मुंबई/अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथील पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. चिखलदरा येथील ‘देवी पॉईंट’ आणि ‘विराट देवी’ देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (MTDC) ३ एकर ८ आर जमीन अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
काय आहे नेमका निर्णय?
चिखलदरा येथील सुमारे साडेसात एकर जमीन १९७५ मध्ये पर्यटन महामंडळाला देण्यात आली होती. मात्र, प्रदीर्घ काळापासून ही जमीन वापराविना पडून होती. चिखलदरा येथील प्रसिद्ध देवी पॉईंट आणि विराट देवी मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्या श्री अंबादेवी संस्थानाने या परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडे जागेची मागणी केली होती. भाविकांची वाढती संख्या आणि सोयीसुविधांचा अभाव लक्षात घेऊन सरकारने ही जमीन संस्थानाला विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
जमिनीच्या वापराबाबत अटी
ही जमीन केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक प्रयोजनासाठीच वापरता येणार आहे.
ही जागा ‘भोगवटादार वर्ग-२’ म्हणून संस्थानाला हस्तांतरित केली जाईल.
यामुळे चिखलदऱ्यात येणाऱ्या पर्यटकांना आणि भाविकांना उत्तम सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
धार्मिक पर्यटनाला मिळणार गती
चिखलदरा हे केवळ थंड हवेचे ठिकाण नसून ते एक महत्त्वाचे श्रद्धास्थान देखील आहे. या निर्णयामुळे देवी पॉईंट परिसराचे सौंदर्यीकरण आणि भाविकांसाठी निवास, दर्शन रांगा अशा मूलभूत सोयी निर्माण करणे संस्थानाला सोपे होणार आहे. अमरावती जिल्ह्याच्या पर्यटनात या निर्णयामुळे मोठी भर पडणार आहे.