Saturday, May 24, 2025

भारत गौरव योजना: संस्कृतीची पुनरुज्जीवन यात्रा

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने सुरू केलेल्या “भारत गौरव पर्यटक रेल्वे” योजनेचा उद्देश भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जागतिक पातळीवर मांडणे आणि देशांतर्गत पर्यटनाला चालना देणे हा आहे.

ही योजना भारताच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशाचे संवर्धन व प्रसार करण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक राष्ट्राभिमान प्रेरित उपक्रम आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘पॅलेस ऑन व्हील्स’, ‘डेक्कन ओडिसी’ यांसारख्या आलिशान पर्यटन रेल्वे सेवा प्रामुख्याने परदेशी आणि उच्चभ्रू पर्यटकांसाठी खास रीतीने आखण्यात आल्या होत्या, ज्यांचा उद्देश वैभवशाली सोयीसुविधांद्वारे पर्यटनाचा अनुभव देणे हा होता.

परंतु भारत गौरव पर्यटक रेल्वेच्या माध्यमातून देशी पर्यटकांना भारताच्या विविध भागांतील इतिहास, संस्कृती आणि हिंदू आध्यात्मिकतेचे थेट दर्शन घेण्याची संधी मिळते. ही योजना एका बाजूने सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाचा अनुभव देत असताना, दुसऱ्या बाजूने हिंदू संस्कृतीचा व्यापक प्रसार घडवून आणते. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आणि ‘देखो अपना देश’ या घोषणांच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये भारतातील विविध राज्यांमधील सांस्कृतिक ऐक्य आणि राष्ट्रीय अभिमान यावर विशेष भर दिला गेला आहे.

‘थीम-आधारित’ पर्यटन सर्किट द्वारे भारताच्या विविधतेत एकतेचे दर्शन घडविण्यासाठी भारत गौरव रेल्वे योजनेची कल्पना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २०२१ मध्ये मांडली. ही योजना सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेशी सुसंगत आहे. भारत गौरव रेल्वे सेवा सुरु करताना हिंदू तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि स्वातंत्र्य संग्रामाशी निगडीत स्थळे यांना प्राधान्य दिले जाते. प्रधानमंत्री मोदी यांनी २०२२ मध्ये या योजनेला सुरुवात करताना सांगितले होते की, “भारताच्या गौरवशाली इतिहासाचे पुनर्संचयन हा राष्ट्राच्या आत्मविश्वासाचा पाया आहे”

प्रवास आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रेल्वे ऐतिहासिकदृष्ट्या प्रयत्नशील राहिली आहे. अनेक दशकांपासून भारतीय रेल्वे देशातील लांब पल्ल्याच्या प्रवासाचा कणा आहे. रेल्वेमार्गांच्या विस्तृत जाळ्यामुळे देशाचे विविध भाग एकमेकांशी जोडले जातात. त्यामुळे देशभरातील पर्यटन मार्गांसाठी एक नैसर्गिक व्यासपीठ तयार झाले आहे.

भारतामध्ये विशेष पर्यटन गाड्यांची संकल्पना नवीन नाही. ‘पॅलेस ऑन व्हील्स’ आणि महाराष्ट्रातील ‘डेक्कन ओडिसी’ यांसारख्या लक्झरी पर्यटन गाड्यांची सुरुवात पर्यटन वाढीच्या उद्देशानेच करण्यात आली होती. विशेषतः ‘डेक्कन ओडिसी’ ही गाडी महाराष्ट्रातून धावत असल्यामुळे राज्याच्या पर्यटन क्षमतेचा आणि वारसास्थळांचा विकास करण्यास हातभार लागतो. या पूर्वीच्या यशस्वी उपक्रमांमुळे भारतीय रेल्वेला पर्यटन आधारित सेवा चालविण्याचा अनुभव व कौशल्य प्राप्त झाले असून, याच अनुभवाच्या आधारावर ‘भारत गौरव’ पर्यटक ट्रेन योजनेची रचना अधिक ठोसपणे करण्यात आली आहे. 

भारत गौरव पर्यटक ट्रेनच्या संचालनामध्ये ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ (आयआरसीटीसी) ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. खानपान, पर्यटन व ऑनलाइन तिकीट बुकिंग यासारख्या महत्त्वाच्या बाबी आयआरसीटीसी हाताळते. दररोज जवळपास ६ लाख बुकिंग्ज आयआरसीटीसी द्वारे होतात. त्यामुळे ही सेवा जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑनलाइन तिकीट सेवा ठरते. पर्यटन व्यवस्थापनातील आयआरसीटीसीचा विस्तृत अनुभव आणि कार्यक्षमतेमुळे ‘भारत गौरव’ पर्यटक ट्रेनसारख्या उपक्रमांचे संचालन अधिक प्रभावी आणि सुलभ बनते.

भारत हा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाने समृद्ध देश आहे. भारताच्या या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशात प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक स्थळे आणि विविध धार्मिक परंपरा यांचा समावेश आहे. भारत गौरव योजना या वारशाला जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी आणि देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आली असून या योजनेमुळे रेल्वेच्या पारंपरिक यात्री आणि मालवाहतूक सेवा या पलीकडे जाऊन पर्यटनाला एक स्वतंत्र क्षेत्र म्हणून विकसित होण्याच्या दृष्टीने महत्व मिळेल. 

श्री रामायण यात्रा:

ही यात्रा भगवान राम यांच्या जीवनाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देते, जसे की अयोध्या, वाराणसी, प्रयागराज, सितामढी आणि जनकपूर (नेपाळ). काही पॅकेजमध्ये श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित स्थळांचा समावेश असतो. उदाहरण: भारत-नेपाळ मैत्री यात्रा, ज्यामध्ये अयोध्या, वाराणसी, सितामढी, जनकपूर आणि काठमांडू यांचा समावेश आहे.

चार धाम यात्रा:

ही यात्रा बद्रीनाथ, जगन्नाथपुरी, रामेश्वरम आणि द्वारकाधीश या चार धाम यांना भेट देते. याशिवाय काही ज्योतिर्लिंगांचा देखील समावेश असतो. ही यात्रा १७ दिवसांची असून मे २०२५ मध्ये दिल्ली सफदरजंग येथून सुरू होणार आहे.

ज्योतिर्लिंग यात्रा:

या यात्रेअंतर्गत १२ ज्योतिर्लिंगांपैकी काही प्रमुख ज्योतिर्लिंगांना भेट देण्यात येते,यामध्ये प्रामुख्याने महाकालेश्वर, ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ आणि मल्लिकार्जुन या मंदिरांचा समावेश होतो. 

दक्षिण भारत यात्रा:

या यात्रेमध्ये रामेश्वरम, तिरुपती, कन्याकुमारी, मदुराई, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, मीनाक्षी मंदिर आणि इतर दक्षिण भारतीय मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे. 

पुण्य क्षेत्र यात्रा:

यामध्ये पुरी (जगन्नाथ मंदिर), वाराणसी (काशी विश्वनाथ मंदिर), गया (विष्णुपद मंदिर), अयोध्या (राम जन्मभूमी) आणि प्रयागराज (त्रिवेणी संगम) यांचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट:

या यात्रेमध्ये रायगड, पुणे, शिवनेरी किल्ला, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, प्रतापगड, कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर आणि पन्हाळगड या महाराष्ट्रातील ठिकाणांच समावेश करण्यात आला आहे. या यात्रेची सुरुवात ९ जून २०२५ पासून सुरू होणार आहे.

अन्य यात्रा:
बाबासाहेब आंबेडकर यात्रा, गुरुकृपा यात्रा (शीख धर्माशी संबंधित), आणि ईशान्य भारत यात्रा (आसाम, त्रिपुरा, नागालँड, मेघालय) यांचाही समावेश आहे.

‘भारत गौरव’ रेल्वे योजना ही फक्त पर्यटनाबरोबरच, भारताच्या संस्कृतीची, इतिहासाची आणि आध्यात्मिक परंपरेची ओळख करून देणारा एक सुंदर उपक्रम आहे. रामायणातील ठिकाणे, चारधाम, ज्योतिर्लिंग मंदिरे, शिवाजी महाराजांचे किल्ले, बाबासाहेबांचे स्मारक अशा ठिकाणी नेणाऱ्या योजनेमुळे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीचा थेट अनुभव मिळाला आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे धर्म, संस्कृती आणि स्थानिक उद्योग यांना चालना मिळण्यास मदत होईल. तसेच या योजनेमुळे व्यावसायिक, हस्तकला, पारंपरिक जेवण, गाइड्स आणि गेस्ट हाऊस यांना रोजगाराची नवी संधी प्राप्त होतील.

अन्य लेख

संबंधित लेख