चंद्रपूर : अत्यंत नाट्यमय घडामोडी, फोडाफोडीचे राजकारण आणि अटीतटीच्या संघर्षानंतर चंद्रपूर महानगरपालिकेवर अखेर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव करत महापौरपदाची खुर्ची काबीज केली. या विजयासाठी भाजपने शिवसेना (उबाठा) गटाशी हातमिळवणी करत सत्तेचा नवा ‘चंद्रपूर फॉर्म्युला’ यशस्वी केला आहे.
संख्याबळाचे गणित
एकूण ६६ सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत बहुमतासाठी ३४ मतांची आवश्यकता होती. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी काही नगरसेवकांच्या भूमिकेमुळे संपूर्ण समीकरणच बदलले. यावेळी, वंचित बहुजन आघाडीचे २ नगरसेवक मतदानावेळी अनुपस्थित राहिले. तर, एमआयएमच्या (MIM) १ नगरसेवकाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे सभागृहातील प्रभावी संख्याबळ ६३ वर आले आणि बहुमताचा आकडा ३२ पर्यंत खाली सरकला.
भाजपच्या संगीता खांडेकर यांना ३२ मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवार सोनाली महाडूळे यांना ३१ मते मिळाली. एका मताच्या या फरकाने संगीता खांडेकर विजयी घोषित झाल्या. काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेली सत्तेची संधी वंचित आणि एमआयएमच्या भूमिकेमुळे हुकली, अशी चर्चा आता रंगली आहे.
निवडणुकीच्या काही दिवस आधीपासूनच चंद्रपुरात राजकीय वातावरण तापले होते. आरोप-प्रत्यारोप आणि नगरसेवकांची पळवापळवी यामुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेत होती.
भाजप-ठाकरे गट युतीचा नवा ‘फॉर्म्युला’
चंद्रपूरमध्ये सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने मोठी राजकीय खेळी खेळली. शिवसेना (उबाठा) गटाचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपने ‘सव्वा-सव्वा वर्ष महापौरपद’ वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरवला आहे. या अनपेक्षित युतीमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या असून, महाविकास आघाडीत चंद्रपूरच्या निमित्ताने मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे.
काँग्रेसला बसला मोठा फटका
वंचितचे नगरसेवक गैरहजर राहणे आणि एमआयएमने घेतलेली तटस्थ भूमिका भाजपच्या पथ्यावर पडली. काँग्रेससाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे, कारण संख्याबळ अनुकूल असतानाही ऐनवेळी मित्रपक्षांची साथ न मिळाल्याने त्यांना सत्ता गमवावी लागली आहे.