लावणारी, भक्ताला दर्शन घेताच क्षणी जन्माचे सार्थक झाले आहे असे वाटायला लावणारी अशी परमेश्वराची चैतन्यमय मूर्ती मूर्तीकाराने सर्व कौशल्य पणाला लावून घडवली आहे. मूर्ती पाहता क्षणी किंवा मूर्तीचे दर्शन घेताच क्षणी साकार स्वरूपातील परमेश्वर कसा असेल तर तो हाच किंवा असाच असू शकतो असे खात्रीने कोणीही म्हणू शकेल.

म्हणूनच अशा मूर्तीद्वारे परमेश्वराला आवाहन करायचे होते की तू या मूर्तीत अंश रूपाने का होईना ये. तुझे दिव्य तेज या मूर्तीत प्रकट कर. दोन हजार वर्षांपूर्वीचे तुझे मंदिर पाचशे वर्षांपूर्वी राक्षसांनी पाडले होते पण तू तर आमच्या हृदयात कायम होतास व आहेस. ज्या पवित्र जागेवर तू मानवी देह धारण केला होता आज त्याच पवित्र जागेवर तुझे भक्त तुला विराजमान करीत आहेत परमेश्वरा तू प्रकट हो! असे आवाहन जगभरातील साधे भोळे हिंदू भक्त करीत होते तर धर्मशास्त्राचे अभ्यासक ऋषीमुनींचा वंशातील आचार्य, पुरोहित,पंडित सर्व धार्मिक विधींचा अवलंब करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधीवत करण्यासाठी प्राणप्रतिष्ठेच्या सर्व पद्धती सर्व तंत्र सर्व प्रकारचे अनुष्ठाने करून भगवंत मूर्तीमध्ये विराजित झालाच पाहिजे यासाठी परंपरेने व अनुभूतीने आलेल्या गत दहा हजार वर्षांचा अभ्यास व ज्ञान पणाला लावत होते.

सर्व तयारी झाली होती. ज्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हायची असते ते मंदिरही सर्व दृष्टीने शुद्ध करावे लागते त्यासाठी शरयूच्या शुद्ध पाण्याने, मंत्रविधीच्या उपचाराणे विविध पूजन पद्धतीने वास्तुपूजा, वास्तुशांती असे शास्त्रीय विधी करून मंदिर रामललाच्या आगमनासाठी संपूर्ण पवित्र शुद्ध करण्यात आले होते. ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते त्या मूर्तीलाही देवत्वाचे प्राणरूपी तेज येण्यासाठी दहा प्रकारचे अधिवास दिले जातात. दहा प्रकारच्या विविध घटकांनी स्नान घातले जाते असे दशविधा प्रकारचे स्नान घालण्यासाठी देशातील सर्व पवित्र नद्यांचे व सागरातीरावर असलेल्या धार्मिक तीर्थांचे शुद्ध जल त्या त्या ठिकाणी धार्मिक विधी करून आणण्यात आले होते. २१ जानेवारीला हा स्नान विधी धर्मशास्त्राच्या विविध प्रकारच्या मंत्रोपचाराने यथासांग पार पडला.

जो यजमान प्राणप्रतिष्ठा करणारा असतो त्यालाही अंतर्बाह्य शुद्ध व्हावे लागते. आठ दिवस व्रतस्थ रहावे लागते. यजमानालाही दशविधि स्नान घ्यावे लागते आणि शुद्ध व्हावे लागते. पंचगव्याचे प्राशन करावे लागते. विष्णुपूजन करून गोदान करावे लागते. प्राणप्रतिष्ठितच्या धार्मिक कार्यासाठी जे मंदिराचे विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा बसले होते त्यांनी सगळे विधी पूर्ण केले होते. ज्यांच्या शुभहस्ते मुख्य धार्मिक विधी झाले व प्राणप्रतिष्ठा झाली ते देशाचे प्रधानमंत्री यांनी तर स्वतःला या काळात पूर्णतः सिद्ध केले होते. ११ दिवस त्यांनी पूर्ण उपवास केला. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थस्थळी जाऊन स्नान केले, दर्शन घेतले, नामस्मरण केले, भजन -कीर्तनाचे श्रवण केले. देशाच्या प्रधानमंत्र्याने अशा धार्मिक कार्यासाठी असे कडक व्रत करणे हे जगाच्या इतिहासातील एकमेव उदाहरण आहे. आणि जे प्रत्यक्ष धर्मकृत्य सांगणार होते, या सर्व धर्म विधीचे पौरोहित्य करणार होते ते पंडित लक्ष्मीकांत दीक्षित शास्त्री व त्यांना सहाय्य करणारे देशभरातील १२१ अतिशय तपस्वी,तेजस्वी, ज्ञानी, विद्वान, पंडित यांनी प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करून प्राणप्रतिष्ठेचा धार्मिक विधी यथासांग पार पाडला.

अयोध्येत आधी आठ दिवस सूर्याचे दर्शन झाले नव्हते. दिवसभर धुके असायचे. २२ तारखेला प्रत्यक्ष सूर्यनारायण भगवान विष्णूंच्या अवताराचे मूर्तीतील सचेतन आगमनाचे कौतुक डोळे भरून पाहण्यासाठी व राम ललाचे दर्शन घेण्यासाठी आपली सगळी आल्हाददायक किरणे साऱ्या अयोध्येवर अच्छादित करीत होता.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत दोन अडीच तास धार्मिक कार्यक्रम झाले. महापूजा गर्भगृहात झाली. महाआरती झाली. गर्भगृहात होणाऱ्या धर्मकार्याचे वर्णन उपस्थितांना ट्रस्टचे महासचिव श्री. चंपतराय सांगत होते. बरोबर बारा वाजून २९ मिनिटांनी हेलिकॉप्टर मधून सर्व मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महाआरती झाली. उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी स्वस्तिवाचन झाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या उदबोधनात म्हटले, अयोध्येतील श्री राम मंदिर हे राष्ट्रीय गौरव पुनर्जागरणाचे प्रतीक आहे. राम मंदिर तर निर्माण झाले आता आपण सगळ्यांनी राष्ट्र मंदिर भक्कम करण्याचा प्रयत्न करूया.

प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी यांनी याप्रसंगी राष्ट्राला उद्देशून संबोधन करताना म्हटले की, आता आपले राम आले आहेत. ते आता तंबूत राहणार नाहीत तर भव्य मंदिरात राहतील. आज आम्हाला श्रीराम मंदिर मिळाले आहे. गुलामीची मानसिकता तोडून उभे राहिलेले राष्ट्र नव्या इतिहासाची निर्मिती करेल. राम आग नाही तर राम ऊर्जा आहे. राम विवाद नाही तर राम समाधान आहे. इथून पुढे हजारो वर्षे लोक आजची तारीख लक्षात ठेवली जाईल. या क्षणाची चर्चा केली जाईल.

हे भाषण झाल्यावर सर्व मान्यवरांनी भगवान श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यावेळेस मंदिर परिसरात एवढी सकारात्मक ऊर्जा होती एवढी पवित्र स्पंदने जाणवत होती की स्वर्गातील देवतांनाही रामललाचे दर्शन घेऊन काही काळ तेथे थांबावे असे वाटले असेल. राम ललाच्या सजीव मूर्तीपूढे देहभान विसरून लोक नतमस्तक होत होते. अयोध्येमध्ये सर्व देशभरातून आलेल्या चार-पाच लाख लोकांचा समुदाय मंदिराबाहेर दर्शनासाठी आतुर झाला होता रात्रभर लोक रांगा लावून उभे होते. प्राणप्रतिष्ठा होऊन आता तीन महिने होऊन गेले आहेत. रोज दीड ते दोन लाख भाविक दर्शनासाठी येत आहेत. कितीही गर्दी असली तरी अर्ध्या तासात सगळ्यांचे सुगम दर्शन होत आहे.

प्रत्येक हिंदूने वर्षातून एकदा तरी अयोध्येला जायलाच हवे. म्हणजे आपली देवता अखंड जागृत राहील. २२ जानेवारीचा अलौकिक दिवस अयोध्ये बरोबर सर्व जगाने अनुभवला. या दिवसाचे पावित्र्य, महत्त्व आणि दिव्यत्व अखंड आपल्या मनात राहीलच पण या दिवसाने जगाला दिलेला मानवतेचा, समरसतेचा, त्यागाचा, पुरुषार्थाचा, राष्ट्रीय ऐक्याचा, समर्पणाचा संदेश आपल्या सर्वांच्या हृदयात कायमस्वरूपी राहावा, हीच प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना.

संजय दत्तात्रेय मुद्राळे
(लेखक विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रदेश मंत्री आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख