Monday, June 24, 2024

पवित्र बौद्धस्थळांची तीर्थयात्रा घडवणारी रेल्वे: Buddhist Circuit Tourist Train

Share

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देश-विदेशातील बौद्ध अनुयायी, पर्यटक, अभ्यासकांसाठी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात महत्त्वाच्या ठरलेल्या, तसेच त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या स्थळांची तीर्थयात्रा घडवणारी बौद्ध सर्किट पर्यटन रेल्वेगाडी (Buddhist Circuit Tourist Train) २०१९ मध्ये सुरू केली. आजच्या बुद्धपौर्णिमेनिमित्त तिच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती देणारा लेख…

आज बुद्धपौर्णिमा. जगभरातील बौद्ध धर्मीय, अनुयायी, विचारवंत आणि आध्यात्मिक क्षेत्राचा महान आदर्श असलेल्या भगवान गौतम बुद्धांना आज आत्मज्ञान प्राप्त झाले. आत्मज्ञानप्राप्तीनंतर आध्यात्मिक परिवर्तन होऊन ते ‘भगवान गौतम बुद्ध’ झाले. महापरिनिर्वाण सूत्रात भगवान गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना सांगून ठेवले आहे, की ज्या लुंबिनीमध्ये त्यांचा जन्म झाला, ज्या बोधगया येथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, ज्या सारनाथ येथे त्यांनी प्रथम उपदेश दिला आणि ज्या कुशीनगर येथे त्यांना निर्वाण प्राप्त झाले, या स्थळांची तीर्थयात्रा करून माझ्या अनुयायांना अध्यात्मिक प्रगती आणि महान पुनर्जन्म लाभेल. बुद्धांच्या जीवनावर आणि शिकवणीवर या स्थळांचा महत्त्वाचा प्रभाव आहे.

त्यामुळे या तीर्थस्थळांची यात्रा करणे बौद्ध धर्मीय आणि बौद्ध दर्शनशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी खूप पवित्र आणि महत्त्वाचे कार्य आहे. हे लक्षात घेऊन मोदी सरकारने या चारही तीर्थस्थळांची यात्रा घडवून आणणारी बौद्ध सर्किट पर्यटन रेल्वेगाडी (Buddhist Circuit Tourist Train) सुरू करण्याचा निर्णय घेतला. ८ डिसेंबर २०१८ रोजी दिल्लीतील सफदरजंग रेल्वेस्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून या विशेष रेल्वे सेवेस सुरुवात झाली. गौतम बुद्धांच्या शिकवण-संदेशातून बौद्ध धर्माचा उगम झाला. भारतात या बौद्ध वारशाची ही पवित्र स्मृतिस्थळे आहेत. स्तूप (बौद्ध स्मृतिस्थळे), चैत्य (प्रार्थनागृह) आणि विहार (भिक्षूंसाठी कक्ष) या कला आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने अभ्यासण्याजोग्या स्थळांना सलग भेट देण्यासाठी ही रेल्वेगाडी उपयुक्त आहे. दिल्ली सफदरजंग रेल्वेस्थानकापासून या रेल्वेगाडीचा प्रवास सुरू होतो. त्यानंतर ही रेल्वेगाडी बोधगया, राजगीर आणि नालंदा, वाराणसी, सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर, श्रावस्ती आणि आग्रा येथे जाते. अखेरीस पुन्हा दिल्लीतील सफदरजंग रेल्वेस्थानकावर परतते.

ही रेल्वेगाडी सर्वप्रथम गौतमांना जिथे बुद्धत्व प्राप्त झाले त्या बोधगया येथे जाते. येथे बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर ज्या निरंजना नदीत स्नान केले त्या नदीत स्नानाचा लाभ भाविक घेऊ शकतात. येथे ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ महाबोधी मंदिरासह बुद्ध मूर्ती उपासना केंद्र आहे. बिंबिसार जेल, ग्रिडकुट हिल आणि वेणुवनच्या सुंदर दृश्यांचा आनंद पर्यटक-भाविक लुटू शकतात. त्यानंतर राजगीर हे प्राचीन शहर ‘बुद्ध एक्सप्रेस’मधील भाविकांचे स्वागत करते. नंतर ही रेल्वेगाडी नालंदाला जाते. येथील पुरातन आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे अवशेष, पुरातत्व संग्रहालय भाविकांना पाहता येते. त्यानंतर ही रेल्वेगाडी सारनाथ येथे जाते. येथील विशाल धमेख स्तूप, सारनाथ संग्रहालय, सर्वात जुने पुरातत्व स्थळ, अशोक स्तंभ, मूलगंध कुटी, विहार मठ आणि संध्याकाळी आरतीसाठी गंगा घाट येथे जाता येते. रात्री पुन्हा ही रेल्वेगाडी भारत-नेपाळ खुल्या सीमेवरील सर्वात निकटचे रेल्वे स्टेशन नौतनवा येथे जाते. तेथून भाविक लुंबिनी या भगवान बुद्धांच्या पवित्र जन्मस्थळाला भेट देऊ शकतात. भाविक येथे गौतम बुद्धांचे जन्मस्थान – मायादेवी मंदिर आणि अशोकस्तंभाला भेट देऊ शकतात. मग ही रेल्वेगाडी तुम्हाला कुशीनगरला घेऊन जाते. येथे बुद्धांना निर्वाण प्राप्त झाले होते. येथे तुम्हाला महापरिनिर्वाण मंदिर, पवित्र रामभर स्तूप, भव्य माता कुटीर मंदिर आणि इतर ठिकाणांना भेट देता येईल. दिमाखदार जेतवन विहार मठ, नेत्रदीपक प्रशस्त ग्रोटो उत्खनन क्षेत्र आणि प्राचीन शिल्पे आणि शिलालेख असलेल्या सेहत महेत येथे नंतर जाता येतं. या यात्रेच्या अखेरीस भाविक-पर्यटकांना जगप्रसिद्ध ताजमहालला भेट देता येते.

या प्रत्येक शहरात हॉटेल-निवासासह रेल्वेगाडीत सुयोग्य-सुरुची भोजन दिले जाते. भारत आणि नेपाळमध्ये असलेल्या या पवित्र बौद्ध स्थळांना सलग एकापाठोपाठ भेट देणे भाविकांच्या दृष्टीने कठीण आणि यातायात करणारे ठरते. त्यामुळे या रेल्वेगाडीने भाविकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे या पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी सुविधाजनक, सुखद आरामदायी प्रवास करता येतो. त्यासाठी या रेल्वेगाडीत पर्यटकांना ‘डिलक्स कोच’, दोन ‘मल्टी-क्युझिन रेस्टॉरंट’, स्वतंत्रपणे बसण्याची एक जागा, एक ‘मिनी लायब्ररी’, एक अत्याधुनिक स्वयंपाकघर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आगामी तीर्थयात्रा
‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पेरेशन’ने (आयआरसीटीसी) सुरू केलेली ही ‘बुद्धिस्ट सर्किट टुरिस्ट ट्रेन’ ही विशेष पर्यटन रेल्वेगाडी भारत आणि नेपाळमधील सर्व महत्त्वाच्या बौद्ध स्थळांचे सुविधायुक्त आणि आरामदायी पर्यटन घडवते. या रेल्वेगाडीच्या आरक्षणासाठी आणि इतर माहितीसाठी ‘आयआरसीटीसी’च्या अधिकृत ‘बुद्धिस्ट सर्किट टुरिस्ट ट्रेन Buddhist Circuit Tourist Train वेबसाइट’च्या www.irctcbuddhisttrain.com या संकेतस्थळाला भेट द्या. येत्या १९ ऑक्टोबर, १६ नोव्हेंबर आणि २१ डिसेंबर २०२४ रोजी या यात्रेस निघणाऱ्या या ट्रेनसाठी परदेशस्थ भारतीय आणि भारतीय नागरिकांना या रेल्वेच्या शुल्कावर २० टक्के विशेष सवलत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी www.irctcbuddhisttrain.com/special-offers ला भेट द्यावी.

अन्य लेख

संबंधित लेख